अग्निपथ योजनेवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सी. ए. पी. एफ.) माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करेल, अशी घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) केली आहे. बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि एसएसबी यांसारख्या केंद्रीय दलांच्या प्रमुखांनी माजी अग्निवीरांची भरती करण्यासाठी, वयोमर्यादा शिथील करण्यासाठी आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.
सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंग, बीएसएफचे प्रमुख नितीन अग्रवाल, सीआरपीएफचे महासंचालक अनीश दयाल, सशस्त्र सीमा दलाचे महासंचालक (एसएसबी) दलजित सिंग चौधरी आणि आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी गुरुवारी जाहीर केले की, त्यांच्या संबंधित दलांमध्ये 10 टक्के कॉन्स्टेबल पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवली जातील.
“केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात अग्निवीरांची भरती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. या संदर्भात सीआयएसएफनेही सर्व व्यवस्था केली आहे. कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांपैकी 10 टक्के पदे माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील. याव्यतिरिक्त, त्यांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीमध्ये सवलत दिली जाईल, असे सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंग यांनी सांगितले.
सीआयएसएफच्या महासंचालकांनी नमूद केले की माजी अग्निवीरांना शारीरिक चाचण्यांबरोबरच वयोमर्यादेतही सूट मिळेल. “पहिल्या वर्षी, वयाची सवलत पाच वर्षांसाठी आहे आणि त्यानंतरच्या वर्षी, वयाची सवलत तीन वर्षे असेल,” असे सिंग यांनी स्पष्ट केले. माजी अग्निवीर याचा फायदा घेत असल्याची सीआयएसएफ खात्री करेल, असेही त्यांनी आश्वासन दिले.
माजी अग्निवीरांचा सीआरपीएफमध्ये समावेश करून घेण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी झाल्याचे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक अनीश दयाल यांनी सांगितले. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला पाच वर्षांची वयोमर्यादा देण्यासाठी भरती नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त, त्यांना 10 टक्के आरक्षण मिळेल, शिवाय शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) मधून सूट दिली जाईल.
“भविष्यात, रेल्वे सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल पदासाठीच्या सर्व भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण असेल,” अशी घोषणा आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी गुरूवारी केली. “माजी अग्निवीरांचे स्वागत करण्यासाठी आरपीएफ खूप उत्सुक आहे. यामुळे दलाला नवीन ताकद आणि ऊर्जा मिळेल. शिवाय दलाचे मनोबलही वाढेल,” असेही ते म्हणाले.
त्याचप्रमाणे, बीएसएफने देखील जाहीर केले आहे की ते वचन दिल्याप्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज होत आहेत. “सैनिकांनो, आम्ही तयार होत आहोत; यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. सर्वच दलांना त्याचा फायदा होईल. माजी अग्निवीरांना भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण मिळेल, असे बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी सांगितले.
“त्यांना चार वर्षांचा अनुभव आहे. ते पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित कर्मचारी आहेत. आम्हाला प्रशिक्षित सैनिक मिळत असल्याने बीएसएफसाठी हे खूप चांगले आहे. थोड्याशा प्रशिक्षणानंतर त्यांना सीमेवर तैनात केले जाईल,” असे अग्रवाल यांनी सांगितले.
सशस्त्र सीमा बलचे महासंचालक दलजित सिंग चौधरी म्हणाले की, एसएसबीनेही भरती नियमांमध्ये सुधारणा केली आहे. “पहिल्या तुकडीला पाच वर्षांची वयोमर्यादा दिली जाईल,” असे ते म्हणाले.
जून 2022 मध्ये सरकारने साडे सतरा ते एकवीस वर्ष वयोगटातील तरुणांना डोळ्यासमोर ठेवत चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात भरती करण्यासाठी महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजना सुरू केली. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक तुकडीतून भरती होणाऱ्या 25 टक्के लोकांना नियमित सैन्य दलात भरती केले जाईल, तर 75 टक्के लोक नागरी जीवनात परत येतील अशी तरतूद त्यात करण्यात आली होती.
या नवीन योजनेला देशभरात मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यावेळी गृह मंत्रालयाने केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समधील 10 टक्के पदे 75 टक्के अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली होती. गृह मंत्रालयाने असेही म्हटले होते की माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठीची कमाल वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत आणि त्यानंतरच्या तुकड्यांसाठी तीन वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे याव्यतिरिक्त, माजी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट दिली जाईल.
निमलष्करी दलांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष अशी आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत, लष्कर, हवाई दल किंवा नौदलात चार वर्षे सेवा केल्यानंतर पहिल्या तुकडीसाठी वयाच्या तिशीपर्यंत आणि त्यानंतरच्या तुकड्यांसाठी 28 वर्षांपर्यंत सीआयएसएफद्वारे सशस्त्र दलात भरती केली जाऊ शकते.
टीम भारतशक्ती