विद्यापीठ, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे लष्करी प्रशिक्षण वाढवण्यासाठी चीनने आपल्या राष्ट्रीय संरक्षण शिक्षण कायद्यात सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. एप्रिलमध्ये नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने पहिल्यांदाच मांडलेल्या या मसुद्यात विद्यापीठ, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अगदी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षण प्रशिक्षणावर भर देण्यात येईल.
निक्केईच्या एका अहवालानुसार अनेक विद्यापीठांनी याआधीच बूटकॅम्प सुरू केले आहेत. यात विद्यार्थ्यांना बंदुक कशी वापरायची, ती लोड करायची, चिलखती वाहने कशी चालवायची याचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. मात्र अहवालात, हे केवळ मानवी प्रशिक्षणाचाच उल्लेख करण्यात आलेला नाही. एआय, रोबोटिक्स आणि अंतराळ यासारख्या ‘उदयोन्मुख क्षेत्रांकडे’ही राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लक्ष वेधले आहे. हे सगळे चिनी लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेचा भाग असले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे.
व्हीओएच्या अहवालानुसार चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने – देशाच्या विधिमंडळाने- गेल्या आठवड्यात सुधारणांचे पहिले वाचन सुरू केले. हे बदल मे महिन्याच्या अखेरपर्यंत सार्वजनिक अभिप्रायासाठी देखील खुले आहेत, मात्र यावर व्यापकपणे वादविवाद होण्याची जवळपास शक्यता नाही.
या प्रशिक्षणाची जबाबदारी शिक्षण मंत्रालय आणि चीनची सर्वोच्च संरक्षण संस्था असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय लष्करी आयोगावर (सीएमसी) टाकण्यात आली आहे. या विधेयकातील सुधारणांमध्ये स्थानिक आणि केंद्रीय अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांवरील देखरेख आणि प्रशिक्षण अधिक बळकट करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या विधेयकावर टीका करणाऱ्यांच्या मते, लष्करी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल सत्तारूढ पक्षाशी एकनिष्ठता दाखवण्यासाठी असून ढासळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या भेडसावणाऱ्या प्रश्नांपासून देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचा (एनबीएस) हवाला देत ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार 16-24 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण फेब्रुवारीमध्ये 15.3 टक्के इतके होते.
अहवालात असे म्हटले गेले आहे की चीनमधील परिस्थिती हळूहळू सुधारत असताना, 2024 मध्ये 11.7 लाखांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी पदवीधर होतील असा अंदाज आहे. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांची संख्या परत एकदा वाढण्याची शक्यता आहे.
पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘जागतिक युद्ध थांबवण्याचे’ आवाहन करणारे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनला युद्धासाठी तयार राहण्याची गरज असल्याचे हे सांगणे यात फार मोठा विरोधाभास आहे. सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांच्या मते, तैवानवर यशस्वी आक्रमण करण्यासाठी 2027 पर्यंत पूर्ण तयारीनिशी सज्ज राहण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेने तयार राहणे आवश्यक आहे.
“मला वाटते की अमेरिकेमधील धोरणात्मक बाब म्हणून, यथास्थितीबद्दल असणारी आमची वचनबद्धता दाखवून देणे आणि ती स्थिती बदलण्यात एक देश म्हणून आम्हाला स्वारस्य नाही, हे स्पष्ट करणे हे आमच्या हिताचे आहे. एकतर्फीपणे आणि विशेषत: बळाचा वापर करून ते बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचाही आम्ही मनापासून विरोध करतो,” असे सांगत बर्न्स पुढे म्हणाले की, तैवानबरोबरचा संघर्ष “चीनसह त्यात सामील असलेल्या प्रत्येकासाठी …अत्यंत दुर्दैवी असेल.”
अश्विन अहमद
(वृत्तसंस्थांच्या इनपुट्सह)