ब्राझीलचे संरक्षणमंत्री लवकरच भारत दौऱ्यावर; संरक्षण भागीदारीला चालना

0

ब्राझीलचे संरक्षणमंत्री जोसे मुसिओ, हे येत्या 15 ते 17 ऑक्टोबरदरम्यान भारताचा दौरा करणार आहेत. ब्राझीलचे उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, मुसिओ नवी दिल्लीला भेट देणार असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि ब्राझीलच्या संरक्षण सहकार्याला अधिक बळकटी मिळेल.

ब्राझीलचे राष्ट्रापती लुईज इनासिओ लुला दा सिल्वा यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, तसेच वाढत्या भू-राजकीय अस्थिरतेदरम्यान दोन्ही देश आपली धोरणात्मक स्वायत्तता बळकट करण्याचा प्रयत्न करत असताना, मुसिओ यांची भेट विशेष महत्वाची ठरणार आहे.

या दौऱ्यामध्ये वरिष्ठ मंत्री तसेच संरक्षण, अवकाश, उर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उच्च व्यावसायिक नेत्यांचे एक शिष्टमंडळ भारतात दाखल होणार असून, यातून हे अधोरेखित होते की, ब्राझील भारताच्या संरक्षण परिसंस्थेत एक विश्वासार्ह आणि दीर्घकालीन भागीदार म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करू पाहत आहे.

या भेटीदरम्यान, द्विपक्षीय संरक्षण सहकार्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.

धोरणात्मक वेळ आणि व्यापक साऊथ-साऊथ उद्दिष्टे

जागतिक स्तरावरील संरक्षणवाद आणि पुरवठा साखळीतील अडचणी वाढत असताना, मुसिओ यांचा हा दौरा, पारंपारिक पुरवठादारांच्या पलीकडे जाऊन संरक्षण भागीदारी विस्तृत करण्याच्या भारताच्या धोरणात्मक ध्येयाशी सुंसगत आहे. भारत आणि ब्राझील हे ग्लोबल साऊथमधील दोन प्रमुख लोकशाही व्यवस्था असलेले देश म्हणून, साऊथ टू साऊथ संरक्षण-औद्योगिक भागीदारी वाढवण्यासाठी, BRICS, IBSS आणि G20 यासह आपल्या सामायिक प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत.

संरक्षण अजेंड्यातील प्रमुख मुद्दे

संयुक्त राष्ट्र शांतता राखीव दल प्रमुखांचे संमेलन, यासारख्या बहुपक्षीय उपक्रमांबरोबरच द्विपक्षीय संरक्षण अजेंड्यात पुढील मुद्द्यांवर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे:

C-390 मिलेनियम आणि मिडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (MTA) कार्यक्रम

एम्ब्रेअर C-390 मिलेनियन’ हे पुढील पिढीच्या मल्टी-रोल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, जे भारतीय हवाई दलाच्या मिडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (MTA) खरेदी कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित आहे, त्यावर द्विपक्षीय चर्चेमध्ये विशेष लक्ष केंद्रिंत केले जाईल.

एम्ब्रेअरने भारत सरकारच्या Request For Information (RFI) ला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यामधअये सुमारे 80 विमानांच्या संभाव्य व्यवहाराचा समावेश आहे. भारतासोबतचा हा करार, कंपनीच्या संरक्षण विभागातील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय करारांपैकी एक ठरू शकतो.

एम्ब्रेअरने आपल्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी, नवी दिल्लीतील एअरोसिटीमध्ये स्वत:ची पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली असून, ती विशेषत: “मेक इन इंडिया” उपक्रमाअंतर्गत अभियांत्रिकी गरजा, खरेदी व्यवहार आणि भविष्यातील सहकार्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे उद्दिष्ट ठेवते. गेल्यावर्षी एम्ब्रेअरने महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्ससोबत सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत C-390 विमानाचे संयुक्त उत्पादन करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जात आहे.

भारताच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये, ब्राझीलची रूची

DRDO ने विकसित केलेल्या भारताच्या, ‘आकाश’ या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत  मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीचे मूल्यांकन, ब्राझील त्यांच्या मध्यम/उच्च उंचीच्या हवाई संरक्षण तोफखाना उपक्रमासाठी करत आहे. अर्थसंकल्पातील अडथळे आणि स्पर्धात्मक लॉबिंगमुळे त्याच्या खरेदीला विलंब होत असला, तरी ही प्रक्रिया ‘तांत्रिकदृष्ट्या सक्रियपणे विचाराधीन’ असल्याचे, ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे, ब्राझीलने आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे मूल्यांकन आणि त्यांच्या C-390 विमान निर्मिती ऑफरचा स्वतंत्रपणे पाठपुरावा केला जात असल्याचे म्हटले आहे.

संरक्षण-औद्योगिक सहकार्याचा विस्तार

ब्राझीलच्या संरक्षण क्षेत्रातील आघाडीचे प्रतिनिधी- ज्यामध्ये एम्ब्रेअर, टॉरस आर्मास, सीबीसी, अविब्रास, एटेक, अरेस, एमगेप्रॉन, हेलीब्रास, मॅकजी, इंबेल आणि अन्य औद्योगिक कंपन्यांचा समावेश आहे, त्या सर्वांचे प्रतिनिधी शिष्टमंडळासोबत भारत दौऱ्यावर येण्याची अपेक्षा आहे.

