गेल्या काही दिवसांपासून सिरियामध्ये बंडखोर आक्रमक झाले असून, त्यांचा सातत्याने विजयी होताना दिसत आहेत. मागील आठवड्यात या बंडखोरांनी अलेप्पो शहराचा ताबा घेतला होता ज्याचा राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना खूप मोठा धक्का बसला होता. अशातच आता बंडखोरांनी आपला मोर्चाा हामा शहाराच्या दिशेने वळवल्यामुळे असद यांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचं समजतंय.
सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स वॉर मॉनिटरच्या सांगण्यानुसार, बंडखोरांनी हामा शहराच्या काही मैल उत्तरेला असलेल्या मार शाहूरसह अन्य गावांवर कब्जा केला असून आता ते मुख्य शहराच्या दिशेने जात आहेत. हामा शहरावर हल्ला झाला तर राष्ट्राध्यक्ष असद यांच्यावरील दबाव अधिक वाढेल. 2011 मध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत हे शहर सरकारच्या ताब्यात आहे.
एका मुलाखतीदरम्यान या संपूर्ण परिस्थितीवर बोलताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची म्हणाले की, ‘दमास्कसने विचारणा केल्यास तेहरान सीरियामध्ये आपले सैन्य पाठवण्याचा विचार करेल. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सीरियातील “दहशतवादी आक्रमण” थांबवण्याचे आवाहन केले आहे.’
गेल्या आठवड्यात बंडखोरांनी सीरियातील सर्वात मोठे शहर – अल्लेप्पोवर कब्जा केला होता. हे गेल्या अनेक वर्षांतील सर्वात मोठे आक्रमण असल्याचे बोलले जात आहे.
याआधी रशियन हवाई शक्ती आणि इराणकडून मिळालेली लष्करी मदत तसेच प्रादेशिक शिया मिलिशिया गटांच्या नेटवर्ककडून मिळालेली मदत यामुळे, राष्ट्राध्यक्ष असाद यांनी बंडखोरांपासून देशाचा बहुतेक भाग परत मिळवला होता. त्यामुळे 2020 पासून संघर्षाच्या बंडखोरीवर बऱ्यापैकी आळा बसला होता. मात्र, रशिया आता युक्रेनमधील युद्धावर लक्ष केंद्रित करत असून, गेल्या तीन महिन्यांत इस्रायली हल्ल्यांमुळे सीरियात इराण-समर्थक असलेल्या हिजबुल्लाच्या नेतृत्वाचा नाश झाला आहे.
नुकताच शेकडो इराण-समर्थित इराकी मिलिशिया सैनिकांनी सीरियाच्या सरकारी सैन्याला पाठिंबा देण्यासाठी सीरियामध्ये प्रवेश केला असल्याचे इराकी आणि सीरियन सूत्रांनी सांगितले. तर एका बंडखोर सूत्राच्या म्हणण्यानुसार की इराण-समर्थित मिलिशिया सैनिक हे हामाच्या बाहेर लढत असलेल्या सैन्यात सामिल होते.
अलीकडच्या काही दिवसांतील बंडखोरांच्या प्रगतीमुळे अलेप्पोच्या शेख मकसूद जिल्ह्यासह आणि उत्तरेकडील तेल रेफाटच्या आजूबाजूच्या कॉरिडॉरसह अलेप्पोमधील आणि जवळच्या भागातून वायपीजीला हद्दपार केले आहे.
इराकच्या सीमेवर ईशान्य सीरियामध्ये एसडीएफची उपस्थिती असदला पाठिंबा देणाऱ्या इराण-समर्थित प्रादेशिक मिलिशिया गटांसाठी पुरवठा लाइन देखील गुंतागुंतीची करते. सोमवारी इराण-समर्थित शेकडो इराकी सैनिकांनी सरकारी सैन्याला मदत करण्यासाठी सीमा ओलांडून सीरियामध्ये प्रवेश केला होता.
इस्रायलने सीरियात इराण समर्थित सैन्यावर सातत्याने हल्ले केले आहेत. हिजबुल्लाह याने सांगितल्यानुसार, मंगळवारी दमास्कसजवळ इस्त्रायली हल्ल्यात सीरियन सैन्याशी संपर्क साधत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू देखील झाला.
पूर्व सीरियामध्ये इस्लामिक स्टेटशी लढा देणारी मुख्य फोर्स ही काही पाश्चात्य राष्ट्रांद्वारे समर्थित फोर्स होती. ज्याने 2014 ते 2017 या काळात सिरियामध्ये एक मिनी जिहादी राज्य चालवले होते.
याप्रकरणी इराणने असे जाहीर केले आहे, की पुढच्या आठवड्यात दोहा येथे तुर्की आणि रशियासोबत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होईल. ज्या माध्यमातून राजकीय प्रश्नांवर चर्चा होऊन त्याचा उपयोग दोन्ही देशांच्या सीमा स्थिर करण्यासाठी होऊ शकतो.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)
अनुवाद – वेद बर्वे