इस्त्राईल-हमास संघर्षात आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा पहिला बळी
दि. १५ मे: राफाहमध्ये अनोळखी हल्लेखोरांच्या गोळीबारात बळी पडलेले भारतीय नागरिक वैभव अनिल काळे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी व या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्यासठी संयुक्त राष्ट्राने चौकशी पथकाची नेमणूक केली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी दिली आहे.
इस्त्राईल-हमास युद्धाचा फटका बसलेल्या विस्थापितांसाठी संयुक्त राष्ट्राच्यावतीने राफाहमध्ये मदत छावणी आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जात आहेत. भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल वैभव काळे हे संयुक्त राष्ट्राच्यावतीने या कामावर देखरेख करीत होते व ते संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा विभागात नेमणुकीस होते. सोमवारी आपल्या सहकाऱ्यासह ते राफाहमधील युरोपीय रुग्णालयाकडे जात असताना त्यांच्या मोटारीवर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यात काळे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा सहकारी जखमी झाला आहे. काळे यांच्या मृत्यूमुळे इस्त्राईल-हमास संघर्षात पहिल्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा मृत्यू नोंदविला गेला आहे. दरम्यान, कर्नल काळे यांच्यावरील हल्ल्याची आणि त्यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या समितीशी भारतीय दूतावासाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. काळे यांचे पार्थिव भारतात परत आणण्याचे प्रयत्न सरू असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
इस्त्राईलने राफाहवरील आपला हल्ला अधिक प्रखर केला असून, तेथे मोठ्याप्रमाणात बॉम्बफेक सुरु केली आहे. मंगळवारी इस्त्राईलच्या संरक्षणदलांनी राफाहवर केलेला हल्ला आत्तापर्यंतचा सर्वांत प्रखर हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. राफाहमध्ये अनेक शरणार्थी आश्रयास असल्याने या भागावर हल्ला करू असा इशारा इस्त्राईलचे मित्रदेश आणि मदत संस्थांनी इस्त्राईलला दिला आहे. मात्र, या भागात हमासच्या चार बटालियन सैन्याने आसरा घेतल्यामुळे आणि त्यांचा समूळ नाश करण्याचा उद्देश असल्याने हे हल्ले थांबविता येणार नाहीत, असे इस्त्राईलचे म्हणणे आहे. दरम्यान, राफाहमध्ये तातडीने मानवीय आधारावर युद्धबंदी करण्यात यावी आणि सर्व ओलिसांची सुटका करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अन्तोनिओ गुटेर्रेस यांनी केले आहे. ‘गाझामधील युद्धामुळे मोठ्याप्रमाणात बळी जात आहेत. नागरिकच नाही, तर आता मदतपथकातील सदस्यांनाही जीव गमवावा लागत आहे,’ असेही ते म्हणाले.
हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्राईलने सुरु केलेल्या हल्ल्यात सात ऑक्टोबरपासून आतापर्यंत ३५ हजारहून अधिक नागरिकांचा बळी हेला असून, सुमारे २३ लाख नागरिक विस्थापित झाले आहेत, असे पॅलेस्टाईनच्या वैद्यकीय विभागाने म्हटले आहे. दरम्यान, काळे यांच्यावरील हल्ल्याची चौकशी सुरु झाली असून, ती सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. या घटनेचा सर्व तपशील इस्त्राईलच्या संरक्षणदलाकडून तपासून घेण्यात येणार आहे, असे हक यांनी सांगितले. सध्या गाझामध्ये संयुक्त राष्ट्राचे ७१ कर्मचारी काम करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. या भागात मानवीय मदत पोहोचविण्यासाठी संयुक्त राष्ट्राची मुख्य संस्था म्हणून काम करीत असलेल्या ‘युएनआरडब्लूए’ने दिलेल्या माहितीनुसार सहा मे पासून या भागातून सुमारे साडेचार लाख लोकांनी पलायन केले असून, संयुक्त राष्ट्रांच्या शिबिरात दहा लाख नागरिकांनी आश्रय घेतला आहे.
विनय चाटी
(‘रॉयटर्स’च्या ‘इनपुट्स’सह)