टॉरस आर्मास आणि सीबीसी या कंपन्यानी, याआधीच भारतातील SSS डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स आणि जिंदाल डिफेन्स या प्रमुख संरक्षण भागीदारांसोबत लघु शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि एरोस्पेस प्लॅटफॉर्म्समधील संयुक्त उपक्रमांबाबत चर्चा सुरु केल्या आहेत.

भारतीय बनावटीचे संरक्षण प्लॅटफॉर्म्स, जसे की: प्रचंड आणि रुद्र आक्रमक हेलिकॉप्टर्स आणि
हवाई प्रारंभिक इशारा प्रणाली (जसे की NETRA साठी वापरले जाणारे E-145 विमान), यामध्ये ब्राझीलला विशेष रूची आहे.

ब्राझीलकडून स्वतंत्र हवाई आणि नौदल सहसंचालकांची नियुक्ती

संस्थात्मक पातळीवरील संबंध अधिक सखोल करण्याचे संकेत देत, ब्राझील सरकारने नवी दिल्लीतील आपल्या दूतावासात स्वतंत्र हवाई आणि नौदल सहसंचालक नेमण्याचा औपचारिक निर्णय घेतला आहे. आजवरच्या इतिहासात अशाप्रकची नियुक्ती प्रथमच होते आहे. दूतावासात सध्या लष्कराचा एकच संरक्षण सहसंचालक (DA) कार्यरत आहे.

हा निर्णय, ब्राझीलच्या भारतासोबतच्या संरक्षण कूटनीतीतील एक महत्वाची प्रगती दर्शवतो. या नियुक्तीमुळे, दोन्ही देशातील ऑपरेशनल समन्वय अधिक जलद करणे, संरक्षण तंत्रज्ञानावर थेट संवाद साधणे आणि दीर्घकालीन लष्करी सहकार्य मजबूत करणे सुलक्ष होईल.

लष्करी संबंधांना गती देणाऱ्या, 2023 पासूनच्या काही भेटी

संरक्षणमंत्री मुसिओ यांचा हा दौरा, गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय लष्करी भेटीगाठींच्या मालिकेतील पुढचे पाऊल आहे. याआधी झालेल्या काही प्रमुख भेटी:

  • ब्राझीलचे लष्करप्रमुख (28 ऑगस्ट–2 सप्टेंबर 2023)
  • नौदलाचे उपप्रमुख (4–6 सप्टेंबर 2023)
  • लष्कराचे उपप्रमुख (25–27 सप्टेंबर 2023)
  • ब्राझीलचे नौदल प्रमुख, अ‍ॅडमिरल मार्कोस सॅम्पायो ओल्सेन (19–24 ऑगस्ट 2025)
  • ब्राझील हवाई दलाचे प्रमुख, लेफ्टनंट ब्रिगेडियर मार्सेलो कॅनिट्झ डॅमासेनों, जे सप्टेंबर 2024 मध्ये, HALच्या सुविधांना भेट देऊन, जोधपूरमधील ‘Exercise Tarang Shakti’ मध्ये सहभागी झाले होते.

नौदल आणि पाणबुडी सहकार्य

एरोस्पेस आणि क्षेपणास्त्रांपलीकडे जाऊन, भारत आणि ब्राझील नौदल क्षेत्रातील सखोल सहकार्याच्या शक्यतांचा देखील शोध घेत आहेत. यामध्ये पाणबुडी कार्यक्षमता आणि सागरी क्षेत्रातील जागरूकता यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

ब्राझील हा ‘स्कॉर्पीन क्लब’चा सदस्य आहे, जो फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पीन-श्रेणीच्या पाणबुड्या चालवणाऱ्या देशांचा एक धोरणात्मक समूह आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे.

हा क्लब संयुक्त प्रशिक्षण, संचालनात्मक सहकार्य, आणि समुद्राखालील युद्ध विषयक ज्ञानाच्या देवाणघेवाणीचे व्यासपीठ पुरवतो. ब्राझील आपल्या नौदलातील ताफ्याचे आधुनिकीकरण करत असताना आणि प्रादेशिक सागरी भागीदारी वाढवत असताना, या सहकार्यावर अधिक भर देण्यास उत्सुक आहे.

मोदी–लुला यांच्या बैठकीत, संरक्षण भागीदरीला महत्व

ब्राझीलचे संरक्षणमंत्री आणि उपराष्ट्रपती अल्कमिन यांचा आगामी भारत दौरा, हा फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या मोदी–लुला द्विपक्षीय शिखर परिषदेच्या पूर्वतयारीचा महत्वपूर्ण भाग ठरणार आहे. ब्राझील आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करत असताना आणि भारत आपल्या संरक्षण निर्यातीच्या आकांक्षांना गती देत असताना, दोन्ही देश आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे सह-विकसन करण्यासाठी, तसेच तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि विश्वासार्ह संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी समान संधीच्या शोधात आहेत.

दोन्ही देश, परस्पर क्षमतांवर आणि धोरणात्मक स्वायत्ततेवर आधारित आणि कुठल्याही अवलंबनाशिवाय उभ्या राहू शकणाऱ्या, नव्या ‘साऊथ टू साऊथ’ संरक्षण सहकार्याच्या युगाचा पाया रचत आहेत.

मूळ लेखिका- हुमा सिद्दिकी

+ posts
Previous articleUK-India Kick Off Naval Exercise Ahead of PM Starmer’s Visit
Next articleभारताच्या तटरक्षक दलात ‘ICGS Akshar’ या नव्या जहाजाचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here