अॅस्ट्राझेनेका ही अँग्लो-स्वीडिश औषध निर्माता कंपनी जगभरातून आपली कोविड-19 लस मागे घेत असल्याचे वृत्त द टेलिग्राफच्या हवाल्याने रॉयटर्सने दिले आहे. “कंपनीने स्वेच्छेने विपणन अधिकृतता मागे घेतल्यानंतर ही लस युरोपियन युनियनमध्ये वापरली जाऊ शकत नाही,” असे वृत्तात म्हटले आहे.
बाजारपेठेतून लस मागे घेण्याचा अर्ज कंपनीकडून 5 मार्च रोजी करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी हा निर्णय अंमलात आणला गेला असेही या वृत्तात म्हटले आहे. येत्या काही महिन्यांत ब्रिटन आणि इतर देशांमध्ये जिथे या लशीला व्हॅक्सझेव्हेरिया नावाने मान्यता मिळाली होती तिथेही लस मागे घेण्यासाठी असेच अर्ज केले जातील. भारतात ही लस कोविशील्ड म्हणून ओळखली जाते आणि ती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवली आहे.
कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने नुकतीच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली. त्यानंतर ही माघार घेण्यात आली आहे. या लशीचे उत्पादन थांवण्यात आले असून नवीन व्हायरसच्या वेरिएंटना हाताळणाऱ्या अद्ययावत लस त्याजागी बाजारपेठेत येणार आहे, असे औषध निर्माता कंपनी अॅस्ट्राझेनेकाने सांगितले.
ब्रिटनमध्ये (यूके) कंपनीवरचा दबाव वाढला असून ती संभाव्य हानीकारक खटल्यांना तोंड देत आहे. या लसीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला तर अनेकांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसून आले. “कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन, हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो,” अशी कबुली अॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. ब्रिटनमध्ये या लसीमुळे किमान 81 मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
परंतु कंपनी म्हणते की लस मागे घेण्यासाठी, सुरूअसलेला खटला हे कारण नाही. अॅस्ट्राझेनेका एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, “स्वतंत्र अंदाजानुसार, पहिल्या वर्षात या लसीच्या पहिल्या डोसामुळे 65 लाखांहून अधिक लोकांचे प्राण वाचवण्यात आले आणि जागतिक स्तरावर तीन अब्जांहून अधिक मात्रा पुरवल्या गेल्या. आमच्या या प्रयत्नांना जगभरातील सरकारांनी मान्यता दिली आहे आणि जागतिक महामारी संपुष्टात आणण्यात एक महत्त्वाचा घटक म्हणून व्यापकपणे या लसीकडे पाहिले जाते.
कंपनीचे म्हणणे आहे की ती यावर मात करून नव्याने सुरूवात करण्यासाठी नियामक आणि भागीदारांसोबत काम करेल. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्यांना अशा लसींची अपेक्षा आहे जी मूळ कोविड स्ट्रेनशी निगडीत असली तरी त्यात अशा अद्ययावत लसी असतील ज्या विविध व्हेरियंटचा सामना करू शकतील.
सूर्या गंगाधरन