ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा, तर थायलंडचा कंबोडियाशी ‘लढाई सुरू ठेवण्याचा’ निर्धार

0
ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम घडवून आणल्याचे सांगितल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये, शनिवारी लढाऊ विमानांनी कंबोडियातील लक्ष्यांवर हल्ले करत  कंबोडियासोबतच्या वादग्रस्त सीमेवर लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार थायलंडच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी फेसबुकवर पोस्ट केले की, हा आग्नेय आशियाई देश “जोपर्यंत आपल्या भूमीला आणि नागरिकांना कोणताही धोका किंवा भीती वाटत रहाणार नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई करत राहील.”

ऑक्टोबरमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमावादात युद्धविराम घडवून आणणाऱ्या ट्रम्प यांनी शुक्रवारी थायलंडचे नेते अनुतिन आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांच्याशी फोनवर चर्चा केली होती आणि त्यांनी “गोळीबार पूर्णपणे थांबवण्यास” सहमती दर्शवल्याचे सांगितले होते.

ट्रम्प यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेनंतर दिलेल्या निवेदनांमध्ये या दोघांनीही कोणत्याही कराराचा उल्लेख केला नाही आणि अनुतिन यांनी कोणताही युद्धविराम झाला नसल्याचे सांगितले.

“मला हे स्पष्ट करायचे आहे. आज सकाळी आमच्या कृतीतूनच हे स्पष्ट झाले आहे,” असे अनुतिन म्हणाले.

सध्या सुरू असलेल्या लढाईबद्दल प्रतिक्रिया मागितल्यावर व्हाईट हाऊसने तात्काळ प्रतिसाद दिला नाही.

हुन मानेट यांनी शनिवारी फेसबुकवरील एका निवेदनात म्हटले आहे की, कंबोडिया ऑक्टोबरमधील करारानुसार निर्माण झालेल्या वादांवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

थायलंड-कंबोडिया संघर्ष

सोमवारपासून, कंबोडिया आणि थायलंड 817 किलोमीटर (508 मैल) लांबीच्या सीमेवरील अनेक ठिकाणी मोठ्या शस्त्रास्त्रांनी गोळीबार करत आहेत. जुलै महिन्यातील पाच दिवसांच्या संघर्षानंतरची ही सर्वात भीषण लढाई आहे. ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी फोनवर बोलून तो संघर्ष थांबवला होता.

ज्यांनी आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळावा असे वारंवार म्हटले आहे, ते ट्रम्प थायलंड आणि कंबोडिया यांच्यात युद्धविराम व्हावा यासाठी पुन्हा एकदा हस्तक्षेप करण्यास उत्सुक आहेत. गेल्या महिन्यात एका थाई सैनिकाला भूसुरुंगामुळे गंभीर दुखापत झाल्यानंतर थायलंडने हा युद्धविराम स्थगित केला होता. बँकॉकच्या म्हणण्यानुसार, हे भूसुरुंग कंबोडियाने नव्याने पेरले होते.

ऑगस्टमध्ये ट्रम्प यांना शांतता पुरस्कारासाठी नामांकित करणाऱ्या कंबोडियाने भूसुरुंगाच्या आरोपांचे खंडन केले आहे.

‘तो अपघात नव्हता’

शनिवारी, थायलंडच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते, रिअर ॲडमिरल सुरासंत कोंगसिरी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सात सीमावर्ती प्रांतांमध्ये चकमकी झाल्या आहेत आणि कंबोडियाने मोठ्या शस्त्रास्त्रांनी गोळीबार केला आहे, ज्यामुळे थायलंडला प्रत्युत्तर देणे आवश्यक झाले.

कंबोडियाच्या माहिती मंत्रालयाने सांगितले की, थाई सैन्याने रात्रभरात पूल आणि इमारतींवर हल्ले केले, तसेच एका नौदल जहाजातून तोफगोळे डागले.

थाई सैनिकांना जखमी करणारा ‘रस्त्याच्या कडेला लावलेला बॉम्ब’ हा एक अपघात होता असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मात्र थाई नेते अनुतिन यांनी ट्रम्प यांचे हे विधान फेटाळून लावले आणि म्हटले आहे की, ही घटना ‘निश्चितपणे रस्त्यावरील अपघात नव्हती’.

कंबोडियाचे हुन मानेट म्हणाले की, त्यांनी अमेरिका आणि मलेशियाला, जे शांतता चर्चेत मध्यस्थ आहेत, त्यांच्या गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या क्षमतांचा वापर करून, लढाईच्या ताज्या फेरीत ‘प्रथम कोणत्या बाजूने गोळीबार केला’ गेला याची पडताळणी करण्यास सांगितले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleकेप कॅनावेरल येथे स्पेस फोर्सने केली प्रगत ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here