मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या आग्रहावरून 76 भारतीय सैनिक टप्याटप्याने मायदेशी परतले. त्यानंतर दोनच दिवसांनी संरक्षणमंत्री घसन मौमून यांनी कबूल केले आहे की, भारताकडून मिळालेली तीन विमाने उडवण्यासाठी मालदीवच्या लष्कराकडे अद्यापही सक्षम वैमानिक नाहीत.
भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर्स आणि एक डॉर्नियर विमान भेट म्हणून दिले आहे. याआधी ही विमाने तिथे तैनात असणाऱ्या भारतीय सैनिकांकडून चालवण्यात येत होती. मात्र 10 मेच्या आधीच भारतीय लष्करी तुकड्या मायदेशी परतल्या. त्यांच्या जागी सक्षम भारतीय तांत्रिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या घडामोडींबद्दल माध्यमांना माहिती देण्यासाठी राष्ट्रपती कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत घसन मौमून यांनी ही टिप्पणी केली.
एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना घसन मौमून म्हणाले की, मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलातील (एमएनडीएफ) कोणताही सैनिक भारताकडून भेट म्हणून मिळालेल्या तीनही विमानांचे संचालन करू शकतील. अर्थात याआधीच्या सरकारने केलेल्या करारानुसार मालदीवच्या काही निवडक सैनिकांना ही विमाने उडवण्याचे प्रशिक्षण देण्याची सुरूवात करण्यात आली होती.
“हे एक असे प्रशिक्षण होते ज्यात वेगवेगळे टप्पे पार करणे आवश्यक होते. मात्र आपले सैनिक काही कारणांमुळे ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे, सध्या आमच्या दलात असे कोणीही सैनिक नाहीत ज्यांच्याकडे दोन हेलिकॉप्टर्स आणि एक डॉर्नियर विमान उडवण्याचा परवाना आहे किंवा ते पूर्णपणे प्रशिक्षित आहेत,” असे घसन मौमून यांनी सांगितले.
चीन कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रध्यक्ष मुइझ्झू यांनी 10 मेपर्यंत मालदीवमधील सर्व भारतीय लष्करी कर्मचारी मागे घेण्याचा आग्रह धरल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने यापूर्वीच 76 लष्करी जवानांना माघारी बोलावून घेतले आहे.
सेन्हिया लष्करी रुग्णालयातील भारतीय डॉक्टरांना मात्र माघारी पाठवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे मालदीवच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सध्याच्या सरकारमधील मंत्री गेली पाच वर्षे विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन सरकारवर टीका करत एमएनडीएफमध्ये सक्षम वैमानिक असल्याचा दावा केला होता. आता मात्र संरक्षणमंत्री घसन मौमून यांचे वक्तव्य विरोधाभास दाखवून देणारे आहे असे अधाधु.कॉमच्या बातमीत नमूद केले आहे.
माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद आणि अब्दुल्ला यामीन यांच्या सरकारच्या काळात भारताकडून दोन हेलिकॉप्टर्स तर माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या सरकारच्या काळात एका डॉर्नियर विमानासह भारतीय सैनिकांचे मालदीवला आगमन झाले होते. याचे मुख्य कारण मालदीवच्या सैनिकांना प्रशिक्षण देणे हे होते, असेही त्या बातमीत म्हटले आहे.
आजपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात मालदीवच्या सैन्याला अपयश आले असले तरी, आता भारतीय सैनिकांच्या जागी नियुक्त करण्यात आलेल्या सक्षम भारतीय तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या करारामध्ये स्थानिक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याच्या तरतुदींचा समावेश करण्यात असल्याचे मालदीवचे परराष्ट्रमंत्री जमीर यांनी शनिवारी सांगितले.
आराधना जोशी
(वृत्तसंस्था)