बांगलादेश: खुलनामध्ये नॅशनल सिटीझन पार्टीच्या (NCP) नेत्यावर गोळीबार

0
नॅशनल सिटीझन पार्टीच्या (NCP)

बांगलादेशमधील विद्यार्थी चळवळीचा कार्यकर्ता शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर काही दिवसांतच, खुलना शहरात नॅशनल सिटीझन पार्टीच्या (NCP) आणखी एका विद्यार्थी नेत्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

‘ढाका ट्रिब्यून’ने दिलेल्या वृत्तानुसार, NCP चे खुलना विभाग प्रमुख आणि श्रमिक शक्तीचे केंद्रीय संघटक मोहम्मद मोतालेब सिकदर यांच्यावर सोमवारी सकाळी, 11.45 च्या सुमारास शहरातील सोनाडांगा परिसरात उघडपणे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत खुलना मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनाडांगा मॉडेल पोलिस स्टेशनचे अधिकारी अनिमेश मंडल यांनी सांगितले की, सिकदर यांच्यावर गुंडांनी गोळीबार केला, ज्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आले.

परिस्थिती धोक्याबाहेर

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, सिकदर यांची प्रकृती सुरुवातीला चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु नंतरच्या वैद्यकीय तपासणीत असे दिसून आले की, गोळी त्यांच्या कवटीला स्पर्श करून गेली आहे आणि आता ते धोक्याबाहेर आहेत.

सिकदर यांच्या ‘नॅशनल सिटीझन पार्टीची’ स्थापना या वर्षाच्या सुरुवातीला झाली. हा पक्ष ‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ चळवळ आणि ‘जातीय नागरी समिती’मधून उदयास आला असून, तो बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील पहिला मोठा राजकीय पक्ष बनला आहे.

पोलिसांनी ‘प्रथम आलो’ या वृत्तपत्राला सांगितल्यानुसार, गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींमधील अंतर्गत वादामुळे हा गोळीबार झाला असावा, याची त्यांना खात्री आहे.

एनसीपी (NCP) खुलना शहर युनिटचे संघटक सैफ नेवाझ यांनी ‘प्रथम आलो’ला सांगितले की, सिकदर अलीकडेच पक्षाच्या आगामी विभागीय कामगार मेळाव्याच्या तयारीत व्यग्र होते.

हादी यांची हत्या

भारतविरोधी विचारधारेसाठी ओळखले जाणारे कट्टरपंथी नेते- शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर, गेल्या आठवड्यात संपूर्ण बांगलादेशमध्ये हिंसक निदर्शने झाली आहेत. 2024 मधील विद्यार्थी आंदोलने आणि उठावाच्यावेळी हादी यांनी प्रमुख भूमिका बजावली होती, ज्यामुळे बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना आपली सत्ता सोडावी लागली होती.

12 डिसेंबर रोजी, काही बुरखाधारी हल्लेखोरांनी हादी यांच्यावर गोळीबार केला होता, मात्र त्यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. सुरुवातीला ढाका येथे उपचार घेतल्यानंतर, पुढील उपचारासाठी त्यांना विमानाने सिंगापूरमधील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे 18 डिसेंबर रोजी अतिरिक्त जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हादी यांच्यावरील गोळीबारानंतर, बांगलादेशमधील निदर्शने अधिक प्रकर्षाने भारतविरोधी दिशेने वळली आहेत.

मूळ लेखिका- ऐश्वर्या पारिख

+ posts
Previous articleपाकिस्तानमध्ये बॉम्बहल्ला आणि गोळीबारात पाच पोलीस ठार
Next articleDRDO Completes User Trials of Akash-NG Missile, Induction Into Armed Forces Closer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here