संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांची उपस्थिती
दि. ०९ मे: सशस्त्रदलांच्या कामकाजात समन्वय साधणे य त्याचे एकात्मिक कार्यवहन सुनिश्चित करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी तिन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘परिवर्तन चिंतन’ या दोन दिवसीय परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होणार आहे. संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, या परिषदेत सशस्त्रदलांच्या ‘थिएटराइजेशन’बाबतही चर्चा होणे अपेक्षित आहे.
सशस्त्रदलांच्या परिचालनाबाबत नाविन्यपूर्ण कल्पना आणि सुधारणांना चालना देणारे उपक्रम सुरु करणे, त्याबाबत विचार करण्यासाठी ‘परिवर्तन चिंतन’ या परिषदेची रचना करण्यात आली आहे. या परिषदेत लष्कर, नौदल आणि हवाईदलप्रमुखांसह तिन्ही सेनादलांतील वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षण संस्था, तिन्ही सैन्यदलांशी संबंधित संस्थांतील वरिष्ठ अधिकारी सहभागी होत असतात. या परिषदेचे पहिले सत्र या वर्षीच्या
एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात आले होते. तर, दुसरे सत्र ९ आणि १० मे रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान अध्यक्ष असलेल्या ‘चिफ ऑफ स्टाफ कमिटी’च्या सर्व उपसमित्यांचे सदस्य, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख या दोन दिवसांत वेगवेगळ्या क्षेत्रात झालेली प्रगती, सशस्त्रदलांतील संभाव्य फेरबदलांना सामोरे जाण्यासाठी करण्यात येत असलेली तयारी, समन्वय व एकात्मिक परीचलनाबाबत या परिषदेत चर्चा करणार आहेत.
भारताची सशस्त्रदले सध्या फेरबदलाच्या अवस्थेतून जात आहेत. बदलती भूराजकीय परिस्थिती आणि त्यामुळे उभी ठाकलेली नवी आव्हाने, युद्धाचे बदलते स्वरूप, हायब्रीड, माहितीवर आधारित युद्धामुळे पारंपरिक युद्धाची बदलती परिमाणे यांना तोंड देण्यासाठी लष्करी तयारी आवश्यक आहे. त्यामुळे सशस्त्रदलांचा कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेरबदलाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. चीनचे आव्हान, हिंदी महासागर क्षेत्रातील भारतीय नौदलाचे वर्चस्व टिकवून ठेवण्याची गरज, हिद-प्रशांत महासागर क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजाविण्याची महत्त्वाकांक्षा व सैन्यदलांचे आधुनिकीकरण या सर्व पार्श्वभूमीवर हे ‘परिवर्तन चिंतन’ महत्त्वाचे मानले जात आहे.
‘थिएटराइजेशन’वरही चर्चा अपेक्षित
सशस्त्रदलांच्या परिवर्तन चिंतन या परिषदेत सैन्यदलांच्या ‘थिएटराइजेशन’वरही चर्चा होणे अपेक्षित आहे. युद्ध अथवा युद्धसदृश परिस्थिती व विविध कारवायांदरम्यान लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या एकत्रित क्षमतांचा सर्वोत्तम वापर करण्याच्या उद्देशाने थिएटराइजेशनची संकल्पना मांडण्यात आली होती. ठरविक स्वरूपाच्या भौगोलिक रचनेनुसार अथवा सीमाभागांनुसार हे थिएटराइजेशन करणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, ठराविक देशाच्या सीमेची जबाबदारी असणारे कमांड किंवा मरीन कमांड ही थिएटराइजेशनची कापणं आहे. चीन, अमेरिकेसारख्या देशांत ही कल्पना अंमलात आणण्यात आली आहे. या मुले सैन्यदलाच्या तिन्ही अंगांचा सुयोग्य समन्वय साधता येणे शक्य आहे. त्यांच्या साधनसामग्रीचा एकत्रित उपयोगही करता येऊ शकतो, अशा अनेक बाबींमुळे भारतीय सशस्त्रदलांमध्ये थिएटराइजेशनची प्रक्रिया राबविण्याबाबत विचार सुरु आहे.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)