गाझामधील नव्या शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून अधिकृतपणे सुरूवात झाली असली तरी गेले 11 महिने सुरू असलेल्या युद्धामुळे सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात युद्धविराम होण्याची कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.
पॅलेस्टिनी प्रदेशावर सुरू असलेल्या हल्ल्यात इस्रायलने इस्रायलवर डागण्यात आलेल्या रॉकेटच्या प्रत्युत्तरात उत्तर गाझा पट्ट्यातील रहिवाशांना त्यांची घरे सोडण्याचे नवीन आदेश जारी केले.
पॅलेस्टिनी शिक्षण मंत्रालयाने सांगितले की गाझाच्या सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायली शहरांवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इस्रायलने या प्रदेशावर केलेल्या हल्ल्यात 90 टक्के शाळा नष्ट झाल्या किंवा त्यांचे जबरदस्त नुकसान झाले आहे.
गाझामधील सुमारे निम्म्या शाळा चालवणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पॅलेस्टिनी मदत संस्थेने (यूएनआरडब्ल्यूए) त्यापैकी शक्य तितक्या शाळांचे रूपांतर हजारो विस्थापित कुटुंबांसाठी आवश्यक अशा आपत्कालीन निवाऱ्यांमध्ये केले आहे.
यूएनआरडब्ल्यूएच्या संवाद संचालिका ज्युलियेट टौमा यांनी रॉयटर्सला सांगितले की, “मुले जितका जास्त काळ शाळेबाहेर राहतील तितके अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची पूर्तता करणे त्यांच्यासाठी अधिक कठीण होईल. याशिवाय बालविवाह, बालमजुरी आणि सशस्त्र गटांमध्ये होऊ शकणारी संभाव्य भरती यासह शोषणाला बळी पडणारी अशी ही पिढी बनण्याची शक्यता अधिक आहे.”
शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, शाळेच्या प्रवेशासाठी आधीच नोंदणी केलेल्या 6 लाख 25 हजार गाझाच्या नवीन विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, युद्धामुळे ज्यांची शाळाच बंद झाली अशा सहा वर्षांच्या आणखी 58 हजार विद्यार्थ्यांनी यावर्षी पुन्हा पहिल्या इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केली असावी.
गेल्या महिन्यात, यूएनआरडब्ल्यूएने आपल्या 45 आपात्कालीन निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या मानसिक आरोग्याला मदत करण्यासाठी शिक्षकांकडून खेळ, नाटक, कला, संगीत आणि क्रीडा अशा विविध उपक्रमांची मांडणी करून, ‘बॅक-टू-लर्निंग’ कार्यक्रम सुरू केला.
‘निर्देशित क्षेत्रासाठी इशारा जारी’
गाझामधील जवळपास सर्वच म्हणजे 23 लाख नागरिकांना किमान एकदा तरी त्यांची घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे. काहींना तर 10 वेळा पळून जावे लागले आहे.
आदल्या दिवशी दक्षिण इस्रायलमध्ये रॉकेट डागल्यानंतर उत्तर गाझा पट्ट्यातील रहिवाशांनी त्यांची घरे सोडली पाहिजेत असा निर्वासन आदेश इस्रायलने नुकताच जारी केला आहे.
“निर्दिष्ट क्षेत्रातील सर्व नागरिकांसाठी. दहशतवादी संघटना पुन्हा एकदा इस्रायलवर रॉकेट हल्ले करत असून, या भागातून परत एकदा दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आहेत. निर्दिष्ट क्षेत्राला यापूर्वी अनेक वेळा इशारा देण्यात आला आहे. विशिष्ट क्षेत्र धोकादायक लढाऊ क्षेत्र मानले जाते,” असे इस्रायली लष्करी प्रवक्त्याने एक्सवर अरबी भाषेत सांगितले.
संयुक्त राष्ट्रांनी उत्तर गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनींना आपल्या 10 वर्षांखालील मुलांचे पोलिओचे लसीकरण करून घेण्यासाठी वैद्यकीय सुविधा केंद्रांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सुमारे 25 वर्षांत या भागातील पहिल्या पोलिओ प्रकरणानंतर गाझामधील 6 लाख 40 हजार मुलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असलेल्या लसीकरण मोहिमेला परवानगी देण्यासाठी युद्धात मर्यादित विराम घेण्यात आले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दक्षिण आणि मध्य गाझा पट्ट्यातील पोलिओ मोहीम आतापर्यंत तेथील निम्म्याहून अधिक मुलांपर्यंत पोहोचली आहे ज्यांना त्याची गरज आहे. पहिल्या लसीकरणानंतर चार आठवड्यांनी लसीकरणाची दुसरी फेरी होणे गरजेचे आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, मध्य गाझामध्ये दोन वेगवेगळ्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये सात लोक ठार झाले, तर आणखी एका हल्ल्यात खान युनूस येथे दक्षिणेकडे एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
हमास आणि इस्लामिक जिहादच्या सशस्त्र दलांनी सांगितले की त्यांनी गाझा पट्ट्यातील अनेक भागात इस्रायली सैन्याच्या विरोधात रणगाडेविरोधी रॉकेट आणि तोफगोळ्यांचा मारा केला.
इस्रायली सैन्याने सांगितले की सैन्याने लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करणे सुरूच ठेवले असून गेल्या काही दिवसांत हमास आणि इस्लामिक जिहादच्या वरिष्ठ कमांडरांसह डझनभर दहशतवाद्यांना ठार केले आहे.
7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाले जेव्हा गाझावर राज्य करणाऱ्या हमास गटाने इस्रायलवर हल्ला केला. इस्त्रायली आकडेवारीनुसार यात 1200 नागरिक मारले गेले तर सुमारे 250 नागरिकांना ओलिस म्हणून हमासने ताब्यात घेतले, गाझावरील इस्रायलच्या त्यानंतरच्या हल्ल्यात 40 हजार 900हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, असे एन्क्लेव्हच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
लढाई संपुष्टात आणून ओलिसांची सुटका करणाऱ्या युद्धविरामापर्यंत पोहोचण्यात आतापर्यंत आलेल्या अपयशासाठी युद्धातील दोनही पक्ष एकमेकांना दोष देत आहेत.
अनुकृती
(रॉयटर्स)