बोंडी बीचवरील हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियात लागू होणार आपत्कालीन शस्त्र कायदे

0
बोंडी

गेल्या तीन दशकांतील देशातील सर्वात भीषण सामूहिक गोळीबारानंतर, ते बंदूक आणि निदर्शनांच्या कायद्यांमध्ये व्यापक सुधारणा मंजूर करण्यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा एकदा संसद बोलावणार असल्याचे ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्याच्या नेत्याने बुधवारी सांगितले.

रविवारी सिडनीच्या प्रसिद्ध बोंडी बीचवर ज्यू हानुका उत्सवादरम्यान बाप-लेकांनी उपस्थितांवर बेछूट गोळीबार करत हल्ला केला. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आणि वाढता ज्यूद्वेष तसेच हिंसक अतिरेकीपणाची भीती अधिक तीव्रपणे अधोरेखित केली.

ज्या राज्यात हा हल्ला झाला, त्या राज्याचे प्रमुख ख्रिस मिन्स यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ऑस्ट्रेलियाची संसद 22 डिसेंबर रोजी पुन्हा एकत्र येईल आणि कायद्यांमधील ‘तात्काळ’ सुधारणांवर विचार करेल. यामध्ये एका व्यक्तीला परवानगी असलेल्या शस्त्र संख्येवर मर्यादा घालणे आणि विशिष्ट प्रकारच्या शॉटगन मिळवणे अधिक कठीण करणे अशा सुधारणांचा समावेश आहे.

दहशतवादी घटनांनंतर पुढील तणाव टाळण्यासाठी, राज्य सरकार रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात निदर्शने करणे अधिक कठीण करणाऱ्या सुधारणांवरही विचार करेल.

“आपल्यासमोर एक मोठे कार्य आहे. ते खूप मोठे आहे,” असे ते म्हणाले.

“समुदायाला एकत्र आणणे ही एक मोठी जबाबदारी आहे. मला वाटते की आपल्याला विभाजनाची नव्हे, तर येत्या उन्हाळ्यासाठी शांतता आणि एकजुटीची गरज आहे.”

लवकरच आरोपपत्र दाखल होणार

50 वर्षीय साजिद अक्रमला पोलिसांनी घटनास्थळीच गोळ्या घालून ठार केले, तर त्याचा 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम- ज्यालाही पोलिसांच्या गोळ्या लागल्या होत्या- मंगळवारी दुपारी कोमातून बाहेर आला.

पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बुधवारी सकाळी सांगितले होते की, जिवंत राहिलेल्या बंदूकधाऱ्यावर काही तासांतच आरोपपत्र दाखल केले जाईल, परंतु न्यू साउथ वेल्सचे पोलीस आयुक्त माल लॅनियन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, औपचारिक चौकशी करण्यापूर्वी पोलीस त्याच्यावरील औषधांचा अंमल कमी होण्याची वाट पाहत आहेत.

अक्रमला सिडनी येथील रुग्णालयात पोलिसांच्या कडक पहाऱ्यात ठेवण्यात आले आहे.

रविवारी झालेल्या हल्ल्यातील दोषी असलेल्या व्यक्तींनी गोळीबाराच्या काही आठवड्यांपूर्वी दक्षिण फिलीपिन्सचा दौरा केला होता. हा प्रदेश इस्लामिक दहशतवादाने दीर्घकाळापासून ग्रासलेला आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी सांगितले की, हा हल्ला इस्लामिक स्टेटकडून प्रेरित असल्याचे दिसते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या हनुक्का कार्यक्रमात सांगितले की, ते या “भयानक आणि ज्यू-विरोधी दहशतवादी हल्ल्यातील” पीडितांच्या दुःखात सहभागी आहेत.

“जे मारले गेले त्या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत,” असे ते म्हणाले.

अंत्यसंस्कारांना सुरुवात

रविवारी झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ज्यू नागरिकांचे अंत्यसंस्कार बुधवारी सुरू झाले. हल्लेखोरांपैकी एकाची अतिरेक्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून थोडक्यात चौकशी झाली असतानाही, त्यांना शक्तिशाली बंदूका कशा मिळाल्या, याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

चाबाद बोंडी सिनेगॉगचे सहायक रब्बी आणि पाच मुलांचे वडील असलेल्या रब्बी एली श्लँगर यांचा अंत्यसंस्कार बुधवारी पार पडला.

ज्यूंना ओळख आणि संबंधांना प्रोत्साहन देणारी जागतिक संस्था असलेल्या चाबादच्या माध्यमातून सिडनीच्या ज्यू समुदायासाठी केलेल्या कार्यामुळे ते ओळखले जात होते. श्लँगर कैद्यांना भेटण्यासाठी अनेकदा  तुरुंगांमध्ये जात असत आणि सिडनीच्या सार्वजनिक गृहनिर्माण वसाहतींमध्ये राहणाऱ्या ज्यू लोकांना भेटत असत, असे ज्यू नेते ॲलेक्स रिव्हचिन यांनी सोमवारी सांगितले.

