चीनची जपानला सक्त ताकीद; ताकाईची यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वाढला तणाव

0
ताकाईची

जपानच्या पंतप्रधान सनेई ताकाईची यांनी, तैवानवर केलेल्या टिप्पणी विरोधात चीनने जपानकडे तीव्र निषेध नोंदवला आहे, ज्यामुळे दोन्ही आशियाई शेजाऱ्यांमधील तणाव वाढला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सोमवारी सांगितले की, “बीजिंगने टोकियोकडे याबाबत ‘गंभीर आक्षेप’ नोंदवला आहे, कारण ताकाईची यांचे वक्तव्य चीनला आपल्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप वाटतो.”

बीजिंगचा ‘प्रक्षोभक’ वक्तव्यांवर आक्षेप

पत्रकार परिषदेदरम्यान लिन म्हणाले की, “ताकाईची यांची अलीकडील वक्तव्ये ‘प्रक्षोभक’ असून, यामुळे द्विपक्षीय संबंधांना हानी पोहोचू शकते.” त्यांनी, जपानला तैवानच्या मुद्द्यावर कुठलेही विधान न करण्याचे आवाहन केले आणि अशा वक्तव्यांमुळे “चीन-जपान संबंधांचे गंभीर नुकसान होईल” असा इशाराही दिला.

क्योडो वृत्तसंस्थेनुसार, ताकाईची यांनी शुक्रवारी जपानी संसद सदस्यांना सांगितले की, “तैवानवर चीनकडून होणारा संभाव्य हल्ला जपानसाठी ‘अस्तित्वाला धोका निर्माण करणारी परिस्थिती’ ठरू शकते.” त्यांच्या या वक्तव्याने टोकियोमध्ये वाढत्या सुरक्षेच्या चिंता आणि स्वशासित तैवानवरील चीनच्या लष्करी दबावाबद्दलची काळजी अधोरेखित झाली.

प्रदेशातील वाढता तणाव

बीजिंग तैवानला आपलाच भूभाग मानते, तसेच त्यांनी इतर देशांना “फुटीरतावादी” किंवा “प्रक्षोभक” कृतींपासून दूर राहण्याचा वारंवार इशाराही दिला आहे. दुसरीकडे, जपानने तैवान सामुद्रधुनीतील शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी वाढत्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला आहे, कारण जपानला तैवानची सुरक्षा ही थेट आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेली आहे असे वाटते.

पूर्व चीन समुद्रातील सागरी वाद आणि वाढत्या लष्करी गतिविधींमुळे दोन्ही देशांमधील संबंध आधीच तणावपूर्ण असताना, हा नवीन ‘शाब्दिक’ वाद समोर आला आहे. दोन्ही देश एकमेकांविरूद्ध राजकीय निषेध नोंदवत असताना, प्रादेशिक विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, ताकाईची यांच्या या वक्तव्यामुळे टोकियो आणि बीजिंगमधील संबंध स्थिर करण्याचे प्रयत्न अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleराजनाथ सिंह यांनी घेतला DPSU चा आढावा
Next articleदक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष यून यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here