इस्रायलची राजधानी जेरुसलेमची लोकसंख्या तेल अवीवपेक्षा दुप्पट

0
इस्रायलची
जेरुसलेम दिन साजरा करताना (फाईल फोटो - रॉयटर्स)

इस्रायलची राजधानी जेरुसलेमची लोकसंख्या तेल अवीवच्या दुप्पट असल्याचे सांगितले जाते. जेरुसलेम दिनापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वार्षिक अहवालानुसार, जेरुसलेम लोकसंख्येच्या बाबतीत इस्रायलचे दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आता पहिल्या क्रमांकाचे शहर बनले आहे. तेल अवीवच्या तुलनेत इथली लोकसंख्या दुप्पटीने वाढल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. येथे 10 लाखांहून अधिक लोक राहतात. जेरुसलेम इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात, 2022च्या जनगणना आकडेवारीनुसार, जेरुसलेमची लोकसंख्या 10 लाख 05 हजार 900 आहे, जी तेल अवीवच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे.

अहवालानुसार, इस्रायल संरक्षण दल (आयडीएफ) आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धातून सुटण्यासाठी हजारो नागरिक देशाच्या वेगवेगळ्या भागांत पळून गेले आहेत. गाझा सीमावर्ती भाग किंवा लेबनॉनच्या सीमेजवळून बाहेर काढलेले 13 हजार 800 नागरिकांनी जेरुसलेममध्ये आश्रय घेतला आहे. काही काळापुरते जेरुसलेममध्ये आश्रयाला आलेल्या या नागरिकांचीही गणना 10 लाखांच्या लोकसंख्येत केलेली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की शैक्षणिक वर्ष 2022-2023 दरम्यान जेरुसलेमच्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये 41 हजार 300 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. विद्यार्थ्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

जेरुसलेम इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी रिसर्चच्या अहवालात नोकरी शोधणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये 26 हजार नागरिक नोकरीच्या शोधात होते. कामगार वर्गाच्या श्रेणीत अरब महिलांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण यात मांडले आहे. कार्यालयांमधील कामकाजात महिलांचा सहभाग 29 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या अहवालानुसार, 2023 मध्ये जेरुसलेममध्ये 5 हजार 800 अपार्टमेंटसाठी बांधकाम सुरू झाले. गेल्या 38 वर्षांपासून अशाप्रकारचा अहवाल प्रसिद्ध करत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

या अहवालानुसार, 2022 मध्ये 7 हजार 600 हून अधिक नवीन स्थलांतरित नागरिकांनी जेरुसलेममध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे याच काळात 7 हजार 200 नागरिकांनी जेरुसलेम सोडले. 2023 मध्ये 10 लाखांहून अधिक परदेशी नागरिकांनी जेरुसलेममध्ये रात्रभर मुक्काम केला होता. मात्र ऑक्टोबरमध्ये हमासबरोबर युद्ध सुरू झाल्यानंतर वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ही संख्या 80 टक्क्यांनी कमी झाली. भारतीय वेळेनुसार 4 जूनच्या रात्री जेरुसलेम दिनाची सुरूवात होईल. मंगळवारी रात्री होणारा जेरुसलेम दिन हा 1967 मधील सहा दिवसांच्या युद्धाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. 56 वर्षांपूर्वी झालेल्या  युद्धानंतर जेरुसलेम इस्रायलचा भाग बनले. त्या निमित्ताने  जेरुसलेम दिन साजरा केला जातो.

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून इस्रायल आणि हमास यांच्यात हिंसक संघर्ष सुरू आहे. पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह आतापर्यंत 36 हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत. युद्धग्रस्त भागात बॉम्बस्फोट आणि लष्करी कारवाईत 82 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

आराधना जोशी
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सवरून)


Spread the love
Previous articleTejas Mk1A Flaunts Three Close Combat Missiles for Tactical Superiority
Next articleतंत्रनिपूण सागरी योद्धे घडविण्यासाठी ‘अग्निवीर’ महत्त्वाचे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here