बांगलादेशातील जमाव हिंसक; वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ले आणि जाळपोळ

0
बांगलादेशातील

बांगलादेशमधील दोन स्वतंत्र वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर रात्रीच्या वेळी हल्ले करून त्यांना आग लावण्यात आली. सिंगापूरमधील एका रुग्णालयात दाखल असलेले कार्यकर्ते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर, हे हल्ले झाले.

12 डिसेंबर रोजी, मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी हादी यांच्यावर गोळ्या झाडल्या. ढाका येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने सिंगापूरला हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हादी यांच्या मृत्यूचा आणि ‘प्रथम आलो’ तसेच ‘डेली स्टार’ या दोन वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यांचा नेमका काय संबंध आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, ढाका येथील कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हे हल्ले पूर्वनियोजित असून, देशाला अस्थिर करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत.

एका ऑनलाइन निवेदनात, ‘प्रथम आलो’ने या हल्ल्याचे वर्णन “हेतूपुरस्सर आणि संघटित” असे केले आहे. “या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ‘प्रथम आलो’चे कर्मचारी पूर्णपणे असुरक्षित होते आणि त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी कार्यालयीन इमारतीची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि त्यानंतर ती पेटवून दिली. दीर्घकाळ लागलेल्या आगीमुळे इमारत जळून खाक झाली असून, तिथे साठवलेली मालमत्ता आणि मौल्यवान कागदपत्रांची राख झाली आहे,” असे या निवेदनात नमूद केले आहे.

‘डेली स्टार’ने त्यांच्या कार्यालयावरील हल्ल्याला “स्वतंत्र पत्रकारितेसाठी एक काळा दिवस” असे शीर्षक दिले आहे.

“छतावर अडकलेल्या आमच्या सहकाऱ्यांना आपल्या जीवाची भीती होती, कारण जमावाने एकामागून एक मजल्यांची तोडफोड केली आणि खालच्या मजल्यांना आग लावली. एका टप्प्यावर धुरामुळे लोकांना श्वास घेणे कठीण झाले, मात्र सुदैवाने अग्निशमन दल, पोलीस आणि लष्कराच्या प्रयत्नांमुळे कोणीही जखमी झाले नाही आणि सर्वजण सुखरूप घरी परतले,” असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

“ते आमचे कार्यालय जाळू शकतात, पण आमचा निर्धार नाही,” असे वृत्तपत्राने ठामपणे म्हटले आहे.

दोन्ही माध्यम संस्थांवरील हा हल्ला नक्की कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी अनेक नामवंत नागरिकांनी गृह मंत्रालयातील सल्लागारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वकील सारा हुसेन म्हणाल्या की, “वृत्तपत्रांवरील हल्ले हे केवळ इमारतींवरील हल्ले नसून, ते स्वतंत्र पत्रकारिता दडपण्याचा आणि देशातील लोकशाही आवाज दाबण्याचा प्रयत्न आहेत.”

त्यांनी या घटनेचे वर्णन ‘जमावाचा हिंसाचार किंवा कायदा हातात घेण्याचे टोकाचे स्वरूप’ असे केले.

जेव्हा ओस्मान हादी यांचा मृतदेह परत आणला जाईल तेव्हा, याहून अधिक हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleरशियन नागरिकावर इराणी गुप्तचरांसाठी हेरगिरी केल्याचा इस्रायलचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here