‘एनडीए’ दीक्षांत संचलन: लष्करप्रमुखांचा ‘जॉइंटनेस’वर भर
दि. २४ मे: युद्धाच्या पारंपरिक स्वरूपाला लष्करी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे वेगळा आयाम मिळाला आहे. युद्धाचे डावपेच आणि त्याचे परिणाम तंत्रज्ञानामुळे बदलले, इतकेच नव्हे तर ते अधिक घातक झाले आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी पुणे येथे केले. पुण्यातील खडकवासला येथे असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४६ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर ते छात्र आणि उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलत होते.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या वसंत सत्रातील १४६ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. या संचलनात एकूण १२६५ छात्र सहभागी झाले होते. त्यापैकी ३३७ छात्रांची तुकडी या दीक्षांत संचलनानंतर संबंधित लष्करी सेवांमध्ये जाण्यास सज्ज झाली. त्यात १९९ लष्कर, ३८ नौदल आणि ९९ छात्र हवाईदलात दाखल होतील. नौदल आणि हवाईदलातील छात्र अनुक्रमे एझिमला येथील नौदल अकादमी आणि दिंडीगुल येथील हवाईदल अकादमीमध्ये त्यांचे कमिशनपूर्व व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी जातील. या संचलनात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात प्रशिक्षण घेणाऱ्या २४ महिला छात्रही सहभागी झाल्या होत्या, त्याचबरोबर भूतान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार आणि मालदीवमधील १९ छात्रही या संचलनात सहभागी झाले होते. या संचलानानंतर जनरल पांडे यांनी यशस्वी छात्रांना पुरस्कार प्रदान केले. या मध्ये बटालियन कॅडेट कॅप्टन शोभित गुप्ता याला प्रथम क्रमांकाचे राष्ट्रपती सुवर्णपदक, अकॅडमी कॅडेट ॲडज्युटंट माणिक तरुण याला राष्ट्रपती रौप्यपदक आणि बटालियन कॅडेट कॅप्टन अन्नी नेहरा याला राष्ट्रपती कास्यपदक देण्यात आले. तर, गोल्फ स्क्वाड्रनला ‘स्टाफ बॅनर’ देण्यात आला.
General Manoj Pande #COAS reviewed the Passing Out Parade of 146th Course at National Defence Academy #NDA, Khadakwasla in Pune. The grand ceremonial event witnessed participation of 1265 Cadets including 24 female Cadets.
The passing out course of 337 Cadets included 199 #Army… pic.twitter.com/ttmiXSCIEL
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 24, 2024
जनरल मनोज पांडे यांनी दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात ‘पासआउट’ होणाऱ्या सर्व छात्रांचे अभिनंदन केले. तसेच, आपल्या पाल्यांना लष्करी सेवा निवडण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांनी सर्व पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जनरल पांडे म्हणाले, ‘लष्करी सेवा आणि युद्धाच्या स्वरूपांत क्रांती झाल्याचे आपण बघत आहोत. हे प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे झालेले बदल आहेत. तंत्रज्ञानाचा समावेश, स्पेस आणि सायबर आयाम या सर्व बाबींमुळे युद्ध अधिक वेगवान व घातक बनले आहे. त्यामुळे बदलत्या युद्धस्वरूपाला सामोरे जाण्यासाठी सशस्त्रदलांतील एकसंधपणा अतिशय गरजेचा आहे. येत्या काळातील युद्ध आणि त्याच्या वेग याच्याशी जुळवून घेण्यासाठी लष्करीदलांना तंत्रज्ञानस्नेही होण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तंत्रज्ञान शिकणे आणि त्यात प्राविण्य मिळविणे, हे तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे.’ संचलनापुर्वी ‘हट ऑफ रिमेंबरन्स’ येथे जनरल पांडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
२०५ छात्रांना पदवीप्रदान
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या गुरुवारी झालेल्या पदवीप्रदान समारंभात १४६ व्या तुकडीतील २०५ छात्रांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे असलेल्या हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सत्यप्रकाश बन्सल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी विज्ञानशाखेच्या ८२, संगणक विज्ञान शाखेच्या ८४ आणि कलाशाखेच्या ३९ छात्रांना पदवी प्रदान करण्यात आली. मित्रदेशांच्या १७ छात्रांचा देखील यात समावेश होता. त्या शिवाय नौदल आणि हवाईदलाच्या १३२ छात्रांचा समावेश असलेल्या बी. टेक शाखेला देखील तीन वर्षे अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नौदल आणि वायूसेनेच्या या कॅडेट्सना एझिमला येथील भारतीय नौदल अकादमी आणि हैदराबाद येथील हवाई दल अकादमीमध्ये त्यांचे प्री-कमिशनिंग प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पदवी प्रदान करण्यात येईल.
विनय चाटी