बांगलादेश: तारिक रहमान यांच्या परतीपूर्वी देशात सुरक्षेचा प्रश्न गंभीर

0
तारिक रहमान

तो बहुप्रतिक्षित क्षण अखेर निकट आला आहे; जेव्हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) कार्यवाह अध्यक्ष तारिक रहमान 17 वर्षांनी पहिल्यांदाच लंडनहून ढाका येथे परतत आहेत. गुरुवारी सकाळी ते ढाकामध्ये दाखल होतील. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने आपल्या पक्षाला विजयाच्या दिशेने नेणे हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल, जी पक्षावरील त्यांची पकड तसेच त्यांची राजकीय समज आणि प्रगल्भतेची कसोटी असेल.

महत्त्वाचे म्हणजे, रहमान यांना अगदी कमी कालावधीत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरित करायचे आहे, ज्यासाठी प्रत्यक्षात त्यांना बांगलादेशचा खूप मोठा भाग पिंजून काढण्याची गरज आहे; मात्र सध्या त्यांच्यावर हत्येचे सावट घोंगावते आहे.

बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा अब्बास यांनी, ‘ढाका ट्रिब्यून’ला सांगितले की, “या क्षणी संपूर्ण देशात सुरक्षेची स्थिती गंभीर आहे. आम्ही आवश्यक तितकी सुरक्षा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत. बाकी सर्व अल्लाच्या हाती आहे.”

गृह सल्लागार लेफ्टनंट जनरल मोहम्मद जहांगीर आलम चौधरी (निवृत्त) यांनी सांगितले की, “तारिक रहमान यांच्या सुरक्षित पुनरागमनासाठी सर्वोच्च पातळीवरील सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात माध्यम संस्थांवर झालेले हल्ले आणि अधूनमधून होणाऱ्या हिंसेमुळे कायदा अंमलबजावणीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.”

जनमत चाचण्यांचा कौल बीएनपीच्या विजयाच्या बाजूने आहे, आणि जर तारिक रहमान यांच्या मातोश्रींचे निवडणुकीच्या काही आठवडे आधी निधन झाले, तर विजय जवळजवळ निश्चित आहे. सध्या, त्यांच्या मातोश्री अनेक व्याधींनी ग्रस्त असून 11 डिसेंबरपासून त्या ढाका येथील रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहेत.

अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट’ने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे की, बीएनपी सर्वाधिक संसदीय जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे आणि रहमान हे पुढील पंतप्रधान असू शकतात. ते पहिल्यांदाच संसदीय निवडणूक लढवणार आहेत.

बीएनपीने सात भागीदारांसोबत युती करत विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्यासाठी सात जागा सोडल्या आहेत. तसेच, अनेक वर्षांपूर्वी सत्तेत असताना सोबत असलेल्या ‘जमात-ए-इस्लामी’साठी चार जागा राखून ठेवल्या आहेत. विविध मूल्यांकनांनुसार, या निवडणुकीत जमात गट बीएनपीनंतर दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे.

परंतु, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या हिंसेच्या भीतीमुळे निवडणुकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुका होतील की नाही, याबाबत आजही शंका व्यक्त केली जात आहे. त्यातच राजकीय वातावरण दूषित झाले आहे: भारतविरोधी कार्यकर्ते शरीफ उस्मान हादी, ज्यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, त्यांचे बंधू ओमान हादी यांनी सध्याच्या युनूस सरकारमधील एका ‘हितसंबंधी गटावर’ आपल्या भावाच्या मृत्यूचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

अलीकडेच आणखी एक विद्यार्थी नेते मोहम्मद सिकदर यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे, असुरक्षिततेचे सावट अधिक गडद झाले आहे. अल्पसंख्याक वर्ग सध्या सावध असून, त्यांच्याविरोधात अधिक हिंसाचार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवमानक आरोपावरून एका हिंदू व्यक्तीचे झालेले ‘मॉब लिंचिंग’ (जमावाकडून हत्या) त्यांच्या चिंतेत भर घालणारी ठरले आहे.

या सर्व गोंधळाचे नेतृत्व करणारे, अंतरिम सल्लागार मोहम्मद युनूस यांनी आत्मविश्वासाने सांगितले की: त्यांनी ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांना सांगितले आहे की, “निवडणुकीला आता अंदाजे 50 दिवस बाकी आहेत. आम्हाला एक मुक्त, निष्पक्ष आणि शांततापूर्ण निवडणूक घ्यायची आहे. आम्हाला ही निवडणूक संस्मरणीय बनवायची आहे.”

बांगलादेशातील जनता आणि भारतासारखे शेजारी देश ‘भविष्यात हे असेच घडेल’ अशी आशा ठेवतील, आणि त्यासाठी प्रार्थना करतील.

मूळ लेखिका- ऐश्वर्या पारिख

+ posts
Previous articleमॉस्कोमधील बॉम्बस्फोटात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एका संशयिताचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here