हिंदी महासागर क्षेत्राच्या सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन
दि. १५ जून: संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार सलग दुसऱ्यांदा स्वीकारल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सर्वप्रथम विशाखापट्टणम येथील नौदलाच्या पूर्व विभाग मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानाच संरक्षणमंत्र्यांनी नौदलाच्या सज्जतेचा आढावाही घेतला. त्याचबरोबर हिंदी महासागर क्षेत्राच्या सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
A matter of pride & honour for all personnel of #IndianNavy, as Hon’ble Raksha Mantri Shri @rajnathsingh, after assuming charge for the 2nd consecutive term made his maiden outstation visit to #EasternNavalCommand, Visakhapatnam & reviewed #IndianNavy’s operational readiness… pic.twitter.com/5FqDCa9MuD
— SpokespersonNavy (@indiannavy) June 15, 2024
राजनाथसिंह यांनी शुक्रवारी राजधानीतील साउथ ब्लॉक येथील संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपल्या नव्या कार्यकालातील पहिल्याच अधिकृत भेटीसाठी नौदलाच्या पूर्व विभाग मुख्यालयाचे केंद्र असलेल्या विशाखापट्टणमकडे प्रयाण केले. पूर्व विभाग मुख्यालयात नौदलप्रमुख ॲडमिरल डी. के. त्रिपाठी आणि पूर्व विभाग मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांनी स्वागत केले. नौदलाच्या आयएनएस जलाश्व या नौकेवर नौदलाच्या जवानांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. तेथे त्यांनी नौदलाच्या पूर्व ताफ्यातील अधिकारी आणि जवानांशी नौदल सज्जता, हिंदी महागर क्षेत्राची सुरक्षा आणि भारतीय नौदलाची भूमिका आदी विषयांवर चर्चा केली. या मध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या भागात भारतीय नौदलाने आपली मजबूत आणि प्रभावी उपस्थिती सिद्ध केली आहे, असे सांगून त्यांनी नौदलाच्या अधिकारी, जवानांची प्रशंसा केली. भारताचे आर्थिक आणि व्यापारी हितसंबंध हिंदी महासागर क्षेत्राशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे रक्षण करणे हे भारतीय नौदलाची प्राथमिक आणि सर्वांत महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे या क्षेत्राची सागरी सुरक्षा अधिक बळकट करणे आणि आपली उपस्थिती अधिक दृश्य आणि बळकट करीत जाणे गरजेचे आहे. या क्षेत्रात भारतीय नौदलाची नाविक शक्ती इतरांना दिसली पाहिजे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
हिंदी महासागर क्षेत्र आणि हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रात भारतीय नौदलाचा दबदबा आहे. मात्र, त्याचबरोबर आव्हानेही आहेत. समुद्री तस्करी, सोमाली चाचांकडून सुरु असलेली चाचेगिरी या मुळे या भागातून होणाऱ्या व्यापारावर परिणाम होत आहे. मात्र, या चाचेगिरीच्या विरोधात भारतीय नौदलाने प्रभावी भूमिका बजाविली आहे. हिंदी महासागर क्षेत्रात ‘फर्स्ट रिस्पॉडर’ म्हणून भारतीय नौदलाकडे पहिले जाते, हे अभिमानास्पद आहे, असेही संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले. या वेळी त्यांनी दक्षिण चीन समुद्रात सामरिक तैनातीच्या काळातील नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या कामगिरीचेही कौतुक केले. या भागातील विविध देशांच्या नौदलाबरोबर संबध वृद्धीमुळे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाला चालना मिळेल आणि विभागातील सर्वच देशांच्या एकत्रित वृद्धी आणि सुरक्षेला बळकटी देण्याच्या भारताच्या ‘सागर’ धोरणाचीही पुष्टी होईल, असे त्यांनी सांगितले.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)