रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवणारे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅलिफोर्निया येथील रॅलीतील सुरक्षा तपासणी नाक्यावर शनिवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. स्थानिक शेरीफने रविवारी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीजवळ काडतुसे भरलेल्या बंदुका, अनेक पारपत्र आणि बनावट परवाना प्लेट सापडली. सध्या त्याच्यावर अवैधपणे बंदूक जवळ बाळगण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
रिव्हरसाइड काउंटीचे शेरीफ चाड बियांको म्हणाले की त्यांच्या विभागाने हत्येचा प्रयत्न थांबवला असा त्यांचा विश्वास आहे, अर्थात सध्यातरी हा केवळ “अंदाज” असल्याचे त्यांनी मान्य केले. तुरुंगातील नोंदींनुसार संशयिताला शनिवारी जामिनावर सोडण्यात आले. एका फेडरल अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, फेडरलकडून अधिक तपास सुरू आहे.
शेरीफने रविवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ” वेगवेगळ्या नावांचे अनेक पासपोर्ट, बनावट परवाना प्लेट असलेले एक अनोंदणीकृत वाहन आणि लोड केलेली बंदूक अशा गोष्टी आम्हाला त्याच्याडे सापडल्या आहेत.” “मला खरोखर विश्वास आहे की आम्ही ट्रम्प यांच्या हत्येचा आणखी एक प्रयत्न रोखला.”
संशयित कोण आहे?
लास वेगासचा रहिवासी वेम मिलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 49 वर्षीय व्यक्तीला शनिवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेरीफच्या प्रतिनिधींनी काळ्या रंगाच्या एसयूव्हीमधून प्रवास करताना हटवले आणि कोणत्याही अनुचित प्रकाराआधीच ताब्यात घेतले, असे शेरीफच्या कार्यालयाने सांगितले. त्यावेळी ट्रम्प व्यासपीठावर आलेले नव्हते.
भरलेली बंदुक आणि उच्च क्षमतेचे मॅगझिन बाळगल्याचा आरोप दाखल झाल्यानंतर शनिवारी मिलरला 5 हजार डॉलरच्या जामिनावर सोडण्यात आल्याचे तुरुंगातील नोंदीवरून लक्षात आले. हे दोन्ही गुन्हे फारसे गंभीर नाहीत. रविवारी प्रतिक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
“या घटनेचा माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांच्या सुरक्षेवर कोणताही परिणाम झाला नाही,” असे शेरीफच्या कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ट्रम्प यांना कोणताही धोका नाही
अमेरिकन ॲटर्नीच्या लॉस एंजेलिस कार्यालयाने रविवारी आपल्या वेब साइटवर दिलेल्या निवेदनात यूएस सीक्रेट सर्व्हिसचा हवाला देत ट्रम्प यांना कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे. कोणतीही फेडरल अटक करण्यात आली नसली तरी घटनेचा तपास चालू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जुलैमध्ये पेनसिल्व्हेनियामधील बटलर येथे प्रचार रॅलीदरम्यान एका बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली तेव्हा एका हत्येच्या प्रयत्नातून ट्रम्प थोडक्यात बचावले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये, सीक्रेट सर्व्हिस एजंट्ना ट्रम्प यांच्या पाम बीच गोल्फ कोर्सजवळ रायफलसह एकजण लपल्याचे आढळल्यानंतर ट्रम्प यांच्या हत्येचा परत एकदा प्रयत्न केल्याचा आरोप एका व्यक्तीवर ठेवण्यात आला होता. त्याने दोषी नसल्याची कबुली दिली. मात्र या प्रकारांमुळे सिक्रेट सर्व्हिसेसच्या सुरक्षा नियोजन आणि प्रतिसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
वार्षिक संगीत आणि कला महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या कोचेला व्हॅलीमध्ये शनिवारी ट्रम्प यांची रॅली झाली.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)