बांगलादेश: शेख हसीना यांना न्यायाधिकरणाने सुनावली फाशीची शिक्षा

0
शेख हसीना

बांगलादेशच्या दोन्ही वृत्तपत्रांमधील मथळे थोडक्यात पण अगदी स्पष्ट होते: ‘हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली’ असे ‘ढाका ट्रिब्यून’ वृत्तपत्राने म्हटले, तर ‘प्रथोम अलो’ने ‘शेख हसीना यांना फाशीची शिक्षा’ इतकाच उल्लेख केला. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने हसीना यांना, गेल्यावर्षी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान केलेल्या हिंसक कारवाईसाठी दोषी ठरवले आहे, ज्यामुळे त्यांना सत्ता सोडून भारतात पळून यावे लागले होते.

संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे की, त्या आंदोलनांमध्ये सुमारे 1,400 जण मारले गेले होते, तर सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, जुलै आणि ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या या उठावाविरुद्ध प्राणघातक बळाचा वापर करण्यासाठी हसीना यांनी दिलेल्या थेट आदेशाचे पुरावे  त्यांच्याकडे आहेत. हसीना यांनी त्यावेळी, त्यांच्या सरकारवर टीका करणाऱ्या अनेक पत्रकार, राजकारणी आणि कार्यकर्त्यांनाही बळजबरीने हटवले किंवा लक्ष्य केले.

माजी गृहमंत्री असदज्जमान खान कमाल, यांनाही याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून, त्यांना देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून हे न्यायालयात उपस्थित असलेले एकमेव आरोपी होते, ज्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि ते माफीचे साक्षीदार बनले. त्यांना 5 वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बांगलादेशच्या कोणत्याही माजी पंतप्रधानांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते. परंतु, निकालापूर्वी हसीना यांचे पुत्र आणि सल्लागार, सजीब वाजीद यांनी रॉयटर्सला सांगितले होते की, “अवामी लीगच्या सहभागासह लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार सत्तेवर आल्याशिवाय ते याचिका दाखल करणार नाहीत.”

हा निकाल, फेब्रुवारीमध्ये अपेक्षित असलेल्या संसदीय निवडणुकांच्या काही महिने आधी आला आहे. हसीना यांचा पक्ष असलेल्या अवामी लीगला या निवडणुकीत भाग घेण्याची परवानगी मिळालेली नाही. ‘प्रथोम अलो’ने सांगितले की, ‘हा निकाल 400 हून अधिक पानांचा असून त्यात पीडित आणि साक्षीदार यांच्या कबुलीजबाबांसोबत, व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपातही पुरावे आहेत.’

रिपोर्टनुसार, ‘निकालाच्यावेळी न्यायालयीन कक्ष खचाखच भरलेला होता आणि जेव्हा अंतिम निकाल वाचून दाखवण्यात आला, तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.’

– ऐश्वर्या पारिख

+ posts
Previous articleIndian Navy Unveils Crest of Mahe Ahead of Commissioning, Signals New Era in Indigenous ASW Capability
Next articleकझाकस्तानमध्ये चीनविरोधी भावनांचा उद्रेक; जिनपिंग यांचे चित्र जाळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here