आसाम करार आणि मी: चार दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा…

0
आसाम करार

ही घटना तब्बल 40 वर्षांपूर्वीची असली, तरीही माझ्या मनात ती अगदी आज सकाळच्या वर्तमानपत्रासारखी ताजी आहे. तेव्हा मी The Sentinel या गुवाहाटीस्थित दैनिकात काम करत होतो. त्या काळात The Sentinel ला, जुन्या आणि प्रतिष्ठित The Assam Tribune सारख्या वर्तमानपत्राच्या तुलनेत, तसे नवखेच मानले जायचे.

The Sentinel मध्ये रुजू झाल्यापासून दोन वर्षांत, मी डेस्कवरील एक महत्त्वाचा सदस्य बनलो होतो. संपादन, उत्पादन अशा विविध जबाबदाऱ्या मी तिथे हाताळत होतो आणि तरुण न्यूज रूमचे नेतृत्व करत होतो. (जेव्हा माझे वय फक्त 23 वर्ष होते.)

संपूर्ण राज्यात त्या वेळी चर्चा होती की, केंद्र सरकार आणि परकीयांविरोधातील आसाम आंदोलनाचे (फक्त आंदोलन नव्हे) लीडर, यांच्यात लवकरच एक ऐतिहासिक करार होणार आहे. अशा शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, 13 आणि 14 ऑगस्ट रोजी आम्ही काही विश्लेषकांकडून संभाव्य परिणामांवर लेख मागवले होते. आम्ही 1979 पासून सुरू झालेल्या आंदोलनाची एक टाइमलाइन तयार केली होती आणि मागील सहा वर्षांतील घटनांचे फोटो शोधून ठेवले होते.

अपेक्षा होती की, 14 ऑगस्टच्या संध्याकाळी दिल्लीत हा करार होईल आणि दुसऱ्या दिवसाच्या वर्तमानपत्रात ठळक बातम्या असतील. आम्ही सर्वजण मोठ्या उत्सुकतेने याची वाट पाहत होतो. मला आठवते की, मी शहराच्या बाहेरील गुवाहाटी विद्यापीठात एक पत्रकार आणि एक छायाचित्रकार तैनात केला होता. विद्यापीठाची वसतिगृहे ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (AASU) चे मुख्यालय होते, कारण त्याचे प्रमुख नेते प्रफुल्ल कुमार महंत आणि भृगू कुमार फुकन अजूनही कॅम्पसमध्ये राहत होते आणि दोघेही दिल्लीला शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असले तरी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जल्लोषाची अपेक्षा होती.

दिल्लीत, आमचा प्रतिनिधी आम्हाला ताजी माहिती देण्यासाठी हजर होता. रात्री 9 वाजेपर्यंत, आम्ही संपादकीय पानाचे दोन व्हर्जन तयार केले होते (एक मोठ्या कराराच्या यशावर भाष्य करत होता, कारण तो आधीच स्वाक्षरीत झाला आहे असे गृहीत धरले होते, आणि दुसरा नियमित लेखासह, कदाचित रोनाल्ड रीगन किंवा इतर एखाद्या जागतिक नेत्यावर व्याख्यान देणारा, (जे त्या दिवसांत नेहमीचेच होते). उरलेला अंकसुद्धा छपाईसाठी जवळपास तयारच होता, पण शेवटपर्यंत आशा सोडली नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहायचे ठरवले. तेव्हा मोबाईल नव्हते, अखेर 2.30 वाजेपर्यंत काहीच बातमी न आल्यामुळे, आम्ही शेवटी वर्तमानपत्र ‘बेड’ला (म्हणजे छपाईसाठी) पाठवले आणि घरी गेलो.

दुसऱ्या दिवशी सुट्टी होतीच, केवळ स्वातंत्र्यदिनामुळेच नाही, तर AASU आणि इतर संबंधित संघटनांनी करार न झाल्यास, त्या दिवशी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती.

