नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, 21 भारतीयांचा मृत्यू

0
भारतीय प्रवाशांना पोखराहून काठमांडूला घेऊन जाणारी बस 23 ऑगस्ट 2024 रोजी नेपाळच्या गंडकी प्रांतातील तानाहुन जिल्ह्यात नदीत कोसळली. जखमी झालेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान काम करत आहेत. (रॉयटर्स/स्ट्रिंगर

40 हून अधिक भारतीयांना घेऊन जाणारी बस शुक्रवारी नेपाळमध्ये नदीत कोसळली. या अपघातात किमान 21 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते.

भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बस महामार्गावरुन घसरून 150 मीटर खाली वेगाने वाहणाऱ्या मार्स्यांगडी नदीत  पडली.

भारतीय दूतावासाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सुमारे 43 भारतीयांना घेऊन पोखराहून काठमांडूला जाणारी भारतीय पर्यटक बस आज 150 मीटर खोल मार्स्यांगडी नदीत पडली.

ही बस पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पोखराहून नेपाळची राजधानी काठमांडूला जात होती. ती तानाहुन जिल्ह्यातील आयना पहारा येथे महामार्गावरुन खाली नदीत कोसळली.

शैलेंद्र थापा यांच्या म्हणण्यानुसार, बचावकर्त्यांनी तानाहुन जिल्ह्यात नदीच्या पाण्यातून 22 जणांना बाहेर काढले. थापा हे सशस्त्र पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक आहेत. वाचवण्यात आलेल्या प्रवाशांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

नेपाळ लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी अपघातस्थळी रवाना झाले आहे.

बचाव पथकाने नदीपर्यंत पोहोचण्यासाठी लांब धातूच्या शिड्यांचा वापर केला. तर जखमी आणि मृतांना बाहेर काढण्यासाठी दोरखंडांचा वापर करण्यात आला.

वेगाने वाहणाऱ्या नदीच्या काठावर अस्ताव्यस्त पडलेल्या सामानामध्ये अपघातग्रस्त बसमधील वाचलेल्या, प्रचंड मोठ्या मानसिक धक्क्यात असलेल्या स्त्रिया आणि मुले पडून आहेत तर बचावकर्त्यांनी जवळजवळ बेशुद्ध झालेल्या मुलाला वाहत्या पाण्यातून बाहेर काढले असे व्हायरल झालेल्या व्हिडिओंमधून बघायला मिळाले.

पर्वतीय प्रदेशांमधील रस्ते हे नेहमीच आव्हानात्मक असतात. अतिशय अरुंद आणि धोकेदायक असतात. यामुळे हेअरपिन सारख्या अरूंद आणि वक्राकार रस्त्यांवर मोठी वाहने चालविणे चालकांसाठी अत्यंत आव्हानात्मक असते.

त्यातच मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे अनेकदा तिथल्या हिमालयीन प्रदेशात भूस्खलन होते.

गेल्या महिन्यात, 65 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बसेस नेपाळमधील त्रिशूली नदीत भूस्खलनामुळे वाहून गेल्या होत्या. त्यावेळी दोन्ही बसमधील मृतदेह 100 किलोमीटरपर्यंत त्रिशुली नदीत वाहून गेले होते.

आज झालेल्या अपघातातील बस गोरखपूर येथे नोंदणीकृत होती.

ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleBIMSTEC Summit Postponed; Thailand New Government Needs Be Formed
Next articleRajnath-Austin Talks Focus On Defence Industrial Collaboration And Indo-Pacific

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here