चिनी तटरक्षकदलाच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्र रोखले नाही

0
China-Philippines tensions:
‘सेकंड थॉमस शोल’वरील बीआरपी सिएरा माद्रे या युद्धनौकेवर तैनात फिलिपिन्सचे सैनिक फिलिपिन्सच्या ध्वजाची घडी घालताना.

फिलिपिन्सचा दावा: चीनने केलेला आरोप नाकारला

दि. ०४ जून: दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्सच्या ताब्यात असलेल्या ‘सेकंड थॉमस शोल’वर चिनी तटरक्षकदलाची नौका अतिशय जवळ आली  होती. त्यामुळे फिलिपिन्सच्या नौदलातील कर्मचाऱ्यांनी आपली शस्त्रे हातात घेतली होती. मात्र, त्यांनी चिनी तटरक्षकदलातील कर्मचाऱ्यांवर शस्त्रे रोखली नाहीत, असा दावा फिलिपिन्सच्या संरक्षणदलप्रमुखांनी केला आहे. या बाबत चीनने केलेला आरोपही त्यांनी फेटाळला आहे.

दक्षिण चीन समुद्रातील ‘सेकंड थॉमस शोल’ ही पाणथळ जागा १९९९ पासून फिलिपिन्सच्या ताब्यात आहे. या पाणथळ जागेत फिलिपिन्सची बीआरपी सिएरा माद्रे ही युद्धनौका फसल्यामुळे सोडून देण्यात आली आहे. या नौकेवर १९९९ पासून फिलिपिन्सने आपला सागरी तळ उभारला आहे. या तळावर फिलिपिन्सच्या नौदलाकडून नियमित रसद पुरवठाही करण्यात  येतो. चीनने या जागेवर आपला दावा सांगितला आहे. दक्षिण चीन समुद्राच्या स्वमित्त्वावरून चीन आणि दक्षिण चीन समुद्राच्या परिसरात असणाऱ्या देशांमध्ये वाद सुरु आहेत. फिलिपिन्सला या जागेवर असणाऱ्या त्यांच्या नौदलातील कर्मचाऱ्यांना रसद पुरवठा करण्यास चीनकडून सातत्याने विरोध केला जात आहे. या वरून उभय देशांत संघर्षाचे प्रसंगही उद्भवले आहेत. या जागेवर रसद पुरवठा करण्यासाठी जात असलेल्या फिलिपिन्सच्या बोटीला रोखण्याचा प्रयत्न चिनी तटरक्षकदलाने केला होता. त्यावेळी चिनी तटरक्षकदलाची नौका फिलिपिन्सच्या नौकेच्या अगदी जवळ आल्याने स्वसंरक्षणासाठी फिलिपिन्सच्या नौदलातील सैनिकांनी आपली शस्त्रे हातात घेतली होती. मात्र, त्यांनी चिनी तटरक्षकदलातील कर्मचाऱ्यांवर शस्त्रे रोखली नाहीत, असे फिलिपिन्सच्या संरक्षणदलांचे प्रमुख रोमिओ ब्राव्नेर यांनी सांगितले. ‘फिलिपिन्सच्या नौदलातील कमीतकमी दोन जणांनी चिनी कर्मचाऱ्यांवर शस्त्र रोखले होते, असा चीनच्या सीसीटीव्ही या सरकारी वाहिनीने केलेला आरोपही त्यांनी फेटाळला आहे. चीनच्या तटरक्षकदलाची नौका बीआरपी सिएरा माद्रे या नौकेपासून केवळ दहा मीटर अंतरावर आली होती. फिलिपिन्सच्या सैनिकांना रसद पुरवठा करण्यासाठी विमानातून टाकलेली सामग्रीही तयंनी ताब्यात घेतली. त्यांचे हे कृत्य चिथावणी देणारे आणि बेकायदा होते, असेही ब्राव्नेर यांनी सांगितले

चीनकडून ‘सेकंड थॉमस शोल’सह संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा सांगितला जातो. त्यामुळे या भागात चीनकडून असंख्य छोट्या बोटींच्या माध्यमातून या भागातील सागरी मार्गावर गस्त घालण्यात येते. फिलिपिन्सकडून त्याचा उल्लेख ‘चायनीज मेरिटाइम मिलिशिया’ असा करण्यात येतो. चीनने मात्र, फिलिपिन्सकडून करण्यात आलेला हा दावा फेटाळला आहे. फिलिपिन्सच्या सैनिकांनी चिनी तटरक्षकदलाच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्र रोखल्याचा पुनरुच्चार चीनने केला आहे.

 

विनय चाटी

(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)


Spread the love
Previous articleSouth Korea To Resume All Military Activities Along Line Of Demarcation
Next articleरॅन्समवेअर हल्ल्यामुळे लंडनच्या आरोग्य सेवेवर मोठा परिणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here