पूर्व चीन समुद्रातील घटना, हेलिकॉप्टरलाही घेरल्याचा दावा
दि. ०८ जून: पूर्व चीन समुद्रात गस्तीवर असलेल्या डच नौदलाच्या ट्रॉम्प या युद्धनौकेला चिनी हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी आक्रमकपणे घेरल्याचा दावा नेदरलँड्सच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. त्याचबरोबर या युद्धनौकेवर असलेल्या हेलिकॉप्टरलाही नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने घेरण्यात आले होते, असे नेदरलँड्सने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाविरोधात घातलेल्या बंदीच्या अनुषंगाने पूर्व चीन समुद्रात गस्ती घालण्यासाठी नेदरलँड्सच्या नौदलाची ट्रॉम्प ही युद्धनौका पूर्व चीन समुद्रात आली होती. या वेळी चिनी हवाईदलाच्या दोन लढाऊ विमानांनी या युद्धनौकेला घेरले होते. ही घटना बऱ्याचदा घडली. त्यानंतर चिनी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या ताफ्याने ट्रॉम्पवरील एनएच-९० या हेलिकॉप्टरला घेरले होते. ही विमाने आमची युद्धनौका आणि हेलिकॉप्टरला नुकसान पोहोचवू शकतील इतकी जवळ आली होती, असे नेदरलँड्सच्या संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. ही युद्धनौका चीनच्या सागरी हद्दीबाहेर आंतरराष्ट्रीय समुद्रात असताना हा प्रकार घडला, अशी माहिती देण्यात आली आहे. ट्रॉम्पही युद्धनौका जपानकडे जाणार असून, नंतरच्या टप्प्यात प्रशांत महासागराच्या किनारपट्टीवरील देशांच्या नौदल सरावात सहभागी होण्यासाठी ती हवाईकडे रवाना होणार आहे.
चीनची दादागिरी
दक्षिण चीन समुद्राप्रमाणेच पूर्व चीन समुद्रातही चीनने दादागिरी सुरु केली आहे. चीनचा जपानबरोबर सेनकाकू बेटांच्या मालकीवरून वाद आहे. त्यामुळे चीन या भागात सातत्याने आपली लष्करी ताकद दाखवून जपानला धमकाविण्याचा प्रयत्न करीत असतो. पूर्व चीन समुद्रातील जपानच्या ताब्यात असलेल्या सेनकाकू बेटांच्या किनाऱ्यालगत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या स्पीड बोटी आणि तटरक्षकदलाच्या नौकांनी शुक्रवारी युद्धसराव केला होता. पूर्व चीन समुद्रात असलेल्या सेनकाकू बेटांवरून जपान आणि चीनदरम्यान जुनाच वाद आहे. ही बेटे जपानच्या इशिगाकी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येतात, असे जपानचे म्हणणे असले, तरी चीनकडून या बेटांना दिओयू असे नाव देण्यात आले आहे. या बेटांच्या मालकीवरून उभय देशांत सातत्याने विवाद सुरु असतो. या भागातील देशांना आपल्या लष्करी ताकदीच्या दबावाखाली ठेवण्याचा चीनकडून प्रयत्न करण्यात येत असतो. त्याचाच एक भाग म्हणून चिनी लष्कर आणि तटरक्षदलाकडून हा सराव करण्यात आला असल्याचे मत व्यक्त होत आहे. ‘राष्ट्रीय हिताची जपणूक करण्याच्या उद्देशाने चीनकडून आपल्या क्षेत्रीय समुद्रात युद्धसराव करण्यात आला,’ असे चिनी तटरक्षकदलाच्या पत्रकात म्हटले आहे, असे वृत्त या वाहिनीने दिले होते.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)