उत्तर चीनच्या हेबेई प्रांतातील एका भाजी मंडईमध्ये लागलेल्या आगीत, 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले, अशी माहिती राज्य प्रसारक सीसीटीव्ही यानी शनिवारी प्रसिद्ध केली.
झांगजियाको शहरातील भाजी मार्केटमध्ये सकाळी 8.40 वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग तासाभरात आटोक्यात आली. संबंधित अधिकारी आग का लागली याचा तपास करत आहेत.
चीनच्या वेइबो मायक्रोब्लॉगिंग साइटवर तसेच अन्य काही माध्यमांवर या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला गेला, ज्यामध्ये आगीच्या महाकाय ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट दिसत होते.
रिपोर्रटनुसार, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बहुतांशी लोकांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
लिगुआंग भाजी मार्केट म्हणून ओळखले जाणारे हे मार्केट, 2011 पासून कार्यरत आहे आणि कंपनी माहिती प्लॅटफॉर्म Qichacha च्या डेटानुसार इथे फळं, सीफूड आणि इलेक्ट्रॉनिक्ससह विविध प्रकारच्या वस्तूंची नियमीत विक्री होते.
अन्य बाजारपेठांमधील सुपरमार्केट साखळींच्या तुलनेत, या मार्केटमध्ये उत्पादने घाऊक वा कमी किमतीत मिळत असल्यामुळे, हे मार्केट कायमच लोकांनी गजबजलेले असते.
दरम्यान, मार्केटमध्ये लागलेल्या आगीच्या संभाव्य कारणांमध्ये- गॅसच्या बाटल्या, मांस भाजण्यासाठी वापरण्यात येणारा कोळसा, किंवा न विझलेली एखादी सिगारेट अथवा परिसरात असलेल्या अंडर ग्राउंड जुन्या गॅस लाईन्स यांचा समावेश असू शकतो, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
Zhangjiakou ज्या शहरात ही बाजारपेठ आहे, तिथे 2022 मध्ये हिवाळी ऑलिम्पिक खेळा आयोजित करण्यात आले होते.
चीनच्या बाजारपेठांमधील आगीच्या घटना
अलिकडच्या काही वर्षांत, चीनने बाजारपेठांमध्ये अनेक मोठ्या आगीच्या घटना पाहिल्या आहेत, ज्यामुळे कायम गर्दीने गजबजलेल्या पारंपारिक बाजारपेठांमधील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या सर्व घटना, बाजारपेठांमधील अपुरे अग्निसुरक्षा उपाय, ज्वलनशील पदार्थांची अयोग्य साठवण आणि मार्केटमध्ये होणारी लोकांची अनियंत्रीत गर्दी, यामुळे निर्माण होणारे धोके अधोरेखित करतात.
2008 मध्ये, शेन्झेनमधील घाऊक बाजारात लागलेली आग सर्वात भयंकर होती, ज्यामध्ये सुमारे 43 जणांचा मृत्यू झाला होता.
नियंत्रणाबाहेरील गर्दी, अपुरी व्यवस्था आणि विद्युत उपकरणांची चुकीची हाताळणी यामुळे अशा दुर्घटना वारंवार होत असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे.
2013 मध्ये शांघायमधील पोल्ट्री घाऊक बाजाराला लागलेल्या आगीत 12 लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे सुरक्षेचे उल्लंघन आणि विलंबित सुव्यवस्थेचा चेहरा उघड झाला होता.
2019 मध्ये, हेबेई प्रांतातील Baigou मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये, 700 हून अधिक स्टॉल नष्ट झाल्याकारणाने, लक्षणीय आर्थिक नुकसान झाले परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
अगदी अलीकडे, 2021 मध्ये चोंगकिंगमधील बाजारपेठेत लागलेल्या आगीत, अनेक लोक जखमी झाले होते, ज्यामुळे पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली होती.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशी आगी लागण्यामागे, ओव्हरलोड इलेक्ट्रिकल सर्किट्स, गॅस सिलिंडरचा अयोग्य वापर आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणे अशा प्राथमिक कारणांचा समावेश असतो.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)