इस्रायल – हमास संघर्ष हा मानवजातीसाठी एखाद्या शोकांतिकेपेक्षा कमी नाही. या संघर्षाने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहेच शिवाय हे युद्ध पर्यावरणासाठीही हानीकारक बनल्याचे सिद्ध होत आहे. युद्धाच्या पहिल्या 120 दिवसांत नष्ट झालेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीमुळे 60 दशलक्ष टन कार्बन डाय ऑक्साईड इतके उत्सर्जन होत आहे. या युद्धामुळे गाझामधील पाणी, माती आणि हवा या नैसर्गिक स्रोतांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबरोबरच, आसपासच्या भागातील रहिवाशांच्या आयुष्याचा प्रत्येक पैलू प्रदूषित पाण्याच्या पुरवठ्यापासून ते जळत्या इमारती आणि मृतदेहांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे प्रदूषित झाला आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या संघर्षात गेल्या आठ महिन्यांत गाझामध्ये 37 हजार 347 नागरिक मृत्यूमुखी पडले आहे. तर गाझा पट्टीत 85 हजार 372 नागरिक जखमी झाले आहेत. या संघर्षामुळे आतापर्यंत लाखो लोकांचे विस्थापन झाले आहे. तर सुमारे 1 हजार 600 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असून, जखमींची संख्या 14 हजारांवर पोहोचली आहे.
लँकेस्टर विद्यापीठ, लंडन क्वीन मेरी विद्यापीठ, घानातील ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने विद्यापीठ, धर्मादाय संस्था कॉन्फ्लिक्ट अँड एन्व्हायर्नमेंट ऑब्जर्वेटरी आणि थिंक टँक क्लायमेट अँड कम्युनिटी प्रोजेक्टच्या संशोधकांनी युद्धाच्या कार्बन प्रभावाचा अंदाज घेण्यासाठी ‘मल्टीटेम्पोरल स्नॅपशॉट ऑफ ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स फ्रॉम द इस्रायल गाझा वॉर कॉन्फ्लिक्ट’ हा शोधनिबंध तयार केला आहे.
या अभ्यासाशी संबंधित संशोधक पॅट्रिक बिग्गर म्हणतात की, या सशस्त्र संघर्षाने जगाला विनाशकारी उष्णतेच्या काठावर ढकलले आहे. संघर्षांचे हवामानावरील परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि मर्यादित करण्यासाठी हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शनद्वारे (यूएनएफसीसीसी) लष्करी उत्सर्जनाबाबतचा अहवाल त्वरित देण्याचे आवाहन या अहवालात करण्यात आले आहे.
या संशोधन अहवालानुसार, इस्रायल-गाझा संघर्षाच्या पहिल्या 120 दिवसांत कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण सुमारे 26 देशांच्या वार्षिक उत्सर्जनापेक्षा जास्त होते. त्यासोबत जर या काळात इस्रायल आणि हमासने केलेल्या युद्धाशी संबंधित बांधकामांचाही समावेश केला तर हे उत्सर्जन 36 देशांच्या एकूण उत्सर्जनापेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या पहिल्या 120 दिवसांत, युद्धाशी संबंधित थेट उत्सर्जनाची सरासरी 5 लाख 36 हजार 410 टन कार्बन डाय ऑक्साईड (सीओ2) इतकी समतुल्य होती, जी 6 लाख 52 हजार 552 टनपर्यंत वाढू शकते. या काळात मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले, हेरगिरीसाठी करण्यात आलेली उड्डाणे यांसह रॉकेट हल्ले आणि लष्करी हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली.
अभ्यासाच्या निष्कर्षात असे म्हटले आहे की अशा प्रकारे जागतिक कार्बन उत्सर्जनापैकी सुमारे साडे दहा टक्के उत्सर्जनासाठी लष्करी संघर्ष जबाबदार आहेत. तरीही या उत्सर्जनाची अनेकदा मोठ्या प्रमाणात नोंद घेतली जात नाही. संशोधकांनी पाणी आणि हवे द्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचा मागोवा घेऊन हवामानाच्या गणनेत त्याचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले आहेत.
क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनचे प्राध्यापक आणि प्रमुख संशोधक डॉ. बेंजामिन नेमार्क म्हणतात की, जग हवामान बदल आणि लष्करी संघर्ष अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत, युद्धाचे पर्यावरणावर होणारे परिणाम समजून घेणे आणि ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्वाचे आहे.
आराधना जोशी