भारत-फिलिपाईन्स संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या (जेडीसीसी) पाचव्या बैठकीच्या सहअध्यक्षतेसाठी संरक्षण सचिव गिरिधर अरमाने 11 सप्टेंबर 2024 रोजी मनिलाला भेट देणार आहेत. फिलिपिन्सच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अवर सचिव इरिनिओ क्रूझ एस्पिनो या बैठकीच्या सह-अध्यक्षस्थानी असतील.
या दौऱ्यादरम्यान, संरक्षण सचिव दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या हेतूने चर्चा करतील. फिलिपिन्स सरकारच्या इतर मान्यवरांचीही ते भेट घेतील.
भारत आणि फिलीपिन्सच्या राजनैतिक संबंधांची 75 वर्षे आणि भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाची 10 वर्षे पूर्ण होण्याचा उत्सव साजरा होत असताना संरक्षण सचिवांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही देशांचे संबंध मजबूत आणि बहुआयामी आहेत. या दृढ संबंधांचा संरक्षण आणि सुरक्षेसह अनेक धोरणात्मक क्षेत्रात विस्तार झाला आहे. संरक्षण उत्पादनात स्वावलंबनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दोन्ही देश एकमेकांना समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहेत.
2006 मध्ये दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य कराराच्या कक्षेत संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची (JDCC) स्थापना करण्यात आली आहे. संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीची चौथी आवृत्ती मार्च 2023 मध्ये नवी दिल्ली येथे संयुक्त सचिव स्तरावर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या पाचव्या आवृत्तीत सचिव स्तरावरील व्यक्ती सह-अध्यक्षपद भूषविणार आहे.
शक्तिशाली ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकत घेणारा फिलिपाईन्स हा भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक ठरला आहे. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या सुमारे तिप्पट वेगाने उडते आणि 290 कि. मी. दूरपर्यंतच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकते. दक्षिण चीन समुद्रातील, विशेषतः स्कारबोरो शोल आणि स्प्रॅटली बेटांवरील वादावरून मनिला आणि बीजिंग यांच्यात तणाव वाढत असताना फिलिपिनो लष्कराला हे क्षेपणास्त्र मिळाले आहे. देशाच्या लष्करालाही ही प्राणघातक क्षेपणास्त्रे मिळण्याची शक्यता आहे.
फिलिपिन्स आपल्या हवाई दलाला बळकट करू इच्छित असल्याने भारताने फिलिपिनो हवाई दलाला तेजस लढाऊ विमानेही देऊ केली आहेत. एएलएच ध्रुव आणि डीओ 228 यासारखी हलकी वाहतूक विमाने मनिलाला विकण्यास भारत उत्सुक आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, फिलिपिनो तटरक्षक दलाने त्यांना सात ध्रुव आणि आठ डीओ 228 विमानांच्या संदर्भात विचारणा केली आहे.
या प्रदेशातील तणाव वाढत असताना, फिलिपिन्स भारताकडे एक विश्वासार्ह धोरणात्मक भागीदार म्हणून पाहतो कारण दोन्ही देश या प्रदेशाकडे आंतरराष्ट्रीय जलमार्गातील नौवहन स्वातंत्र्याच्या तत्त्वांमध्ये रुजलेल्या समान दृष्टीकोनातून बघतात. अर्थात चीन या प्रदेशात स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)