लष्कराने ‘Vayu Samanvay-II’ सरावात ड्रोन युद्ध रणनीतीची चाचणी घेतली

0

भारतीय लष्कराने, पुढील पिढीच्या युद्धाच्या तयारीच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, ‘वायू समन्वय–II’ (Vayu Samanvay-II) नावाचा व्यापक ड्रोन आणि अँटी-ड्रोन सराव यशस्वीपणे पार पाडला. दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी, वाळवंटी क्षेत्राच्या सीमावर्ती भागात हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. जटिल आणि इलेक्ट्रॉनिक युद्धपरिस्थितीत तंत्रज्ञानावर आधारित लढाईसाठीची लष्कराची तयारी तपासणे, हा या सरावाचा प्रमुख उद्देश हा होता.

या सरावाची रचना, वास्तववादी युद्धभूमीच्या परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी करण्यात आली होती. यामध्ये हवेतील आणि जमिनीवरील दोन्ही तुकड्यांना, मल्टी-डोमेन कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून एकत्र जोडले गेले, ज्यामुळे आभासी शत्रूच्या धोक्यांविरुद्ध एकत्रितपणे आणि समन्वय साधून कारवाया करणे शक्य झाले. ड्रोन तैनाती आणि अँटी-ड्रोन कारवायांसाठी धोरणात्मक संकल्पना विकसित करणे आणि त्याची पडताळणी करुन पाहणे, यावर या सरावाचा विशेष भर होता, कारण हे दोन्ही घटक, आधुनिक युद्धातील निर्णायक आणि अविभाज्य अंग बनत आहेत.

कठीण वाळवंटी भूभाग आणि प्रतिकूल हवामानाने, सैन्याला नवीन रणनीतींची चाचणी घेण्यासाठी आणि ऑपरेशनल तणावाखाली स्वदेशी तंत्रज्ञानाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी, एक योग्य संधी दिली. या सरावादरम्यान, भारतीय लष्कराच्या विविध दलांमधील परस्पर समन्वय आणि संयुक्त कार्यक्षमतेचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामुळे नेटवर्क आणि तंत्रज्ञानावर आधारित कारवायांचे महत्त्व अधोरेखित झाले.

दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी, या सरावाच्या यशाचे कौतुक करत सांगितले की, “यामधून मिळालेल्या अनुभवांचा उपयोग लष्कराचा क्षमताविकास आणि त्यातील ड्रोन तसेच अंटी-ड्रोन प्रणालींच्या जलद समावेशासाठी होईल.”

भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “‘वायू समन्वय–II’ हा भारतीय लष्कराच्या तंत्रज्ञानावर आधारित गतिमान आणि भविष्याभिमुख शक्तीत रूपांतरित होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो बदलत्या युद्धक्षेत्रात प्रभुत्व राखण्यास सक्षम आहे.”

भारतीय लष्कराने आधुनिकीकरण, नवकल्पना आणि सर्व कार्यक्षेत्रांतील सज्जतेविषयीची आपली बांधिलकी यावेळी पुन्हा अधोरेखित केली. तसेच सातत्याने केले जाणारे प्रयोग आणि त्याची प्रत्यक्ष पडताळणी, ही नव्याने उदयास येणाऱ्या हवाई धोक्यांवर वर्चस्व राखण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleराजनाथ सिंह यांच्याकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी सामूहिक सुरक्षेचे आवाहन
Next articleपुढील वर्षी पाकिस्तानला मिळणार चीन-निर्मित पहिली पाणबुडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here