संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांची आयएनएस चिल्काला भेट
दि. ०३ जून: तंत्रनिपूण सागरी योद्धे घडविण्यासाठी अग्निवीर योजना अतिशय महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन संरक्षणदलप्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी केले. भारतीय नौदलाची प्राथमिक प्रशिक्षण संस्था असलेल्या ‘आयएनएस चिल्का’ला जनरल चौहान यांनी भेट दिली. या भेटीत तेथे सुरु असलेल्या अग्निवीर प्रशिक्षणाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
General Anil Chauhan, #CDS visited #INS_Chilka, the premier ab-initio training establishment of #IndianNavy & was briefed on its pivotal role in shaping future #SeaWarriors.#CDS elucidated the HR reformatory process undertaken by #IndianArmedForces and exhorted the #Agniveers to… pic.twitter.com/N4cP3RfAAn
— HQ IDS (@HQ_IDS_India) June 2, 2024
भारतीय नौदलाची प्राथमिक प्रशिक्षण संस्था असलेल्या ‘आयएनएस चिल्का’ येथे भारतीय नौदलासाठी भविष्यातील सागरी योद्धे घडवण्यासाठी सुरु असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती या वेळी जनरल चौहान यांना देण्यात आली. त्याचबरोबर ‘आयएनएस चिल्का’च्या बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दलही त्यांना अवगत करण्यात आले. या वेळी जनरल चौहान यांनी येथे सुरु असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची पाहणी केली आणि मौल्यवान सूचनाही केल्या. तसेच, अग्निवीर प्रशिक्षणासाठीच्या विविध उपक्रमांचा आढावाही घेतले. या वेळी आयएनएस चिल्का येथे आजपर्यंत प्रशिक्षित केलेल्या तुकड्यांचे विश्लेषण जनरल चौहान यांच्यासमोर सादर करण्यात आले.
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी यावेळी अग्निवीरांना संबोधित केले. ‘लष्करी सेवांचा चेहरामोहरा तरुण राखण्यात आणि कुशल, अनुशासित प्रेरित युवा घडवून राष्ट्र उभारणीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ‘अग्निपथ योजना’ सुरू करण्यात आली आहे. तंत्रज्ञानदृष्ट्या निपुण नौसैनिक होण्यासाठी प्रशिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे गरज आहे,’ असे आवाहन त्यांनी अग्निवीरांना केले. भविष्यातील युद्ध प्रामुख्याने तंत्रज्ञानाच्या आधारे लढले जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान अवगत करून घेणे आणि त्यात निपुण होणे, ही भविष्यातील सर्वच प्रकारच्या योद्ध्यांसाठी अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे प्रशिक्षण काळात तुम्ही जितका अधिक घाम गालाळ तितके कमी रक्त युद्धभूमीवर सांडावे लागेल. भविष्यातील युद्धे केवळ शस्त्र आणि लष्करी व्यूहरचना या आधारेच लढली जाणार नाहीत, तर त्यात अवकाश, सायबर, माध्यमे आशा सर्वच बाबीनाचा समावेश असणार आहे. त्यामुळे पारंपरिक युद्धाचे स्वरूपही बदलणार आहे, असेही जनरल चौहान यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी अग्निवीर योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या युवकांनी जनरल चौहान यांना विविध प्रश्नही विचारले. त्याची समर्पक उत्तरे त्यांनी दिली.
नौदलातील अग्निवीर प्रशिक्षणाची माहिती मिळवण्याबरोबरच जनरल अनिल चौहान यांनी प्रशिक्षण विषयक पायाभूत सुविधांचाही आढावा घेतला. उच्च दर्जाचे प्रशिक्षण देत असल्याबद्दल आणि सागरी योद्धांच्या पुढील पिढीला घडवण्यात मोलाची भूमिका बजावत असल्याबद्दल त्यांनी प्रशिक्षकांचे कौतुक केले.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)