पिनाका रॉकेट करारावरील चर्चेदरम्यान लष्करप्रमुख फ्रान्स दौऱ्यावर

0
पिनाका

भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी (सीओएएस) 24 ते 27 फेब्रुवारी 2025 दरम्यानच्या फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. ही भेट अशा एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर होत आहे जेव्हा स्वदेशी विकसित पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर (एमबीआरएल) प्रणाली विकत घेण्यासाठी फ्रान्सच्या भारताबरोबर सुरू असणाऱ्या वाटाघाटींमध्ये आता आणखी प्रगती सुरू आहे. हा करार दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधांना लक्षणीय बळकट करू शकेल.

24 फेब्रुवारी 2025 रोजी सीओएएस पॅरिसमधील लेझ इनव्हॅलिड्स येथे फ्रान्सच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी लष्करप्रमुख संवाद साधतील. गार्ड ऑफ ऑनर  स्वीकारल्यानंतर फ्रेंच आर्मी चीफ (सीइएमएटी) जनरल पियरे शिल यांच्यासोबतही जनरल द्विवेदी यांच्या द्विपक्षीय चर्चा होतील. या बैठकीचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अधिक दृढ करणे आणि सामरिक सहकार्याचे नवे मार्ग शोधणे हा आहे. यानंतर इकोल मिलिटरै ही प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्था आणि लष्करी संकुल येथे ते भेट देतील, जिथे त्यांना फ्युचर कॉम्बॅट कमांड (सीसीएफ) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. याशिवाय, ते फ्रेंच लष्कराच्या तांत्रिक विभाग (एसटीएटी) येथे भेट देऊन तांत्रिक नवोपक्रमांवर संक्षिप्त माहिती घेतील. त्यानंतर ते व्हर्साइल्स येथील बॅटल लॅब टेरे येथे लष्करी संशोधन आणि विकासाबाबत माहिती घेतील.

25 फेब्रुवारी 2025 रोजी, जनरल द्विवेदी मार्सेल येथे प्रवास करतील. जिथे त्यांना फ्रेंच लष्कराच्या तिसऱ्या विभागाला भेट देतील. येथे त्यांना तिसऱ्या विभागाच्या प्रमुख जबाबदाऱ्या, त्यांची मोहीम आणि कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. त्याचप्रमाणे, भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव (शक्ती), संयुक्त प्रशिक्षण उपक्रम, तसेच फ्रेंच लष्कराच्या आधुनिकीकरण प्रकल्प (स्कॉर्पियन) यासंदर्भातही त्यांना माहिती दिली जाईल.

26 फेब्रुवारी 2025 रोजी, जनरल द्विवेदी कार्पीगनला भेट देतील, जिथे त्यांना स्कॉर्पिअन विभागाच्या अत्याधुनिक युद्धनीतीचे थेट प्रात्यक्षिक पाहता येईल. या वेळी थेट गोळीबारासह युद्ध कौशल्यांचे सादरीकरण केले जाईल. ज्यातून त्यांना लष्करी सामर्थ्य आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे दर्शन घडवले जाईल.

27 फेब्रुवारी 2025 रोजी लष्करप्रमुख जनरल द्विवेदी इकोल डे गुरे de (फ्रेंच संयुक्त कर्मचारी महाविद्यालय) येथे व्याख्यान देतील. जिथे ते आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि भारताचा भविष्यातील सामरिक दृष्टिकोन यावर विचार मांडतील.

भारताने फ्रेंच लष्कराला नुकत्याच दिलेल्या पिनाका एमबीआरएल प्रणालीच्या प्रस्तावामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पॅरिस दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी संरक्षण उत्पादनात भारताची क्षमता आणि जागतिक लष्करी सहकार्य बळकट करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला. संभाव्य पिनाका करार हा भारत-फ्रान्स संरक्षण संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे लष्करी क्षेत्रात आंतरसंचालनीयता आणि स्वावलंबन वाढेल.

पिनाका प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करताना, जनरल पियरे शिल यांनी 27 ते 29 फेब्रुवारी दरम्यान भारताला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी राजस्थानमधील शस्त्रप्रणालीचे थेट प्रात्यक्षिक पाहिले होते. पिनाका करारावरील प्रगत वाटाघाटी भारताच्या अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानातील फ्रान्सच्या वाढत्या स्वारस्यावर प्रकाश टाकणाऱ्या असून दोन्ही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारीला बळकटी देतात.

हा दौरा भारत-फ्रान्स लष्करी सहकार्य अधिक दृढ करण्यासह दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारीला नवीन दिशा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या भेटीतून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासोबतच भविष्यातील सहकार्याच्या नव्या संधीही निर्माण होतील.

टीम भारतशक्ती


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here