सकाळी 9 च्या सुमारास, माझे वडील, दूरदर्शनवर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राजीव गांधींचे स्वातंत्र्यदिनाचे थेट भाषण पाहत होते, त्यांनी मला गाढ झोपेतून जागे केले. “काहीतरी आसाम करार झाला आहे,” त्यांनी जाहीर केले. “पंतप्रधान त्याबद्दल बोलत असल्याचे मी नुकतेच ऐकले,” असे ते म्हणाले. मी आता झोपेतून पूर्णपणे जागा झालो होतो.

माझा पहिला विचार कार्यालयात धाव घेण्याचा होता. त्यानंतर, मला अचानक आठवले की, दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्यामुळे कोणतेही वर्तमानपत्र प्रकाशित होणार नाही. आमच्या घरी फोन नव्हता. म्हणून, मी आमच्या घरमालकाच्या घरी जाऊन संपादक आणि मालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचाही फोन बंद होता. पुढील पाऊल काय… असा विचार करत असताना माझ्या मनात अचानक आले की, आमच्या वाचकांना इतक्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक घटनेबद्दल 17 ऑगस्टच्या सकाळपर्यंत वाचायला मिळणार नाही, कारण 16 ऑगस्ट रोजी कोणतेही वर्तमानपत्र प्रकाशित होणार नाही! हे अन्यायकारक आहे, असा विचार माझ्या अननुभवी पण सतर्क मनाने केला. माझ्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले.

उपलब्ध माहितीसह वर्तमानपत्राचा विशेष अंक काढला तर? पण आज प्रत्येकासाठी सुट्टी आहे. आवश्यक कर्मचाऱ्यांपर्यंत कसे पोहोचायचे, हा माझा तात्काळ विचार होता. तो निर्णय संपादक आणि मालकांना घेऊ दे, असे मी स्वतःला सांगितले. म्हणून, मी माझ्या वडिलांना त्यांची लँबरेटा स्कूटर एक दिवसासाठी उधार देण्याची विनंती केली, पटकन काहीतरी खाल्ले आणि संपादकांच्या घरी धाव घेतली. संपादक होते – DNB (धीरेंद्र नाथ बेजबरुआ). मला त्यांच्या निवासस्थानी पाहून त्यांना आश्चर्य वाटले. जेव्हा मी त्यांना माझी कल्पना सांगितली, तेव्हा त्यांना अर्धवट रस होता. मला त्यांचा संकोच जाणवला. “पेपर कोण छापेल? बातम्या आणि लेख कोण टाइप करेल? इतर संपादकीय कर्मचारी कुठे आहेत?” असे त्यांनी विचारले.

एक चांगले बॉस असल्यामुळे, त्यांनी विचारले की: “या व्यावहारिक समस्यांवर काही उपाय आहे का?” वर्तमानपत्र तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत पूर्णपणे सामील असल्यामुळे, माझ्याकडे लगेच उत्तर होते. “चला शंकर दा यांना विचारूया,” मी म्हणालो. मला शंकर राजखोवा, हे निडर उद्योजक माहित होते, ज्यांनी ‘आसाम ट्रिब्यून’ सारख्या स्थापित वृत्तपत्राचा सामना करण्यासाठी तरुण पण उत्कट व्यावसायिकांचा एक समूह एकत्र केला होता, ते माझ्या प्रस्तावाला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच तयार असतील. म्हणून आम्ही डीएनबी यांच्या निवासस्थानातून त्यांना फोन लावला. अपेक्षेप्रमाणे, ते खूप उत्साही होते, म्हणून मी माझ्या स्कूटरवरून जीएस (गुवाहाटी-शिलॉंग) रोडवरील कार्यालयाकडे निघालो आणि डीएनबी लवकरच मागे येतील असे सांगितले.

