जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीत मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या आकडेवारीत जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत सुमारे 40 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचवेळी, चीनमधून येणाऱ्या पर्यटकांच्या एकूण संख्येत 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने अलीकडेच जानेवारी ते मार्च या काळात मालदीवला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येबाबतचा आपला मासिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार यंदाच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी मालदीवला भेट दिली.
जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान 56 हजार 208 भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याउलट जानेवारी-मार्च 2024 या कालावधीत ही संख्या कमी होऊन 34 हजार 847 वर आली. 2023च्या तुलनेत ही घट 38 टक्के इतकी आहे.
दरम्यान, जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान चीनमधून 17 हजार 691 पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. तर जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान 67 हजार 399 चिनी पर्यटक मालदीवला आले. म्हणजे पर्यटकांच्या संख्येत 281 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
ताज्या आकडेवारीनुसार, मालदीवच्या पर्यटन क्षेत्रात योगदान देणाऱ्या पहिल्या 10 देशांमध्ये भारत सहाव्या क्रमांकावर आहे, तर चीन 11 टक्के वाट्यासह पहिल्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी महत्त्वाची आहे कारण एकेकाळी मालदीवच्या पर्यटन व्यवसायात सर्वोच्च आणि महत्त्वाचे योगदान भारताचे होते. जानेवारी-नोव्हेंबर 2023 मध्ये मालदीवमध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या यादीत भारत रशियानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. चीनच्या तुलनेत 2020 मध्ये भारतातून मालदीवला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली होती.
गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत मालदीवच्या पर्यटन व्यवसायात भारताचे वर्चस्व होते. यावर्षी 2 जानेवारीपासून त्यात घसरण होऊ लागली. मालदीवच्या पर्यटन क्षेत्रासाठी मोठे योगदान देणाऱ्या पहिल्या 10 देशांमध्ये त्यावेळी भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. नंतरच्या काही दिवसांमध्ये भारताची क्रमवारी आणखी घसरून 21 जानेवारीला पाचव्या तर 3 मार्चला भारत सहाव्या स्थानावर आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून अधिक प्रोत्साहन द्या असे आवाहन केल्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी यावर एक्सच्या माध्यमातून टीका केली. त्यानंतर लगेचच मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. यानंतर, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्याची विनंती केली होती.
भारतातून मालदीवला येणाऱ्या पर्यटकांची घटणारी संख्या आणि त्यानंतर चीनमधून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत झालेली वाढ ही मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या धोरणांशी आणि विचारांशी सुसंगत अशीच आहे. त्यांच्या मते भारत हा मालदीवचा शत्रू तर आणि चीन मित्र आहे.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)