रॅन्समवेअर हल्ल्यामुळे लंडनच्या आरोग्य सेवेवर मोठा परिणाम

0
रॅन्समवेअर
रुग्णवाहिका आणि किंग्ज कॉलेज रुग्णालयातील आपत्कालीन प्रवेशाचे संग्रहित छायाचित्र

रॅन्समवेअर हल्ल्याच्या घटनेचा लंडनच्या काही सर्वात व्यस्त रुग्णालयांमधील सेवांच्या वितरणावर लक्षणीय परिणाम झाला असल्याचे या प्रदेशातील आरोग्य सेवेने मंगळवारी जाहीर केले.

प्रयोगशाळा सेवा पुरवठादार सिननोव्हिस सोमवारी या घटनेचा बळी ठरला, असे सरकारी राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) इंग्लंड लंडन क्षेत्राने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दक्षिण पूर्व लंडनमधील गाईज ॲन्ड सेंट थॉमस, किंग्ज कॉलेज हॉस्पिटल एनएचएस फाऊंडेशन ट्रस्ट आणि प्रायमरी केअर सर्व्हिसेसमधील सेवा वितरणावर याचा लक्षणीय परिणाम झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

या घटनेचा परिणाम पूर्णपणे समजून घेण्यासाठी देशातील मुख्य सायबर सुरक्षा संस्था, नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर (एनसीएससी) आणि त्यांच्या स्वतःच्या सायबर ऑपरेशन्स टीमसोबत तातडीने काम करत असल्याचे आरोग्य सेवेने म्हटले आहे.

मे 2017 मधील अशाच एका सायबर घटनेमुळे जगभरातील व्यवसाय आणि सरकारी सेवा विस्कळीत झाल्या होत्या. त्याचा फटका इंग्लंडच्या 236 एनएचएस ट्रस्टपैकी एक तृतीयांश ट्रस्टला बसला होता.त्यामुळे एका आठवड्याच्या कालावधीत अंदाजे 19 हजार अपॉइंटमेंट्स रद्द कराव्या लागल्या होत्या.

रॅन्समवेअर हा एक प्रकारचा मालवेअर आहे जो खंडणी (पैसा) मिळेपर्यंत डेटा आणि संबंधित उपकरणे ओलीस ठेवतो (बंद पाडतो). रॅन्समवेअर हल्ल्यांमुळे कार्यात लक्षणीय व्यत्यय येऊ शकतो. याशिवाय महत्वाची माहिती आणि डेटा गमावला जाऊ शकतो.

नोव्हेंबर 2022 मध्ये, भारतातील नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सर्व्हरवर झालेल्या रॅन्समवेअर हल्ल्यानंतर त्याचा धोका निष्प्रभ करण्याआधी दोन आठवड्यांहून अधिक काळ विविध सेवांवर त्याचा लक्षणीय प्रभाव पडला होता. त्यामुळे अनेक सेवा नाकारल्या जात होत्या. याशिवाय देशातील अति महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरच इतर जवळपास 4 कोटींहून अधिक आरोग्य नोंदींशी छेडछाड करण्यात आल्याचे वृत्त आहे.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleचिनी तटरक्षकदलाच्या कर्मचाऱ्यांवर शस्त्र रोखले नाही
Next articleUnveiling Shivaji: The Forefather of Modern Guerrilla Warfare and Intelligence Strategies: Part III

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here