क्वाड परिषदेपूर्वी ऑस्ट्रेलियन लष्करप्रमुख दिल्लीमध्ये; संरक्षण सहकार्यावर चर्चा

0
संरक्षण
लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट, ऑस्ट्रेलियन लष्कर प्रमुख

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील बदलत्या सुरक्षाव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन लष्करप्रमुख – लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट, पाच दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले आहेत. 10 ते 14 ऑगस्टदरम्यान होणारा हा दौरा, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन रणनीतिक भागीदारांमधील ‘संरक्षण सहकार्य‘ अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

या दौऱ्यात स्टुअर्ट, भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह अन्य वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. विशेष म्हणजे, हा दौरा यावर्षी होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या काही महिन्यांआधी होत आहे, ज्यामुळे त्याचे रणनीतिक महत्त्व अधिक वाढते.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याचा प्रयत्न

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील- मानवतावादी मदत आणि आपत्ती व्यवस्थापन (HADR), हे संरक्षण सहकार्याचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे. दोन्ही देशांना नैसर्गिक आपत्तींसंदर्भातील अनुभव असल्यामुळे, 2022 मध्ये सुरू झालेल्या क्वाड-HADR उपक्रमाअंतर्गत त्यांचे लष्करी सहकार्य वाढत आहे.

लेफ्टनंट जनरल स्टुअर्ट यांच्या दौऱ्यात, भारत-ऑस्ट्रेलिया समग्र रणनीतिक भागीदारीअंतर्गत चालू समन्वय यंत्रणा तपासल्या जातील, तसेच इंडो-पॅसिफिकमध्ये संयुक्त तयारी वाढवण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित केल्या जातील. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चेचे विषय लॉजिस्टिक सहकार्य, प्रशिक्षणातील सुसंगती आणि आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन हे असतील.

ऑस्ट्रेलियातील डार्विन आणि भारतातील अंदमान-निकोबार बेटे, यांना संयुक्त जलद प्रतिसाद केंद्रांप्रमाणे विकसित करण्याचा विचार सुरू आहे. अशा उपक्रमांमुळे दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियामध्ये भारत-ऑस्ट्रेलियाला लवचिकता आणि गती मिळू शकते.

सामायिक प्रशिक्षणावर आधारित वैयक्तिक हितसंबंध

रणनीतिक चर्चेसोबत, एक वैयक्तिक आणि दीर्घकालीन डिप्लोमसीचा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘डिफेन्स अॅल्युम्नी डिप्लोमसी.’ जनरल स्टुअर्ट आणि जनरल द्विवेदी यांनी 2015 मध्ये, अमेरिकेतील यू.एस. आर्मी वॉर कॉलेजमध्ये एकत्र प्रशिक्षण घेतले होते. ही वैयक्तिक मैत्री दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यास उपयुक्त ठरते.

भारतीय लष्कराने याच उद्देशाने ‘Alumni Connect’ ही योजना सुरू केली आहे. याअंतर्गत, देश-विदेशात प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ट्रॅकिंग प्रणाली विकसित केली जात आहे. यामागील उद्देश वैयक्तिक नाते सुसंगत व्यावसायिक समन्वयात रूपांतरित करणे हा आहे.

एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने सांगितले की, “सैन्य प्रशिक्षणादरम्यान जुळलेली मैत्री अनेकदा नेमणुका किंवा सरकारांच्या पलीकडे टिकतात. संकटाच्या काळात, हीच नाती महत्त्वाची ठरतात, मग ती आपत्ती व्यवस्थापन असो किंवा प्रादेशिक तणाव निवळवण्याची वेळ.”

संस्थात्मक सहकार्य विस्तारण्याचा प्रयत्न

दिल्लीतील ‘Centre for Land Warfare Studies (CLAWS)’ आणि ऑस्ट्रेलियातील समकक्ष संस्थेमध्ये लवकरच सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. यामध्ये जमिनीवरील युद्धनीती, दहशतवादविरोधी धोरणे आणि संयुक्त संशोधन यावर सहकार्याचे मार्ग खुले होतील.

हे सहकार्य, दरवर्षी होणाऱ्या AUSTRAHIND लष्करी सरावाला पूरक ठरेल. पुढील सराव नोव्हेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे. याशिवाय, तरुण अधिकाऱ्यांचे आदानप्रदान, जंगल युद्ध आणि बंडखोरीविरोधी प्रशिक्षण कोर्सेसमधील सहभाग या उपक्रमांतून दोन्ही देशांतील सुसंगती अधिक मजबूत होत आहे.

संरक्षण उत्पादन क्षेत्रातही सहकार्य

या भेटींमुळे, भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण उत्पादन सहकार्यालाही गती मिळत आहे. भारतीय कंपन्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या खडतर गरजांसाठी संरक्षित वाहने आणि ISR प्रणाली पुरवत आहेत. भारतीय आर्मी डिझाईन ब्युरो आणि ऑस्ट्रेलियाचे Digger Works यांच्यात मानवी मदत कार्यासाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म एकत्रितपणे विकसित करण्यावरही चर्चा सुरू आहे.

क्वाड परिषदेपूर्वीचा रणनीतिक काळ

या भेटीची वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. क्वाड शिखर परिषद अपेक्षित असताना, भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रादेशिक प्राधान्यक्रमांवर एकत्रित भूमिका तयार करत आहेत, विशेषतः अशा क्षेत्रांमध्ये जिथे सशस्त्र दलांना थेट भूमिका बजवावी लागते – जसे की आपत्ती व्यवस्थापन, समुद्री सुरक्षा, आणि दक्षिण-पूर्व आशियात क्षमतावाढीचे उपक्रम.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, “भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्यत वारंवार होणाऱ्या वाढीतून हे स्पष्ट होते की, भविष्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केवळ सामायिक हितच नव्हे, तर सामायिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि परस्पर विश्वास हे घटकही आवश्यक आहेत.”

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleदीर्घकालीन दुर्लक्षानंतर, भारत रशियासोबतचे संबंध पुन्हा सुधारतो आहे का?
Next articleगाझा: अल जझीराच्या हत्या झालेल्या पत्रकाराचा हमासशी संबंध-इस्रायल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here