बीजिंगमध्ये पूरामुळे 30 जणांचा मृत्यू, 80,000 हून अधिक लोकांचे स्थलांतर

0

चीनच्या बीजिंगमध्ये, मागील काही दिवस सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, सोमवारी मध्यरात्रीपर्यंत या भयानक पूरामुळे 30 जणांचा मृत्यू झाल्याचे, शिन्हुआ या चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने सांगितले आहे. संपूर्ण वर्षभरात पडणाऱ्या पावसाइतका पाऊस बीजिंगमध्ये गेल्या काही दिवसांतच पडला आहे.

बीजिंगच्या उत्तरेकडच्या जिल्ह्यामधील डोंगराळ भागात हे सर्व मृत्यू झाले असून, त्यापैकी 28 जण मियुनमध्ये तर 2 जण यानचिंगमध्ये मृत पावल्याची माहिती समोर आली आहे. राज्य माध्यमांनी या मृत्यूंची नेमकी वेळ आणि कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.

गेल्या बुधवारपासून, पावसाला सुरुवात झाली आणि सोमवारी बीजिंग व आसपासच्या प्रांतांमध्ये पावसाचे स्वरूप अधिक तीव्र झाले. बीजिंगच्या उत्तर भागात पावसाचे प्रमाण 543.4 मिमी (21.4 इंच) इतके नोंदवले गेले, अशी माहिती शिन्हुआने दिली. बीजिंगमधील सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे 600 मिमी आहे.

हजारो लोकांचे स्थलांतर

अतिवृष्टीमुळे बीजिंगमधील 80,000 हून अधिक रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने सांगितले. पावसामुळे रस्ते आणि दळणवळण यंत्रणा खराब झाली असून, सोमवारी मध्यरात्रीपर्यंत 136 खेड्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे समजते.

शनिवारी बीजिंगच्या हुआयरौ या डोंगराळ भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली, जिथे केवळ एका तासात 95.3 मिमी पाऊस झाला.

‘संपूर्ण क्षमतेने’ बचाव आणि शोध मोहिमा सुरु

सोमवारी उशीरा, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बीजिंगसह हेबेई, जिलिन आणि शानदोंग प्रांतांमध्ये “मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्ता हानी” झाल्याचे सांगितले आणि “संपूर्ण क्षमतेने” बचाव व शोध मोहिमा राबवण्याचे आदेश दिले.

पंतप्रधान ली कियांग यांनीही, मियुन जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे “खूप मोठी जीवितहानी” झाल्याचे नमूद केले, असे शिन्हुआने सांगितले.

सतर्कतेचा इशारा जारी

सोमवारी, बीजिंगमध्ये अतिवृष्टी व पूरसंदर्भात सर्वोच्च स्तरावरील इशारा (हाय अलर्ट) जारी केला असून, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मंगळवार सकाळपर्यंत, उत्तर चीनमधील सर्वात मोठ्या ‘मियुन’ धरणात 730 दशलक्ष घनमीटर पाणी जमा झाले असून, रविवारी दुपारपासून, 120 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले आहे.

बीजिंग प्रशासनाने नागरिकांना खालच्या प्रवाहातून वाहणाऱ्या नद्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे, कारण त्यांची जलपातळी अजूनही वाढण्याची शक्यता आहे.

आपत्ती निवारणासाठी निधी मंजूर

चीनच्या राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाने मंगळवारी सांगितले की, “बीजिंगच्या पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी तातडीने 200 दशलक्ष युआन ($27.9 दशलक्ष) मंजूर करण्यात आले आहेत.”

हा निधी प्रामुख्याने मियुन आणि हुआयरौमध्ये विस्कळीत झालेली वाहतूक, जलसंपत्ती, आरोग्यसेवा आणि इतर सार्वजनिक सेवा सुविधा दुरुस्त करण्यासाठी वापरला जाणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.

चीनच्या अर्थ मंत्रालयानेही, मंगळवारी बीजिंग आणि इतर प्रांतांतील आपत्ती निवारणासाठी 350 दशलक्ष युआन वितरित केल्याचे जाहीर केले.

(माहितीसाठी: $1 डॉलर = 7.1778 युआन)

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleअमेरिकेशी व्यापार करारासाठी भारताची तयारी, मात्र अन्याय्य अटी नामंजूर
Next articleट्रम्प- स्टारमर यांच्यातील मतभेद कायम, तरीही स्तुतीसुमनांची उधळण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here