हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

0
दहशतवादी हल्ला
दहशतवाद्यांनी गोळीबार केलेली बस

शनिवारी म्हणजे 4 मे रोजी संध्याकाळी 6.15 च्या सुमारास पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. इतर चार जण जखमी झाले आहेत. ताफ्यातील दोन वाहनांपैकी एका वाहनाला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय हवाई दलाचे पाच जवान जखमी झाल्याचे आयएएफच्या प्रवक्त्याने एक्स (आधीचे ट्विटर) या समाज माध्यमावर सांगितले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. घटनेनंतर लगेचच स्थानिक लष्करी तुकड्यांच्या मदतीने परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम राबवली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंदूकधारी दहशतवाद्यांनी सरकारी स्कूलजवळ एमईएस आणि आयएएफच्या वाहनांवर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच हा हल्ला झाल्याने देशातील सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कडक बंदोबस्त तैनात केला आहे. सीमारेषेवरील पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एक दहशतवादी अड्डा उध्वस्त केला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र व दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. बांदीपोरा पोलिसांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करून सांगितले की, ”भारतीय लष्कर-१३  आरआर,  बांदीपोरा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तिसऱ्या बटालियन द्वारे चालवल्या गेलेल्या एका संयुक्त अभियानात उत्तर काश्मीर जिल्ह्यातील चंगाली जंगल अरगाममध्ये एक दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आला आहे. या तळावरून एके सीरीजची एक रायफल, चार मॅगझीन सह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांमधील पीर पंजाल भागात गेल्या दोन आठवड्यांतील हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. २२ एप्रिल रोजी थानमंडीच्या शाहद्रा शरीफ भागात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात एका ४० वर्षीय गावकऱ्याचा मृत्यू झाला. कुंदा टॉप येथील मोहम्मद रझीक असे या व्यक्तीचे नाव असून त्याचा भाऊ प्रादेशिक सैन्यात जवान असल्याची माहिती आहे. २८ एप्रिल रोजी उधमपूरच्या बसंतगढ भागात मोहम्मद शरीफ या ग्रामरक्षकाची हत्या करण्यात आली.

मागील वर्षी २१ डिसेंबर रोजी पुंछमधील देहरा की गली आणि बुफलियाज दरम्यान मुघल रोडवर त्यांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. राजौरीतील बाजीमाल जंगलातील धर्मसाल पट्ट्यात मोठ्या तोफांच्या चकमकीत दोन कॅप्टनसह पाच लष्करी जवानांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आठवडाभरात हा हल्ला झाला.

आराधना जोशी


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here