दोन वर्षांच्या इस्रायल-गाझा युद्धादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ज्यूद्वेषाचा प्रसार रोखण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने पुरेसे प्रयत्न केले नाहीत, याबद्दल अल्बानीज यांच्यावर टीका होत आहे.

“आम्ही ज्यू समुदायासोबत काम करू, आम्हाला आमच्या समाजातून ज्यूद्वेष समूळ नष्ट करायचा आहे,” असे अल्बानीज यांनी पत्रकारांना सांगितले.

हल्ल्यासाठी वापरलेल्या शक्तिशाली रायफल्स आणि शॉटगन साजिद अक्रमला कायदेशीररित्या खरेदी करण्याची परवानगी का देण्यात आली, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी सरकार आणि गुप्तचर यंत्रणांवरही दबाव आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या आधीच शस्त्र कायद्यांमध्ये व्यापक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, अक्रमच्या मुलाची 2019 मध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या आरोपावरून ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत गुप्तचर संस्थेने थोडक्यात चौकशी केली होती, परंतु त्यावेळी त्याच्यापासून कोणताही धोका निर्माण होईल असे पुरावे नव्हते, असे अल्बानीज म्हणाले.

‘हिरो’वर शस्त्रक्रिया होणार

अल्बानीज म्हणाले की, 43 वर्षीय अहमद अल-अहमद, ज्याने एका हल्लेखोराला पकडून त्याची रायफल हिसकावून घेतली आणि या प्रक्रियेत त्याला गोळी लागून जखमा झाल्या, त्याच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया होणार आहे.

सीरियामध्ये राहणाऱ्या अल-अहमदचे काका मोहम्मद अल-अहमद यांनी सांगितले की, त्यांचा पुतण्या सुमारे 20 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये कामाच्या शोधात सीरियाच्या वायव्येकडील इदलिब प्रांतातील आपले मूळ गाव सोडून गेला होता.

“आम्हाला सोशल मीडियाद्वारे ही माहिती मिळाली. मी त्याच्या वडिलांना फोन केला आणि त्यांनी सांगितले की तो अहमदच आहे. अहमद एक हिरो आहे; आम्हाला त्याचा अभिमान आहे. संपूर्ण सीरियाला त्याचा अभिमान आहे,” असे काकांनी रॉयटर्सला सांगितले.

रविवारच्या या घटनेत  दोन गोळ्या लागलेले आणि केवळ चार महिन्यांपूर्वीच पोलीस दलात रुजू झालेला 22 वर्षीय पोलीस अधिकारी जॅक हिबर्ट याच्या कुटुंबीयांनी बुधवारी एका निवेदनात सांगितले की, जॅकने एका डोळ्याची दृष्टी गमवली असून त्यांच्यासमोर आता एक “प्रदीर्घ काळ चालणारी आव्हानात्मक उपचार प्रक्रिया” आहे.

“एका हिंसक आणि दुःखद घटनेला सामोरे जाताना, त्याने धैर्य, प्रसंगावधान आणि निःस्वार्थ वृत्ती दाखवली. जखमी अवस्थेतही, शारीरिकदृष्ट्या जोपर्यंत शक्य होते, तोपर्यंत त्याने इतरांचे संरक्षण करणे आणि त्यांना मदत करणे सुरूच ठेवले,” असे कुटुंबीयांनी सांगितले.

आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, 22 लोक अजूनही सिडनीमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

पिडीत

मुलाखती, अधिकारी आणि माध्यमांच्या वृत्तांनुसार, गोळीबारात गेलेल्या इतर बळींमध्ये होलोकॉस्टमधून बचावलेली एक व्यक्ती, गोळीबार सुरू होण्यापूर्वी हल्लेखोरांजवळ असलेले एक जोडपे आणि मटिल्डा नावाच्या 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

मटिल्डाच्या वडिलांनी मंगळवारी रात्री बोंडी येथील शोकसभेत सांगितले की, त्यांच्या मुलीचा वारसा विसरला जाऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, “आम्ही युक्रेनमधून येथे आलो… आणि मला वाटले की मटिल्डा हे ऑस्ट्रेलियन नाव आहे. म्हणून फक्त हे नाव लक्षात ठेवा, तिला लक्षात ठेवा.”

बुधवारी बोंडी येथे जो सिडनीतील सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे येथे जलतरणपटू जमले आणि त्यांनी एक मिनिटाचे मौन पाळले.

“हा आठवडा निश्चितच खूप गंभीर होता, आणि आज सकाळी, मला निश्चितपणे समुदाय एकत्र येत असल्याची आणि प्रत्येकजण एकत्र बसल्याची भावना जाणवत आहे,” असे आर्ची कालाफ, या 24 वर्षीय बोंडी येथील रहिवाशाने रॉयटर्सला सांगितले. “प्रत्येकजण दुःखी आहे, प्रत्येकजण हे समजून घेत आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleऑस्ट्रेलिया: बोंडी गोळीबार घटनेतील मृत हल्लेखोर मूळचा हैदराबादचा
Next articleIndian Army Receives Final Batch of 3 Apache Helicopters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here