भारतीय हवाई दलाने “हीरोज ऑफ द इंडियन एअर फोर्स-व्हॉल्यूम 1” या 32 पानांच्या कॉमिक बुकचे अनावरण केले आहे. हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग आणि 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान लढल्या गेलेल्या बोयरा संग्रामाची प्रेरणादायी कथा सांगते. हवाई दलाच्या गौरवशाली इतिहासामुळे तरुणांना प्रेरणा मिळावी आणि भारतीय हवाई दलात करिअर करण्याचा विचार करण्यास त्यांना प्रवृत्त करावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बुधवारी आयएएफ प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
गेल्या वर्षी संकल्पित केलेला हा प्रकल्प म्हणजे केवळ सामूहिक प्रयत्न नव्हे तर एअर चीफ मार्शल चौधरी यांनी दाखवलेली दूरदृष्टी देखील आहे.
“युद्धातील हवाई दलाच्या भूमिकेचे आणि राष्ट्रीय इतिहासाचे शौर्यपूर्ण वर्णन हलक्याफुलक्या ढंगाने गोष्टीच्या माध्यमातून केले जावे, हा हवाईदल प्रमुखांचा दृष्टीकोन होता. यामुळे कर्तव्य आणि महत्त्वाकांक्षेची भावना लहान वयातच निर्माण होऊ शकते. सांगितलेली मूल्ये आणि कथांनी प्रेरित होऊन, तरुण वाचक स्वतःला भविष्यातील हवाई दलाचे अधिकारी म्हणून कल्पना करू शकतात,” असे आयएएफने म्हटले आहे.
तरुणांपर्यंत, विशेषतः शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना भारतीय हवाई दलात करिअर करायला प्रेरित करण्यासाठी विनोदी कथेचे पुस्तक हे माध्यम निवडले गेले.
पहिल्या खंडात दोन कथा आहेत-‘फाइंड युअर कॉलिंग’, जी भारतीय हवाई दलाचे पहिले मार्शल बनलेल्या अर्जन सिंग यांची प्रेरणादायी कथा सांगते; तर ‘बॅटल ऑफ बोयर’, ही 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान घडलेल्या आणि भारतीय हवाई दलाच्या युद्ध इतिहासातील एका महत्त्वपूर्ण लढाईची मनोरंजक कथा सांगताना आपल्या सैन्याचे शौर्य आणि देशभक्ती दर्शवणारी आहे.
साहस, प्रेरणा आणि चिकाटी या मूल्यांबद्दल मुलांमध्ये सजगता वाढवणे आणि हवाई दलातील हिरोंच्या पावलावर पाऊल ठेवून पुढील मार्गक्रमण करायला त्यांना मदत मिळावी हे या आकर्षक चित्रकथांचे उद्दिष्ट आहे.
“सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कॉमिक्स आशयाशी भावनिक संबंध निर्माण करतात. संबंधित पात्रे आणि थरारक कथांद्वारे ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि घटना सादर केल्याने, मुलांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळण्याची अधिक शक्यता असते. वास्तविक जीवनातील नायक आणि महत्त्वपूर्ण घटनांचे मनोरंजक स्वरूपातील चित्रण मुलांना इतिहासाची मानवी बाजू पाहण्यास आणि त्याची प्रासंगिकता समजून घेण्यास मदत करते,” असेही निवेदनात म्हटले आहे.
दुसऱ्या कथेचे नाव आहे “द बोयरा बॉईज”. हे भारतीय हवाई दलाच्या युद्धविषयक इतिहासातील एक मोठ्या हवाई लढाईचे वर्णन करते . बोयराची लढाई, जी 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान झाली. या हवाई लढाईत सहभागी क्रमांक 22च्या स्क्वाड्रन ‘स्विफ्ट्स’च्या तरुण वैमानिकांचा पराक्रम आणि धैर्य बघायला मिळाले होते, ज्यामुळे या स्क्वाड्रनला ‘सब्रे स्लेयर्स’ हा मान मिळाला.
“या कथेत विमानचालकांच्या नजरेतून बघितल्यासारखे एड्रेनालाईन-पंपिंग ॲक्शन सीक्वेन्स आहेत, ज्यामुळे वाचकांना प्रत्यक्ष घटना डोळ्यांसमोर घडत असल्याचा अनुभव घेता येतो. ही कथा तरुण वाचकांना एका गंभीर ऐतिहासिक घटनेबद्दल माहिती देते. शिवाय हवाई लढ्याशी संबंधित शौर्यावर भर देते. देशभक्ती, धाडस, व्यावसायिक आणि ‘युवकांच्या’ भावनेचे मूर्त स्वरूप असलेल्या सर्व गोष्टी यात दर्शवण्यात आल्या आहेत. तरुणांसाठी हे थेटपणे विचार कृतीत उतरवण्यासाठीचे आवाहन असल्याचे, आयएएफने म्हटले आहे.
हवाई दलाच्या इतिहास कक्ष तसेच हवाई दलाच्या संग्रहालयाने ऐतिहासिक तथ्ये पुरवण्यात आणि त्यांची पडताळणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर आयएएफच्या समारंभ संचालनालयाने कथांमध्ये वर्णन केलेल्या कालावधीनुसार गणवेशाचे योग्य चित्रण करण्यात आले असल्याची खात्री केली.
या पुस्तकात भारतीय हवाई दलातील करिअरच्या संधी आणि त्यांच्याशी संबंधित पात्रतेच्या निकषांविषयीही माहिती देण्यात आली आहे.
लहान वाचकांसाठी हे पुस्तक मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. विविध कमांड मुख्यालये आणि हवाई दलाची स्टेशन्स यांच्यातर्फे वितरणाचे काम पार पडणार आहे. तर प्रचार संवाद आणि आयपीईव्हीच्या (Induction Publicity Exhibition Vehicle) माध्यमातून पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय कॉमिक बुकची पीडीएफ आवृत्ती डिजिटल मीडियावर विनामूल्य शेअरिंगसाठी देखील उपलब्ध असेल.
टीम भारतशक्ती