नोव्हेंबरमध्ये भारताचे एक पथक अंटार्क्टिका मोहिमेसाठी रवाना होणार आहे. भारताची ही 40वी मोहीम असून, या पथकात वैद्यकीय कर्मचारी, रसद तज्ज्ञ, विविध शाखांमधील शास्त्रज्ञ अशा एकंदर 50 लोकांचा समावेश असेल. इतर गोष्टींबरोबरच हवामानाचा अभ्यास करण्यासाठी हे पथक एक वर्षभर अंटार्क्टिकावर राहणार आहे.
“अंटार्क्टिका ही एक नैसर्गिक प्रयोगशाळा आहे”, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. रविचंद्रन यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “शास्त्रज्ञ अंटार्क्टिकाचे भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि इतर सर्व गोष्टींचा अभ्यास करतील.”
ते म्हणाले की, ”हिमखंडाच्या अभ्यासातून भारताच्या वार्षिक मान्सूनबाबत महत्त्वपूर्ण संकेत मिळतात. बर्फात खोदकाम करून बर्फाचे कोअर काढून अभ्यास केला तर त्यावरून मागील हवामानाच्या नमुन्यांची कल्पना येते आणि भारताच्या पावसावर परिणाम झाला आहे की नाही हे तपासता येते. या वर्षीच्या मान्सूनचे विश्लेषण असे आहे की तो सामान्य असेल. पण देशाच्या काही भागात इतर भागांच्या तुलनेत जास्त पाऊस पडेल.
या विश्लेषणातून असेही सूचित होते की, भारताच्या ईशान्येकडील ज्या भागात सर्वाधिक पाऊस पडतो, त्या भागात येत्या काही वर्षांत कमी पाऊस पडू शकतो आणि राजस्थानसारख्या वाळवंटी राज्यांमध्ये जास्त पाऊस पडू शकतो. अनेक राज्यांच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असल्याचे आपण पाहिले आहे.
बर्फात सापडणाऱ्या बुरशीवरील प्रयोग क्षयरोगावरील उपचारांसाठी काय प्रगती करता येईल याचे मार्गदर्शन करू शकतात, असे ते म्हणाले. याशिवाय, अंटार्क्टिक क्रिल, जी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे, त्याची पैदास केली जाऊ शकते परंतु त्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवणारी काही मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम आहेत. याशिवाय, याचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या मासेमारी तळाचा भारताकडे अभाव आहे.
अंटार्क्टिका मोहिमा या अत्यंत महागड्या असून त्यासाठी व्यापक नियोजन आणि इतर देश, एजन्सीज् आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करणे आवश्यक आहे. सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या खर्चामुळे भारताने अद्याप बर्फ तोडणारी नौका विकत घेतलेली नाही.
याउलट उत्तर ध्रुवावरील आर्क्टिकवर संशोधन कार्य करणे तुलनेने सोपे आहे कारण ते अत्यंत सहयोगी आहे, तिथे असणारी आंतरराष्ट्रीय स्थानके तिथे जाणाऱ्या शास्त्रज्ञांच्या निवास, अन्न आणि वाहतुकीची काळजी घेतात, ज्यामुळे शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करता येते.
शेवटी, ध्रुवीय प्रदेश हे सर्व भू-राजकारणाशी संबंधित आहेत. उन्हाळ्यात अंटार्क्टिकचे पाणी बर्फमुक्त असू शकते असे एका अभ्यासातील निरीक्षणातून लक्षात आले आहे. त्यामुळे भारतासारख्या महासत्ता आणि मध्यमसत्ता या हिमखंडात आपले पाऊल रोवत आहेत. आपल्या तिथल्या उपस्थितीचा (अभ्यासाचा) जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा यावर विचार करत आहेत.
सूर्या गंगाधरन