अमेरिकन रिपब्लिकन पक्षाकडून उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जे. डी. व्हान्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी टिम वाल्झ यांच्यात 1 ऑक्टोबर रोजी सीबीएसवर डिबेट रंगणार आहे. व्हान्स यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये सांगितले की त्यांनी या तारीखेला मान्यता दिली आहे.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडलेले त्यांचे सहकारी व्हान्स यांनीही सांगितले की, त्यांनी 18 सप्टेंबर रोजी देखील वाल्झ यांच्याशी डिबेट करण्यासाठी सीएनएनचे आमंत्रण स्वीकारले आहे. आपल्या पोस्टमध्ये, व्हान्स यांनी लिहिले, “अमेरिकन लोकांसमोर शक्य तितक्या डिबेट होणं अत्यावश्यक आहेत.”
मात्र उपराष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवारांमध्ये दुसरी डिबेट होणार नसल्याचे हॅरिस यांच्या प्रचारमोहिमेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या अध्यक्षीय डिबेटची योजना आखत असल्याच्या बातमीला त्यांनी पुष्टी दिली.
प्रचार मोहिमेचे प्रवक्ते मायकेल टायलर म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेने दोन अध्यक्षीय आणि उपाध्यक्षीय अशा तीन चर्चांसाठीचा आमचा प्रस्ताव स्वीकारला आहे.”
हॅरिस आणि ट्रम्प यांच्यातील डिबेट 10 सप्टेंबर रोजी एबीसी न्यूज चॅनलवर होणार आहे. टायलर यांनी सांगितले की, त्यांची दुसरी डिबेट ऑक्टोबरमध्ये होईल. ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेने अद्याप त्या वेळेची पुष्टी केलेली नाही. तसेच दुसऱ्या चर्चेसाठी तारीख आणि कोणत्या न्यूज चॅनेलवर डिबेट प्रसारित होणार आहे याची कोणतीही घोषणा केलेले नाही.
रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक प्रचारादरम्यान अशा डिबेट्ना उपस्थित राहण्यास ट्रम्प यांनी नकार दिला होता. याशिवाय डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या जागी कमला हॅरिस यांची निवड झाल्यानंतर एबीसी चॅनलवर होणारी डिबेट वगळण्याची सूचना केली होती. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांनी एबीसी कडून आयोजित केल्या जाणाऱ्या डिबेटमध्ये भाग घेण्यास सहमती दर्शवली असून सप्टेंबरमध्ये फॉक्स आणि एनबीसी चॅनल्सवर आणखी दोन डिबेट व्हाव्यात असा प्रस्ताव दिला आहे.
ट्रम्प आणि बायडेन यांच्यात जूनमध्ये एक डिबेट झाली होती, ज्यात विद्यमान राष्ट्राध्यक्षांची कामगिरी इतकी खराब होती की अखेरीस ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले.
ओहायो येथील अमेरिकन सिनेटर व्हान्स आणि मिनेसोटाचे गव्हर्नर वाल्झ यांच्यात उमेदवारी जाहीर झाल्यावर शाब्दिक चकमक घडली आहे. हॅरिस यांनी गेल्याच आठवड्यात वाल्झ यांची उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून नियुक्ती केली.
जुलैच्या उत्तरार्धात कमला हॅरिस यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या प्रवेशामुळे अध्यक्षपदाच्या स्पर्धेचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. सध्याच्या जनमत चाचण्यांचा कल बघता हॅरिस यांनी 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीचा निकाल ठरवण्याची शक्यता असलेल्या अर्धा डझन राज्यांमधील ट्रम्प यांची आतापर्यंतची आघाडी कमी केली आहे. हॅरिस यांच्या नियुक्तीने डेमोक्रॅटिक पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाला असून पक्षाने आतापर्यंत कोट्यवधी डॉलर्सचा निधी जमा केला आहे.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्स)