अनेक प्रमुख रशियन प्रसारमाध्यमांमधून किंग चार्ल्स तृतीय यांच्या मृत्यूचे चुकीचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर जगभरात तर्क वितर्कांना उधाण आले. अनेक देशांमधील ब्रिटीश दूतावासांना याबाबतच्या चौकशीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले.
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार किंग चार्ल्स यांच्यावर कर्करोगासाठी उपचार सुरू होते. मात्र त्यात काही गुंतागुंत निर्माण होऊन वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. खोटी बातमी पसरवणाऱ्या प्रसारमाध्यमांमध्ये रशियन न्यूजवायर स्पुटनिकचा समावेश होता, ज्यात म्हटले होते , “प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, ग्रेट ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरा यांचे निधन झाले आहे.”
या बातमीने जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे युक्रेन आणि रशियामधील ब्रिटनच्या दूतावासांनी त्वरित या दाव्याचे खंडन केले आणि जनतेने अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन केले. विशेष म्हणजे, राजाच्या “अनपेक्षित मृत्यूची” घोषणा करणारे बकिंगहॅम पॅलेसचे बनावट निवेदन विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाले, ज्यामुळे संभ्रम आणखी वाढला .
युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमधील ब्रिटनच्या दूतावासांनी या बातमीचे खंडन करणारी निवेदने जारी केली. युक्रेनमधील ब्रिटनच्या दूतावासाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “किंग चार्ल्स तृतीय यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे.”
We would like to inform you that the news about the death of King Charles III is fake.
— UK in Ukraine (@UKinUkraine) March 18, 2024
किंग चार्ल्स हे 5 फेब्रुवारी रोजी नॉफॉकमधून लंडनला आले. त्यानंतर बकिंगहॅम पॅलेसने दिलेल्या माहितीनुसार चार्ल्स यांच्यावर आऊटपेशंट रुपात उपचार सुरू करण्यात आले. याचा अर्थ ते रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत नसून घरीच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कर्करोगावर उपचार सुरू असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांना किंग चार्ल्स उपस्थित राहू शकत नाहीत. ब्रिटीश दूतावासांनी त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू असल्याचा पुनरुच्चार करून प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे सांगितले. या घटनेने परत एकदा आजच्या डिजिटल युगात चुकीच्या माहितीच्या जलद प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने दाखवून दिली आहेत आणि बातम्यांच्या अचूक तसेच विश्वासार्ह स्रोतांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
रामानंद सेनगुप्ता