हुआवेई आणि ॲपलने शुक्रवारी चीनमध्ये त्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च केले. मात्र, सर्वात जास्त मागणी असलेला 2 हजार 800 अमेरिकन डॉलर्स किंमतीचा मेट एक्सटी फोन वॉक-इन ग्राहकांसाठी उपलब्ध नसल्याने अनेक हुआवेई चाहत्यांची निराशा झाली. याशिवाय आयफोन 16 प्रो मॅक्सच्या दुप्पट किंमत असलेल्या या ट्रायफोल्डेबल फोनची पूर्व-मागणी करणाऱ्यांसाठीही मर्यादित हॅण्डसेटच उपलब्ध होते.
हुआवेई स्टोअरमधील निराश चाहते
शेनझेनमधील हुआवेईच्या फ्लॅगशिप स्टोअरमध्ये केवळ पूर्व-मागणीद्वारे नोंदणी केलेले ग्राहकच मेट एक्सटी खरेदी करू शकतात हे कळल्यानंतर इतर अनेक ग्राहकांनी निराशा व्यक्त केली. रात्रभर वाट पाहणारा ये नावाचा विद्यार्थी निराश होऊन म्हणाला, “आम्ही खरेदी करू शकत नाही हे त्यांनी आधीच स्पष्टपणे सांगायला हवे होते.”
अशीच परिस्थिती बीजिंगमधील हुआवेईच्या स्टोअरमध्ये होती. तिथे मेट एक्सटी फोन फक्त प्री-ऑर्डर ग्राहकांपुरताच मर्यादित होता. दुकानात सुमारे 30 लोक रांगेत उभे असल्याचे दिसले, तर ॲपलच्या बीजिंग येथील दुकानात सुमारे 100 लोक नवीन आयफोनची वाट पाहत होते.
मेट एक्सटीबाबत संमिश्र प्रतिक्रिया
ज्यांना शेनझेनमध्ये मेट एक्सटीची चाचणी घेण्याची संधी मिळाली होती, ते फारसे प्रभावित झाले नाहीत. रुई नावाच्या एका ग्राहकाने टिप्पणी केली, “मला हा गोंधळ नक्की कशासाठी आहे हे पाहायचे होते, परंतु ते हॅण्डसेट थोडे मोठे असून फारसे व्यवहार्य नाहीत.”
पुरवठा साखळीतील समस्येमुळे अनेक संभाव्य खरेदीदारांना नवा फोन मिळणे शक्य नाही. याशिवाय हॅण्डसेटची मर्यादित उपलब्धता यामुळेही ग्राहकांची चिंता वाढली आहे. विशेषतः आर्थिक मंदीच्या काळात मेट एक्सटीच्या असणाऱ्या भरमसाठ किंमतीवरही विश्लेषकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हुआवेईचा प्रतिसाद आणि बाजारपेठेवरील परिणाम
अनेक आव्हाने असूनही, हुआवेईच्या फोनसाठी मोठी मागणी नोंदवली गेली. कार्यकारी संचालक रिचर्ड यू यांनी सांगितले की अपेक्षेपेक्षा जास्त विक्री झाली आणि काही सेकंदात फोन विकले गेले. मेट एक्सटीच्या प्री-ऑर्डरने 65 लाखांचा टप्पा पार केला, ज्यामुळे या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक फोल्डेबल स्मार्टफोनची शिपमेंट जवळजवळ दुप्पट झाली. मात्र कंपनीने अद्याप किती मेट एक्सटी युनिट्सचे उत्पादन केले आहे किंवा लॉन्चिंगच्या दिवशी किती ग्राहकांना हॅण्डसेट मिळाले ते उघड केलेले नाही.
शेनझेनच्या हुआकियांगबेई इलेक्ट्रॉनिक्स बाजारात, काही विक्रेते मॅट एक्सटीची सर्वात महागडी आवृत्ती मूळ किंमतीपेक्षा लक्षणीय जास्त किंमतीला विकत होते. किंमत अधिक असल्यामुळे खरेदीदार मर्यादित होते.
चीनमध्ये ॲपलची स्थिती
एकेकाळी चीनमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या ॲपल कंपनीचे स्थान चीनच्या स्मार्टफोन बाजारात तिसऱ्यावरून सहाव्या स्थानावर घसरले आहे. ॲपलचा नवा आयफोन 16 प्रो मॅक्स हा हुआवेईच्या मेट एक्सटी सोबत लॉन्च करण्यात आला असला तरी चीनमध्ये एआय भागीदार नसल्यामुळे त्याचे लॉन्चिंग काहीसे झाकोळल्यासारखे झाले आहे. ऍपल इंटेलिजेंस हे कंपनीचे एआय सॉफ्टवेअर पुढील वर्षी केवळ चिनी भाषेत उपलब्ध होईल. अर्थात असे असूनही, शीसारख्या काही ॲपल ग्राहकांच्या मते एआय सॉफ्टवेअर नसणे ही अजूनतरी काही फार महत्त्वाची समस्या नाही.
हुआवेईला देशभक्तीचा फायदा
हुआवेईला चीनमध्ये जोरदार देशभक्तीपर पाठिंबा मिळत आहे. जिआंग नावाच्या व्यवसाय मालकासारखे अनेक चिनी ग्राहक सध्याच्या तांत्रिक आणि चिपशी संबंधित मर्यादा असूनही हुआवेईला पाठिंबा देण्यास उत्सुक आहेत. मेट एक्सटीचे झालेले लॉन्चिंग – ज्यात स्थानिक पातळीवर तयार केलेले चिपसेट आहे – मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची चिंता कायम असली तरी अमेरिकेच्या निर्बंधांवर मात करण्याची कंपनीची क्षमता दाखवून देणारे आहे.
रेशम
(रॉयटर्स)