खतांची वाहतूक करणारे जहाज शनिवारी हुती क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे येमेनच्या किनाऱ्याजवळ बुडाले. त्यामुळे या प्रदेशासाठी एक मोठा पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
संयुक्त अरब अमिरातीहून बल्गेरियाला 21,000 मेट्रिक टन अमोनियम फॉस्फेट सल्फेट खत घेऊन जाणाऱ्या एम. व्ही. रुबीमार या जहाजावर 16 फेब्रुवारी रोजी हुती क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. त्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यांनी या जहाजाला लाल समुद्रात जलसमाधी मिळाली.
जहाजावरील सर्व 24 कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली मात्र समुद्रात सोडले गेलेले इंधन आणि खत यामुळे कोरल रीफ्ससह इतर सागरी जीवांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय मासेमारीवर अवलंबून असलेल्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
एएफपीच्या वृत्तानुसार, येमेन सरकारच्या पर्यावरण संरक्षण संस्थेने इंधन आणि खत यामुळे “दुहेरी प्रदूषण” निर्माण होण्याचा इशारा दिला असून 78,000 मच्छिमार आणि त्यांच्या कुटुंबिय यामुळे बाधित होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली आहे.
गाझावरील इस्रायली हल्ल्यांनंतर हुतींनी आपला मोर्चा लाल समुद्राकडे वळवला आणि रुबीमार त्यांच्या हल्ल्याचे पहिले लक्ष्य ठरले. पर्यावरणीय चिंतेमुळे क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर येमेन, जिबूती आणि सौदी अरेबियाने या जहाजाला बंदरात येण्याची परवानगी नाकारली होती.
1997 मध्ये बांधण्यात आलेल्या या दुर्दैवी मालवाहू जहाजाचे केन शिन असे नामकरण करण्यात आले होते. नंतर 2009 मध्ये चॅथम आयलंड आणि 2020 मध्ये इकारिया आयलंड म्हणून ते ओळखले जात होते, त्यानंतर त्याला रुबीमार असे नाव देण्यात आले. 2022 मध्ये, रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्यावेळी, युक्रेनहून इजिप्तला 35,000 टन गहू नेऊन ‘काळा समुद्र धान्य निर्यात करारात’ जहाज सहभागी झाले होते.
“जहाज बुडल्याने हजारो टन खत पाण्यात मिसळू शकते. यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास मोठ्या पर्यावरणीय संकटाचा सामना करावा लागेल,” असे ग्रीनपीसचे मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकातील कार्यक्रम संचालक ज्युलियन ज्रेसाती यांनी एएफपीशी बोलताना सांगितले.
अमेरिकन नौदलाच्या बहरीनस्थित पाचव्या फ्लीटचे प्रमुख जॉर्ज विकॉफ यांनी मंगळवारी दोहा येथे एका परिषदेत सांगितले की, “रुबीमार या बुडत्या जहाजावरील वाहून आलेली टनभर रसायने लाल समुद्रात मोठ्या प्रमाणात शेवाळे आणि खराब झालेल्या प्रवाळांच्या रूपात पर्यावरणीय धोका निर्माण करू शकतात”. एकंदर जागतिक व्यापारापैकी सुमारे 12 टक्के व्यापार या प्रदेशातून होत असतो. त्यामुळे इतर जहाजांसाठी प्रवासाच्या दृष्टीने हे जहाज “धोकादायक ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
हौती क्रांतिकारी समितीचा नेता मोहम्मद अली अल-हौती याने, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांचे सरकार गाझामधील “नरसंहार आणि युद्धाला” पाठिंबा देत असल्यामुळे या घटनेसाठी ते “जबाबदार आहेत” असे म्हटले आहे. गाझामध्ये मदत घेऊन जाणाऱ्या ट्रक्सना परवानगी देत असल्याची हमी ब्रिटिश पंतप्रधानांकडे द्यावी अशी मागणी त्याने एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये केली आहे.
या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या येमेनच्या पर्यावरण मंत्रालयाला मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमातील पाच तज्ञ या आठवड्यात येमेनमध्ये दाखल होणार आहेत.
रामानंद सेनगुप्ता