रस्ते निर्मनुष्य होते आणि शंकर दा वगळता कार्यालयात कोणीही नव्हते (ते त्यावेळी कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर राहत होते). “आपण हे कसे करणार आहोत?” हा शंकर-दा यांचा पहिला प्रश्न होता. “आमच्याकडे काही लेख, काही ग्राफिक्स, काही फोटो आहेत आणि जर तुम्ही मला एसटीडी (लांब अंतराचा) फोन कनेक्शन दिला, तर मी काही कॉल करू शकेन, आम्ही महंत किंवा फुकन यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू शकतो आणि कदाचित काही ज्येष्ठ विश्लेषक/लेखकांकडून त्वरित विश्लेषण मिळवू शकतो,” असे माझे उत्तर होते. “त्यातून 8 पूर्ण आकाराची पाने भरतील का?” शंकर-दा यांनी विचारले. “निश्चितच नाही,” मी म्हणालो. “पण आपण 4 पाने किंवा लहान आकारात करू शकत नाही का?” मी उत्तरलो. “चला ते नंतर ठरवूया. तुम्ही काही संपादकीय कर्मचाऱ्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करा, मी टायपसेटर आणि किमान एका मशीन ऑपरेटरला बोलावतो. बाकीचे आपण स्वतःच सांभाळू आणि पेपरचे वितरण कसे करायचे, ते मी ठरवतो,” शंकर-दा म्हणाले.

म्हणून मी रिकाम्या न्यूज रूममध्ये गेलो, आम्ही तयार ठेवलेले लेख काढले, त्यांचे संपादन सुरू केले आणि उपलब्ध सामग्रीसह किती पाने भरता येतील याचा हिशोब करू लागलो. आणखी एक तरुण प्रशिक्षणार्थी (होय, आमच्याकडे माझ्यापेक्षा तरुण प्रशिक्षणार्थी होते, 23 वर्षांचा मुख्य उप-संपादक!) ज्याच्याशी संपर्क साधता आला होता, तो ईसम आला. त्याला तारांवर (पीटीआय आणि यूएनआय) कोणतीही सामग्री येत आहे का हे पाहण्यास सांगून, मी डीएनबीच्या खोलीत गेलो. शंकर-दा देखील तिथे बसले होते. “मला वाटत नाही की आपण उपलब्ध सामग्री आणि वेळेनुसार टॅब्लॉइड आकाराचे चार पानांपेक्षा जास्त विशेष अंक काढू शकू (आम्हाला शक्य तितक्या लवकर अंक काढायचा होता).”

दोन्ही वरिष्ठांनी तात्काळ मान्यता दिली. “चला, चार पानी टॅब्लॉईड विशेषांक करूया,” त्यांनी एकमताने सांगितले. आता मला करायचे होते फक्त एकच काम, ते म्हणजे दिल्लीला कॉल करायला सुरू करणे. काहीवेळ प्रयत्न केल्यानंतर, शेवटी मी महंतांशी संपर्क साधण्यात यशस्वी ठरलो. ते अर्थातच खूप घाईत होते.

भविष्यातील मुख्यमंत्री (महंता) यांनी झटपट तीन-चार महत्वाचे मुद्दे सांगितले आणि फोन कट केला. दरम्यान, आमचे दिल्लीतील प्रतिनिधी श्री. बर्ठाकुर (जर माझी स्मृती बरोबर असेल) यांनी एक सविस्तर टेलिग्राम पाठवला होता — ज्यात करार कसा झाला, कोणत्या नेत्यांनी सही केली, किती वाजता करार झाला, आणि पुढे काय होणार याचे सार दिले होते. टेलिग्रामच्या शेवटी त्यांनी लिहिले होते की, कुलदीप नय्यर (प्रसिद्ध पत्रकार आणि संपादक) यांनीही एक संक्षिप्त विश्लेषणात्मक लेख लिहायला तयार असल्याचे सांगितले आहे.

आता मजकूर तयार होता. केवळ पेपर एकत्र करून छापायला हवा होता. माझ्यासोबत एक ट्रेनिंगमधील सहकारी आणि अजून एक जण (बहुधा डेस्कवरचा सहकारी) असे आम्ही सर्वांनी मिळून, शेवटी चार पानी टॅब्लॉईड विशेषांक तयार केला. माझ्या आठवणीप्रमाणे, 5,000 प्रती छापण्यात आल्या. संध्याकाळी 4 वाजता, गुवाहाटीतील महत्त्वाच्या चौकांवर हॉकर नेमले गेले. काही मिनिटांतच त्या सर्व प्रती विकल्या गेल्या. अर्थातच, शहरभर जल्लोष आणि आनंदाची लाट उसळली होती. The Sentinel मध्ये आम्ही सर्वजण अत्यंत आनंदित होतो.

