अमेरिकेसोबतचे संबंध काही महिन्यांत पूर्ववत होऊ शकतात का? तज्ज्ञांचे मत…

0
अमेरिकेसोबतचे

ट्रम्प यांचा बदललेला सूर

“भारत आणि अमेरिकेचे संबंध खास आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही,” हे शब्द होते- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे, जेव्हा ‘भारताला चीनकडे गमावल्याबद्दल तुम्ही कोणाला जबाबदार धरता’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हे ऐकून धक्का बसला ना? काही तासांपूर्वीच, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती, ज्यात त्यांनी म्हटले होते की, “आपण भारत आणि रशियाला अंधारमय चीनकडे गमावले आहे, असे दिसते.” त्यानंतर ट्रम्प यांनी भारताशी आपले संबंध चांगले असल्याचे, एका पोस्टद्वारे म्हटले. ‘संबंधांच्या सकारात्मक मूल्यांकना’ वरून त्यांनी केलेल्या या ताज्या टिप्पणीचे पंतप्रधान मोदींने कौतुक केले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, 50% दंडात्मक शुल्कामुळे भारताचे अमेरिकेसोबतचे बिघडलेले संबंध पूर्ववत व्हायला किती वेळ लागेल? असा प्रश्न उपस्थित होतो.

माजी परराष्ट्र सचिव- विजय गोखले यांना हे लवकरच घडेल असे वाटत नाही. “सध्याच्या स्थितीत काही महिन्यांतच भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी पूर्ववत होईल, याबद्दल मी खूप आशावादी नाही,” असे गोखले यांनी ट्रम्प यांच्या “काळजी करण्यासारखे काही नाही” या टिप्पणीपूर्वी, StratNews Global ला सांगितले.

ट्रम्प यांची भारत रणनीती

गोखले यांना खात्री नाही की, अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे भारतासाठी काही रणनीती आहे. अमेरिकेला जेव्हा मोठा डाव खेळावा लागतो, तेव्हा बळी देण्यासाठी भारत फक्त एक प्यादे आहे का, याबाबतही ते तितकेच अनिश्चित आहेत.

भारत-अमेरिका संबंध याआधी दोनदा तुटले होते, ज्याचा दाखला त्यांनी दिला. त्यापैकी एकदा संबंध पूर्ववत व्हायला बराच वेळ लागला, जवळपास 20 वर्षे इतका. तो दुरावा 1971 साली निर्माण झाला होता, ज्याचे कारण होते भारत-पाकिस्तान युद्ध आणि अमेरिकेने चीनशी साधलेली जवळीक. दुसरा दुरावा 1998 मध्ये, जेव्हा पोखरण अणुचाचण्यांनंतर आला. त्यावेळी अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध लादले, मात्र दोन वर्षांत हा तणाव कमी झाला.

या दोन प्रकरणांमध्ये अमेरिकेचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. 1998 नंतर संबंध लवकर का सुधारले, हे स्पष्ट करताना गोखले सांगतात की, “अमेरिकेने हे स्वीकारले आहे की- भारत पारंपरिक अर्थाने कधीच त्यांचा मित्र (ally) होणार नाही, पण त्यांना हेही कळले की भारत इतका महत्त्वाचा आहे की, त्याच्यात गुंतवणूक करून त्याला आपल्या बाजूने ठेवता येईल.”

“शीतयुद्धाच्या काळात, हे शक्य नव्हते कारण अमेरिकेला सोव्हिएत युनियनविरुद्ध मित्र राष्ट्रांची गरज होती. शीतयुद्धानंतर, अमेरिकेला मित्राची गरज नव्हती, पण त्यांनी ‘अणुशक्ती’ म्हणून असलेले भारताचे महत्त्व ओळखले आणि ते आपल्या बाजूने आले,” असे गोखले म्हणतात.

इतिहासातील या दोन उदाहरणांचा विचार करता, सध्याच्या घडीला भारत-अमेरिका संबंधांची स्थिती नक्की कशाशी जुळते? हे ट्रम्प यांच्या चंचल स्वभावामुळे आणि पारंपरिक राजनैतिक मार्गाने जाण्याऐवजी त्यांच्या व्यवहारिक दृष्टिकोनामुळे, सांगणे कठीण आहे.

“अध्यक्ष ट्रम्प भारताला अमेरिकेसोबतच्या युतीत आणण्यासाठी एक दुय्यम राष्ट्र मानतात, की एक समान राष्ट्र- ज्याच्यासोबत त्यांना संरेखित व्हायचे आहे, हे मी निश्चितपणे सांगू शकत नाही,” असे गोखले म्हणतात.

माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले, यांनी StratNews Global शी बोलताना- भारत-चीन संबंधांच्या सद्यस्थितीवर आणि इतर अनेक मुद्द्यांवर आपले विचार मांडले.

पाहा सविस्तर मुलाखत:

– नितीन अ. गोखले

+ posts
Previous articleअमेरिकेतील 80व्या UNGA सभेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार नाहीत
Next articleयुक्रेनवर रशियाचा सर्वात मोठा हवाई हल्ला, कीवमधील सरकारी इमारतीला आग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here