मेक्सिकोमध्ये पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेक्सिकन मतदारांनी रविवारी ऐतिहासिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्यासाठी त्यांना प्रदीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली. या निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार, डाव्या विचारसरणीच्या क्लॉडिया शेनबॉम देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनतील अशी अपेक्षा आहे.
यावेळच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन मोठे उमेदवार रिंगणात आहेत. मेक्सिकोच्या सत्ताधारी मोरेना पक्षाकडून क्लॉडिया शेनबॉम, विरोधी पक्ष नॅशनल ॲक्शन पार्टीकडून (PAN) झोचिल गाल्वेझ तर नागरिक चळवळीकडून जॉर्ज अल्वारेझ मिनाज असे उमेदवार उभे आहेत.
अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत ३ टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या मतमोजणीनुसार क्लॉडिया शेनबॉम यांना 60 टक्के मते मिळाली आहेत, झोचिल गाल्वेझ यांना 28 टक्के तर जॉर्ज अल्वारेझ मिनाज यांना 9 टक्के मते मिळाली आहेत.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्याही एका महिलेचा होणारा विजय हा मॅचो संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मेक्सिकोसाठी एक क्रांतीकारक निर्णय ठरणार आहे. नव्या अध्यक्षांचा कार्यकाळ 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तो सहा वर्षांसाठी असेल. नव्या राष्ट्राध्यक्षांना गुन्हेगारी हिंसाचार हाताळण्याबरोबरच प्रचंड आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
रविवारी सकाळी मतदानासाठी जात असताना, शेनबॉम यांनी पत्रकारांना सांगितले की हा एक “ऐतिहासिक दिवस” आहे आणि याबद्दल आपल्याला सहजसोपे आणि समाधानी वाटत आहे.
भौतिकशास्त्रज्ञ आणि मेक्सिको सिटीचे माजी महापौर असलेल्या शेनबॉम यांनी स्थानिक दूरचित्रवाणीवर सांगितले की, “प्रत्येकाने मतदान करण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे.”
एक व्यावसायिक महिला आणि सिनेटर असलेल्या गॅल्वेझ यांनी मतदान सुरू झाल्यानंतर लगेचच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचल्यावर तिथे उपस्थित असलेल्या आपल्या समर्थकांशी गप्पा मारल्या.
“देव माझ्याबरोबर आहे,” असे सांगताना गॅल्वेझ म्हणाल्या की आजचा दिवस अतिशय कठीण असणार आहे.
शेनबॉम यांचे मार्गदर्शक आणि वर्तमान राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी आपल्या पत्नीसह मतदान करण्यासाठी राष्ट्रपती भवनातून चालत असताना समर्थकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत काही छायाचित्रांसाठी पोझ दिली.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 वाजता (14.00 जीएमटी) मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर काही ठिकाणी मतदान उशीरा सुरू झाल्याचे वृत्त होते.
‘मला हे एखाद्या स्वप्नासारखे वाटते. मी कधीही कल्पना केली नव्हती की एक दिवस मी एका स्त्री उमेदवाराला मतदान करेन,” असे मेक्सिकोच्या सर्वात लहान राज्यातील ट्लॅक्सकाला येथील शेनबॉम समर्थक 87 वर्षीय एडलमिरा मॉन्टियल म्हणाल्या. “आधी आम्ही मतदानही करू शकत नव्हतो आणि जेव्हा तुम्हाला ते शक्य होते, तेव्हा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला ज्या व्यक्तीला मतदान करण्यास सांगितले होते त्यालाच मतदान करायचे ही पद्धत होती. मी देवाचे आभार मानते की हे सगळे आता बदलले आहे आणि मला त्याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे,” असेही मॉन्टियल पुढे म्हणाल्या.
प्रचार मोहिमेत प्रचंड हिंसाचार झाला आहे. शनिवारी रात्री स्थानिक उमेदवारावर बेछूट गोळीबार करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. आतापर्यंत 38 उमेदवारांची हत्या करण्यात आली आहे. मेक्सिकोच्या आधुनिक इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे अमली पदार्थांच्या टोळीशी लढण्याचे मोठे संकट मेक्सिकोच्या लोकशाहीसमोर निर्माण झाले आहे.
रविवारी झालेल्या निवडणुकीत 500 महापौर आणि 128 सिनेटसाठी 10 कोटी लोकांनी एकत्र मतदान केले. हा एक विक्रमच असल्याचे मानले जात आहे.
मतदान स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता (सोमवारी 00.00 जीएमटी) संपले. मेक्सिकोमध्ये शेवटच्या सार्वत्रिक निवडणुका 2018 मध्ये पार पडल्या होत्या. त्यावेळी सुमारे 150 लोकांची हत्या करण्यात आली होती.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)