अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीशी भारत करार करेल का?

0
तालिबान
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांचा पहिलाच भारत दौरा म्हणजे राजवटीचे प्राधान्यक्रम आणि हितसंबंध समजून घेण्याची संधी आहे. 
तालिबान ऑगस्ट 2021 मध्ये सत्तेत परतल्यानंतर पहिल्यांदाच अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे 9 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत एका महत्त्वाच्या अधिकृत भेटीसाठी येणार आहेत. तारखा अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या नसल्या तरी, आंतरराष्ट्रीय निर्बंधांना न जुमानता त्यांना प्रवास करण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सूट दिल्यानंतर ही भेट होत आहे.

55 वर्षीय मौलवी अमीर खान मुत्ताकी हे एक वरिष्ठ तालिबानी नेते आहेत ज्यांची मुळे या गटाच्या राजकीय आणि वैचारिक विचारसरणीत खोलवर रुजलेली आहेत. त्यांनी दोन्ही तालिबान राजवटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि संपूर्ण प्रदेशातील राजनैतिक सहभागात चळवळीचा चेहरा राहिले आहेत. सोव्हिएत विरोधी जिहादचे अनुभवी आणि त्यांच्या पहिल्या राजवटीत तालिबान मीडिया आणि सांस्कृतिक संपर्कातील एक प्रमुख व्यक्ती, मुत्ताकी आज इस्लामिक अमिरातीचे मुख्य राजनैतिक अधिकारी म्हणून काम करतात.

गेल्या दोन वर्षांत, त्यांनी चीन, इराण आणि आता भारत यांसारख्या प्रादेशिक शक्तींशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.7 ऑक्टोबर रोजी मॉस्को फॉरमॅट शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर त्यांची नवी दिल्लीला भेट होईल. या शिखर परिषदेत मध्य आशिया, रशिया, चीन आणि इराणचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

भेटीचा अजेंडा

मुत्ताकी यांच्या भेटीत अनेक विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल अपेक्षा आहे:

  • मान्यतेवर लक्ष केंद्रित करणे: तालिबानच्या इच्छा यादीत भारताकडून औपचारिक मान्यता ही सर्वात मोठी गोष्ट आहे. नवी दिल्लीने मर्यादित सहभाग आणि मानवतावादी मदत पुन्हा सुरू केली असली तरी, त्यांनी तालिबानला अफगाणिस्तानचे कायदेशीर सरकार म्हणून औपचारिकपणे अजूनही मान्यता दिलेली नाही.
  • मानवतावादी आणि विकास सहाय्य: अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था अजूनही डळमळीतच आहे, व्यापक अन्न असुरक्षितता आणि आरोग्यसेवा यांची उपलब्धता मर्यादित आहे. आरोग्य, शेती आणि शिक्षण क्षेत्रात अधिक मानवतावादी मदतीची काबूल विनंती करेल अशी अपेक्षा आहे.
  • व्यापार आणि कनेक्टिव्हिटी: चर्चेत द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी, विशेषतः अफगाणिस्तानातील सुकामेवा आणि औषधी वनस्पतींची भारतात निर्यात वाढवण्याचे मार्ग शोधले जातील. पाकिस्तानने निर्माण केलेल्या वाहतूक अडथळ्यांना पार करून पर्यायी मार्ग म्हणून अफगाणिस्तान भारतीय बंदरे, विशेषतः इराणमधील चाबहारचा वापर करण्यास देखील उत्सुक आहे.
  • व्हिसा आणि कॉन्सुलर सेवा: मोठ्या संख्येने अफगाण विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिक भारतात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याने, कॉन्सुलर सहकार्य अजेंड्यावर सर्वोच्च क्रमांकावर असेल.
  • सुरक्षा आणि दहशतवादविरोधी लढा: तालिबानने अलिकडेच प्रादेशिक सुरक्षेवरील सहकार्याबाबत खुलेपणा दाखवला आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यांचा त्यांचा निषेध नवी दिल्लीकडून दुर्लक्षित केला गेलेला नाही. त्यामुळे या भेटीनंतर दहशतवादविरोधी सहकार्यावरील चर्चेची व्याप्ती आणखी वाढू शकते.

