एमपॉक्सच्या प्रादुर्भावामुळे आफ्रिकेत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी

0
काँगोमधील निर्वासित छावणीत एमपॉक्सच्या जखमा असलेला एक रुग्ण. (रॉयटर्सच्या एका व्हिडिओचा स्क्रीनग्रॅब)

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोपासून शेजारील देशांमध्ये पसरलेल्या एमपॉक्सच्या उद्रेकामुळे आफ्रिकेच्या सर्वोच्च सार्वजनिक आरोग्य संस्थेने मंगळवारी ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केली.

आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (आफ्रिका सीडीसी) गेल्याच आठवड्यात विषाणू संसर्ग प्रसाराचा इशारा दिला होता. निकट संपर्कातून पसरणाऱ्या या विषाणूजन्य संसर्गामुळे फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. शिवाय पसने (पू) भरलेल्या जखमा होतात.

बहुतेकदा लक्षणे सौम्य असतात परंतु नंतर ती प्राणघातक ठरू शकतात.

“आमच्या वैद्यकीय संस्था, आमची सामूहिक इच्छाशक्ती आणि आमची साधने यांनी एकत्रितरीत्या वेगाने आणि निर्णायकपणे कार्य करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच आम्ही आज देशाची सुरक्षा लक्षात घेऊन ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करतो,” असे महासंचालक जीन कासेया यांनी झूमवर थेट प्रसारित केलेल्या ब्रीफिंगमध्ये सांगितले.

काँगोमध्ये या आजाराच्या उद्रेकाची सुरुवात क्लॅड वन नावाने स्थानिक पातळीवरील प्रसाराने झाली. परंतु क्लॅड आयबी म्हणून ओळखला जाणारा नवीन प्रकार, नियमित होणाऱ्या निकट संपर्कामुळे, विशेषतः मुलांमध्ये, अधिक सहजतेने पसरत असल्याचे दिसून आले.

कासेया यांनी ब्रीफिंगमध्ये सांगितले की संपूर्ण आफ्रिका खंडाला लसीच्या 1 कोटीहून अधिक मात्रा हव्या आहेत, परंतु सध्या केवळ  2 लाख लसीच उपलब्ध आहेत. सीडीसी आफ्रिका खंडातील पुरवठा त्वरित वाढवण्यासाठी काम करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

“आफ्रिकेत एक कोटीहून अधिक लसी उपलब्ध करण्याबाबत आमची स्पष्ट योजना आहे, ज्याची सुरुवात 2024 मध्ये 30 लाख लसींपासून होईल,” असे ते म्हणाले. मात्र या लसींचा एवढा पुरवठा नेमका कुठून होईल याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

आरोग्य संस्थेने सांगितले की या वर्षी खंडात आतापर्यंत 15 हजारांहून अधिक एमपॉक्सची प्रकरणे आणि 461 मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांच्या तुलनेत यंदा यात 160 टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण 18 देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात येत आहे.

1970 मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये माणसांमध्ये पहिल्यांदा एमपॉक्सचे विषाणू आढळल्यानंतर गेली अनेक दशके आफ्रिकेच्या काही भागांमध्ये हा आजार स्थानिक म्हणून ओळखला जातो.

या विषाणूची सौम्य आवृत्ती 2022 मध्ये शंभरहून अधिक देशांमध्ये पसरली होती. मुख्यतः सेक्सच्या माध्यमातून हा विषाणूची बाधा झाल्यानंतर  जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करणे भाग पडले. आणीबाणी घोषित करणे म्हणजे संबंधित रोगाचे संकट सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे असे मानले जाते.

10 महिन्यांनंतर संकट नियंत्रणात आले आहे असे सांगून डब्ल्यूएचओने आणीबाणी मागे घेतली.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) प्राणघातक नव्या वेरिएंटबद्दल चिकित्सक आणि आरोग्य विभागांना सूचित करण्यासाठी गेल्याच आठवड्यात दुसरा आरोग्य इशारा जारी केला आहे.

याशिवाय गेल्या आठवड्यात, आफ्रिका सीडीसीला आफ्रिका युनियनकडून एमपॉक्सच्या निवारणासाठी1 कोटी 44 लाख अमेरिकन डॉलर्सचा आपत्कालीन निधी देण्यात आला आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयेसस यांनी काँगोमधील उद्रेकानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील सार्वजनिक आरोग्य आणीबाणीबाबत चर्चा करण्यासाठी आपत्कालीन समितीची बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here