सोमालियाच्या चाच्यांकडून अपहरण झालेल्या एम. व्ही. अब्दुल्ला या जहाजाची सुटका करण्यात आली असून त्याबदल्यात त्यांना 50 लाख डॉलर्सची खंडणी मिळाली आहे. अब्दीराशिद युसूफ या चाच्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, “नेहमीप्रमाणे दोन रात्रींपूर्वी आमच्याकडे पैसे पोहोचते करण्यात आले. पैसे बनावट आहेत की नाही हे आम्ही तपासले. मग ते पैसे गटांमध्ये विभागले आणि सरकारी तपास यंत्रणांना चकमा देत आम्ही तिथून निघून गेलो.”
मालवाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे एम. व्ही. अब्दुल्ला हे बांगलादेशचे ध्वज असलेले जहाज मोझांबिकहून संयुक्त अरब अमिरातीला जात असताना मार्चमध्ये त्याचे अपहरण करण्यात आले होते. सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या पूर्वेस सुमारे 600 सागरी मैल अंतरावर चाच्यांनी ते ताब्यात घेतले होते. जहाजाच्या सुटकेसाठीच्या सुरू असलेल्या वाटाघाटींचे नेतृत्व जहाजाचे मालक आणि केएसआरएमचे सीईओ मेहरूल करीम यांनी केले. खंडणीची नेमकी किती रक्कम देण्यात आली हे सांगण्यास मात्र करीम यांनी नकार दिला.
2012 पर्यंत सोमाली पायरसी वाढली होती. पायरसीविरोधी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यानंतर 2023 पर्यंत पायरसीच्या घटनांवर बऱ्यापैकी अंकुश मिळवता आला. सागरी अभ्यासकांच्या मते, सध्या जगातील बहुतेक प्रमुख नौदलांचे लक्ष लाल समुद्रातील हौतींवर केंद्रित झाले आहे. त्यामुळे हॉर्न ऑफ आफ्रिकेवर पूर्वीप्रमाणे कडक नजर ठेवली जात नाही.
पूर्व आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या ईयू नॅव्हफोरअटलांटा या युरोपियन युनियनच्या नौदलानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून या वर्षी फेब्रुवारीपर्यंत सोमाली किनारपट्टीवर किमान 14 जहाजांचे अपहरण झाले आहे. हौती हल्ल्यांमुळे हल्ली जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा घालण्यासाठी लाल समुद्राकडे वळणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. याचा फायदा सोमालियन चाचे घेत आहेत. याशिवाय ते केवळ समुद्री चाच्यांचे लक्ष्य बनत नाहीत, तर मालवाहतुकीचा खर्च वाढला असून प्रवासाचा वेळ किमान 10-14 दिवसांनी वाढला आहे.
भारताने अलीकडेच एमव्ही रुएनची चाच्यांच्या ताब्यातून सुटका केली. भारतीय युद्धनौका आयएनएस कोलकाताने या वर्षी मार्चमध्ये माल्टीज-ध्वज असलेले जहाज अडवले, जे सोमाली समुद्री चाच्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये सोकोत्रा या येमेनी बेटाच्या पूर्वेस 380 सागरी मैलांवर ताब्यात घेतले होते. त्यानंतर जहाज आणि त्यातील 17 सदस्यांना सोमालियाच्या पुंटलँड या अर्ध-स्वायत्त राज्यात नेण्यात आले. मेरीटाईम युनियन ऑफ इंडियाच्या (एमयूआय) मते, मेरिटाइम पायरसी ही भारतासाठी विशेष चिंतेची बाब आहे. याचे कारण म्हणजे “मेरिटाइम पायरसीचा धोका दोन लाखांहून अधिक भारतीय नाविकांच्या चिंतेचे एक प्रमुख कारण आहे, कारण सध्या जागतिक नाविकांपैकी सुमारे 9.35 टक्के नाविक भारताकडून पुरवले जातात आणि जागतिक सागरी उद्योगाला पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या नाविकांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.”
अश्विन अहमद
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)