बांगलादेश: जनमत चाचणीमध्ये बीएनपी (BNP) आघाडीवर, जमात पिछाडीवर

0
बीएनपी (BNP)

नऊ अंश सेल्सिअस तापमान आणि दाट धुक्यामुळे, ढाका आणि बांगलादेशातील अन्य शहरांमधील हालचाली काहीशा मंदावल्या असतील; परंतु, राजकारणाचा मुद्दा हवामानावर सोडून चालणार नाही. बीएनपी (BNP) अर्थात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीसाठी सध्याची सर्वोच्च प्राथमिकता, त्यांचे कार्यवाह अध्यक्ष तारिक रहमान यांच्या पदाचे औपचारिकीकरण करणे ही आहे.

“सध्या ते कार्यवाह अध्यक्ष आहेत, पण मला खात्री आहे की, येत्या एक-दोन दिवसांतच आम्ही त्यांना अध्यक्ष बनवू शकू. कारण आपल्या नेत्या, अध्यक्षा खालिदा झिया आता आपल्यात नाहीत, आणि ते पद भरले जाणे अर्थातच आवश्यक आहे,” असे बीएनपीचे सरचिटणीस फखरुल इस्लाम आलमगीर यांनी रविवारी, सिल्हेट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

तारिक आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात सिल्हेटमधून करतील; अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. “खालिदा झिया त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात कायम सिल्हेटमधून करायच्या, त्यामुळे आम्हाला आशा आहे की, यावेळीही तसेच होईल. आमची आणि खरे तर प्रत्येकाची अपेक्षा हीच आहे की, तारिक रहमानही त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात सिल्हेटमधून करतील.”

एका जनमत चाचणीच्या (ओपिनियन पोल) निकालांमध्ये असे दिसून आले, की 70% मतदार हे बीएनपीला पसंती देत आहेत, तर केवळ 19% मतदार जमातला पसंती देत आहेत, या निकालामुळे बीएनपीतील निष्ठावतांचा उत्साह द्विगुणीत झाला असेल. ‘प्रोथोम आलो’ या वृत्तसंस्थेनुसार, ही जनमत चाचणी ‘एमिनन्स असोसिएट्स फॉर सोशल डेव्हलपमेंट’ या खाजगी संस्थेने केली होती, ज्यामध्ये 300 मतदारसंघांमधील 20,400 हून अधिक लोकांचा समावेश होता.

गेल्या ऑगस्टमध्ये, शेख हसिना यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी झालेल्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘एनसीपी’ (NCP) हा पक्ष स्थापन केला होता, ज्याला केवळ 2.6% लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत असताना आणि प्रचाराचा जोर वाढताना, याहून पूर्णपणे वेगळे निकाल दाखवणाऱ्या आणखी जनमत चाचण्या निःसंशयपणे समोर येतील; तरीही, जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वासाठी ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे, त्यांच्यासाठी हा इशारा आहे की, रस्त्यावरील त्यांची ताकद आणि संघटना ही जनतेच्या पाठिंब्याचे द्योतक नाही.

मात्र, यामध्ये अजून एक बाब आहे. कायद्यानुसार सर्व उमेदवारांना मालमत्ता, रोख रक्कम, दागिने इत्यादींसह सर्व संपत्तीचा तपशील देणे आवश्यक आहे आणि त्यांची जीवनशैली पाहता, जाहीर केलेल्या मालमत्तेचे मूल्य इतके कमी कसे? असा प्रश्न जनतेला पडला आहे. अगदी बीएनपीचे रहमान आणि जमात प्रमुखांनी प्रसिद्ध केलेल्या मालमत्तेचीही पडताळणी केली जात आहे.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बांगलादेशचे कार्यकारी संचालक- इफ्तेखारुझमान यांनी ‘प्रोथोम आलो’ला सांगितले की, “निवडणूक उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या मालमत्ता आणि उत्पन्न-खर्चाच्या माहितीवर जनतेचा विश्वास कमी आहे.” ते पुढे म्हणाले की, “ही आकडेवारी किती वास्तववादी आहे यावर प्रश्नचिन्ह आहे. उमेदवारांकडे अघोषित मालमत्ता किंवा उत्पन्न आहे का याची तपासणी व्हायला हवी, तसेच त्यांची जीवनशैली देखील विचारात घेणे आवश्यक आहे.” मतदानाच्या दिवसापर्यंत या विषयावर आणखी बरीच माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

मूळ लेखिका- ऐश्वर्या पारिख

+ posts
Previous articleDRDO चा AI, क्वांटम आणि हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर अधिक भर: डॉ. कामत
Next articleअमेरिकेच्या शुल्कवाढीनंतरही व्हिएतनामच्या अर्थव्यवस्थेची मोठी झेप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here