मी थकलो होतो, पण मनाने अत्युच्च शिखरावर पोहोचलो होतो. इतिहासातील एखाद्या महत्वपूर्ण क्षणाचा भाग झाल्याचा अनुभव, जरी तो थोडकाच का असेना. मला अजूनही स्पष्ट आठवते की, शंकर-दा यांनी जेवणाची आणि हो, थोड्याशा बिअरचीही व्यवस्था केली होती, त्या दिवशीच्या यशस्वी प्रयत्नांनंतर आम्हाला एक खांद्यावर शाबासकी देण्यासाठी.

दुर्दैवाने, मी त्या विशेषांकाची एकही प्रत जपून ठेवली नाही, पण त्या दिवसाची आठवण इतकी ठसठशीत आहे, की मला आजही कुठल्याही फोटोंची गरज वाटत नाही. कदाचित, The Sentinel ची सध्याची व्यवस्थापन टीम कधीतरी तो अंक पुन्हा बाहेर काढेल, अशी आशा आहे.

AASU आणि आसाम आंदोलनातील इतर नेते जेव्हा विजयानंतर गुवाहाटीत परतले, तेव्हा त्यांनी एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केला — असोम गण परिषद (AGP). त्यांनी नोव्हेंबर 1985 मध्ये निवडणुका जिंकून सत्ता हस्तगत केली. त्यांनी हितेश्वर सैकिया यांचा पराभव केला, आणि भृगू कुमार फुकन गृहमंत्री झाले.

The Sentinel हे आता The Assam Tribune ला एक सशक्त पर्याय म्हणून उभे राहिले.

माझ्या पत्रकारितेची खरी सुरुवात अशाच अविस्मरणीय अनुभवांतून झाली. मी सर्व प्रकारचं रिपोर्टिंग केलं — Reliance क्रिकेट वर्ल्ड कप 1987, अनेक राज्य विधानसभा निवडणुका, ईशान्य भारतातील विविध बंडखोरीच्या घटनांचं वार्तांकन केलं. भेट देणाऱ्या राजकारण्यांची मुलाखत घेतली (त्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचाही समावेश होता), तसेच आशा पारेख, फारूख शेख, सॉली सोराबजी, क्लाईव्ह लॉयड यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींशी संवाद साधला. संपादकीय लेखही लिहिले.

ते दिवस खरंच रोमांचक होते. आज 42 वर्षांनंतरही, जर एखाद्या चमत्काराने वेळ पुन्हा मागे फिरवता आली असती, तरी मी काहीच वेगळं केलं नसतं. माझ्या मते, एक वर्तमानपत्र प्रकाशित करण्याचा आनंद अद्वितीय असतो , जसा आज आपण तीन डिजिटल प्लॅटफॉर्म्स शक्य तितक्या उत्कृष्ट पद्धतीने चालवतो, अगदी तसेच.

नितीन ए. गोखले, संस्थापक आणि मुख्य संपादक, भारतशक्ती ग्रुप.

(नितीन ए. गोखले, यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात 1983 मध्ये The Sentinel (गुवाहाटी) मध्ये केली. त्यानंतर तब्बल 23 वर्षे, ईशान्य भारतावर आणि तिथल्या घडामोडींवर वार्तांकन केल्यानंतर, 2006 मध्ये ते दिल्ली येथे स्थायिक झाले आणि NDTV चे सुरक्षा व धोरणविषयक संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली.)

+ posts
Previous articleऑपरेशन सिंदूर, भारतासाठी 2035 पर्यंत संरक्षण कवच: पंतप्रधान मोदी
Next articleChina Arms Pakistan with Z-10ME Attack Helicopters: Why India Must Rethink Army Aviation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here