बांगलादेशः हसीना यांच्या वडिलांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला

0

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी एका जहाल सोशल मीडिया भाषणात अंतरिम सरकारला विरोध करण्याचे आवाहन आपल्या समर्थकांना केले. त्यानंतर हजारो निदर्शकांनी बांगलादेशचे संस्थापक नेते आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या घराला आग लावत तिथे तोडफोड केली.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हजारो निदर्शक, काहीजण काठ्या, हातोडे आणि इतर साधनांसह शेख हसीना यांच्या वडिलांच्या ऐतिहासिक घराभोवती जमले, जे बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे स्मारक देखील आहे, तर इतरांनी इमारत पाडण्यासाठी क्रेन आणि उत्खनन करणारी मशीन्स आणली होती.

बुलडोझर मोर्चा

हसीना यांच्या बुधवारी रात्री 9 वाजताच्या नियोजित ऑनलाइन भाषणात व्यत्यय आणण्यासाठी मोठ्या आवाहनासह ‘बुलडोझर मोर्चा’ नावाच्या ही रॅली आयोजित करण्यात आली होती.

‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ या गटाशी संलग्न असलेल्या निदर्शकांनी हसीना यांच्या भाषणावर संताप व्यक्त केला होता, कारण हसीना यांनी नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारला  आव्हान म्हणून संबोधले होते.

ऑगस्ट 2024 पासून बांगलादेशात तणाव वाढत आहे. याच काळात सामूहिक निदर्शनांमुळे हसीना यांना आपल्या शेजारील देश भारतात पळून जावे लागले.

अंतरिम सरकारचा संघर्ष

नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने निदर्शने आणि अशांतता कायम राहिल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी संघर्ष केला आहे. ऑगस्टमध्ये पहिल्यांदा आग लावण्यात आलेल्या शेख मुजीबुर रहमान यांच्या घरासह हसीना सरकारने उभारलेल्या अनेक स्मारकांवर  निदर्शकांनी हल्ला केला आहे.

देशाची ओळख असलेले हे घर, इथूनच बंगबंधू (बंगालचे मित्र), म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुजीबीर रहमान यांनी 1971 मध्ये पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र झाल्याचे घोषित केले होते.

मात्र अवघ्या काही वर्षांनंतर ते राष्ट्रीय शोकांतिकेचे ठिकाण बनले. मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतांश लोकांची 1975 मध्ये याच घरात हत्या करण्यात आली. या हल्ल्यातून वाचलेल्या हसीना यांनी नंतर या इमारतीचे रूपांतर आपल्या वडिलांच्या आठवणींना समर्पित संग्रहालयात केले.

‘इतिहास त्याचा बदला घेतो’

“ते इमारत पाडू शकतात, पण इतिहास पाडू शकत नाहीत. इतिहास त्याचा बदला घेतो,” असे हसीना यांनी बुधवारी आपल्या भाषणात म्हटले.त्यांनी बांगलादेशच्या लोकांना अंतरिम सरकारच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आणि त्यांच्यावर असंवैधानिक पद्धतीने सत्ता हस्तगत केल्याचा आरोप केला.

निदर्शनांमागील विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील चळवळीने देशाचे 1972 चे संविधान नष्ट करण्याच्या योजनांवर आवाज उठवला आहे, जे त्यांच्या वडिलांच्या राजवटीचा वारसा दर्शवणारे आहे असा त्यांनी युक्तिवाद केला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleRussian Missiles Supplied By North Korea Are More Effective: Ukraine
Next articleAustralia, Japan, Philippines, US Undertake Maritime Cooperative Manoeuvres

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here