‘बीआरओ’च्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा

0

अखनूर-पूंछला जोडणाऱ्या सुन्गल बोगद्याचे काम पूर्ण 

दि. १६ मे: देशाच्या सीमावर्ती भागात रस्ते, बोगदे आणि पूल यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात मोलाची भूमिका बजाविणाऱ्या सीमा सडक संघटनेच्या (बीआरओ) शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा खोचला गेला आहे. ‘बीआरओ’ने जम्मू भागातील अखनूर आणि पूंछला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १४४ए वरील सुन्गल बोगद्याचे काम पूर्ण केले असून, त्याचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. ‘बीआरओ’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन या वेळी उपस्थित होते.

देशाच्या सीमाभागात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी ‘बीआरओ’ सातत्याने प्रयत्नशील असते. त्याच मालिकेत अखनूर-पूंछला जोडणाऱ्या सुन्गल बोगद्याचे काम सुरु करण्यात आले होते. सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेल्या या बोगद्यामुळे अखनूर-पूंछला हे दोनशे किलोमीटरचे अंतर चार तासांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर कापण्यास सात तास लागतात. या बोगद्यामुळे नियंत्रण रेषेवर सैन्य कुमक आणि रसद पुरवठा तातडीने करणे शक्य होणार आहे. या दुहेरी मार्गाच्या बोगद्याची लांबी २.७९ किलोमीटर इतकी आहे. अखनूर-पूंछ या दोनशे किलोमीटरच्या रस्त्यावर ‘बीआरओ’कडून चार बोगदे बांधण्यात येत आहेत. हे चारही बोगदे सर्व ऋतुंमध्ये वापरता येण्यायोग्य बांधण्यात आले आहेत. त्यामुळे या भागाचा संपर्क वाढणार आहे. प्रवासाचा वेळ वाचविण्याबरोबरच सुरक्षितपणे वाहन चालविणेही या रस्त्यामुळे शक्य होणार आहे. या रस्त्यावर कांडी हा २६० मीटर, सुन्गल हा २.७९ किलोमीटर, नौशेरा हा सातशे मीटर आणि भिम्बरगली येथील एक किलोमीटर लांबीचा असे चार बोगदे बांधण्यात आले आहेत.

गोल्डन आर्क म्हणून ओळखला जाणारा अखनूर-पूंछ हा रस्ता सामरिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि जुना रस्ता आहे. हा रस्ता दक्षिण काश्मीरला जम्मू विभागाशी जोडतो. जम्मू-काश्मीरच्या पश्चिमेला आणि जम्मू विभागात असणाऱ्या अखनूर, राजौरी आणि पूंछ या सीमावर्ती जिल्ह्याना जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात नौशेरा येथील बोगद्याचे काम पूर्ण झाले होते. या महामार्गाचे कामही प्रगतीपथावर असून, २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. ‘सीमाभागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात ‘बीआरओ’ अग्रेसर आहे. या भागातील मुख्य ठिकाणे या कामांमुळे जोडली जातील. अखनूर-पूंछ रस्त्याचे कामही वेगात पूर्ण होईल,’असे लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी सांगितले. ‘बीआरओ’ आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अशा सर्व भागात रस्ते आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करीत आहे. निर्माण करा, जोडा, काळजी घ्या व आपल्या भागातील नागरिकांचे प्राण वाचवा या चतुःसूत्रीच्या आधारे ‘बीआरओ’ आणि ‘प्रोजेक्ट संपर्क’ काम करीत असतात, असेही लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी नमूद केले.

विनय चाटी


Spread the love
Previous articleसंयुक्त राष्ट्राकडून भारतीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूची चौकशी सुरु
Next articleMazagaon Dock Limited Unveils Midget Submarine ‘Arowana’ On Its 250th Anniversary

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here