    अफगाणिस्तानचे महत्त्व

    भारत अफगाणिस्तानकडे बऱ्याच काळापासून धोरणात्मक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहत आहे. आतापर्यंत एका स्थिर आणि मैत्रीपूर्ण काबूल सरकारने दहशतवादाचा मुकाबला करण्यास मदत केली आहे, यामुळे पाकिस्तानचा प्रादेशिक प्रभाव मर्यादित झाला असून मध्य आशियासाठी ऊर्जा आणि व्यापार कॉरिडॉर उघडण्यास मदत झाली आहे..

    चाबहार बंदर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर सारखे कनेक्टिव्हिटी प्रकल्प महत्त्वाचे असले तरी, भारत अफगाणिस्तानकडे प्रादेशिक शांततेतील भागीदार म्हणून पाहतो. भूतकाळात, भारताने अफगाणिस्तानातील पायाभूत सुविधा, शिक्षण आणि विकास प्रकल्पांमध्ये 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, ज्यामध्ये अफगाण संसद आणि सलमा धरण बांधणे यांचाही समावेश आहे.

    तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून, भारत मानवतावादी दृष्टिकोनाकडे वळले आहे, विशेषत: अलिकडच्या भूकंपानंतर 50 हजार टनांहून अधिक गहू, वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत भारताने पुरवली आहे.

    अफगाणिस्तानला नेमके काय हवे आहे?

    तालिबान राजनैतिक पातळीवर औपचारिक मान्यता, आर्थिक मदत आणि व्यापारी भागीदार शोधत आहे. तालिबानचे चीन, इराण आणि रशियाशी जवळचे संबंध असले तरी, ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रमुख विकास भागीदार असलेल्या भारताशी संवाद साधण्यासाठी ते उत्सुक असल्याचे संकेत देत आहेत.

    इस्लामाबादने अलिकडेच अफगाण निर्वासितांना हद्दपार केल्यानंतर आणि अफगाणिस्तानसाठी व्यापक प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानबद्दल तालिबान गटातही निराशा वाढत आहे. याउलट, भारताकडे एक संभाव्य स्थिरीकरण शक्ती आणि दीर्घकालीन भागीदार म्हणून मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहे.

    धोरणात्मक परिणाम

    प्रादेशिक संरेखनातील महत्त्वपूर्ण बदलांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे. चीन आणि रशियन हितसंबंधांसह पाकिस्तान, इराण आणि भारत यांच्यातील अफगाणिस्तानची संतुलित कृती, दक्षिण आणि मध्य आशियातील सत्तेच्या व्यापक पुनर्रचनाचे प्रतिबिंब पाडणारी आहे.

    भारतासाठी, मुत्ताकींचे स्वागत करणे ही एककडे परीक्षा तर दुसरीकडे संधी आहे: औपचारिक मान्यता न घेता राजनैतिक सहभागामुळे नेमके काय परिणाम होऊ शकतात याची चाचणी आणि वाढत्या चिनी तसेच पाकिस्तानी पाऊलखुणा दरम्यान अफगाणिस्तानात आपला प्रभाव पुन्हा स्थापित करण्याची संधी शोधत आहे.

    हे भारताच्या परराष्ट्र धोरणात वाढत्या परिपक्वतेचे संकेत देखील देते, जे वैचारिक विरोधापेक्षा दीर्घकालीन धोरणात्मक हितसंबंध आणि प्रादेशिक स्थिरतेला प्राधान्य देते.

    तालिबान राजवटीला मान्यता देणे सध्या चर्चेत नसले तरी, सखोल सहभागाचे दरवाजे स्पष्टपणे उघडत आहेत. भारताचे भविष्यातील पाऊल विशेषतः मानवी हक्क, अल्पसंख्याक संरक्षण आणि दहशतवादविरोधी आश्वासनांबाबत तालिबानच्या कृतींवर केंद्रित होण्याची शक्यता आहे.

    हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleभविष्यातील धोक्यांचा सामना करण्यासाठी, लष्कराचा AI कडे वाढता कल
Next articleThrustworks Dynetics Secures Funding to Build India’s Next Rocket Engine Platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here