कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने, सहाव्या ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ (ASW-SWC) जहाजाच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने भारतीय नौदलासोबतच्या संयुक्त कराराअंतर्गत कोचीन शिपयार्डने एक नवे पाऊल टाकले आहे. भारताच्या किनारपट्टीच्या संरक्षण क्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशातून, डिझाइन केलेल्या अशा ८ प्रगत ‘अँटी-सबमरीन जहाजांची’ निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने बुधवारी दिली.
या मालिकेतील सहावे जहाज- ‘BY 528, Magdala’ च्या निर्मिती प्रक्रियेला मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली. या निमित्ताने CSL येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, दक्षिण नौदल कमांडचे मुख्य कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षक)- रिअर ॲडमिरल ‘सतीश शेनई’. या खास सोहळ्यासाठी वरिष्ठ नौदल अधिकारी, CSL प्रतिनिधी आणि DNV वर्गीकरण सोसायटीचे अधिकारी देखील उपस्थित होते.
एप्रिल 2019 मध्ये संरक्षण मंत्रालय (MoD) आणि CSL यांच्यात, या जहाजांच्या निर्मितीचा करार झाला होता. ‘Mahe class‘ नामक ही जहाजे, सध्या भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या जुन्या ‘अभय-क्लास ASW कॉर्वेट्स’ची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत. सागरी किनारपट्टीवरील पाणबुडीविरोधी ऑपरेशन्ससाठी डिझाइन केलेली, ही माहे-क्लास जहाजे कमी-तीव्रतेच्या सागरी ऑपरेशन्ससाठी (LIMO), खाणींच्या ठिकाणी काम करण्यासाठी आणि भूपृष्ठावर पाळत ठेवण्यासाठी पूर्णत: सुसज्ज आहेत.
प्रत्येक जहाज हे ASW-SWC 25 नॉट्सपर्यंत गती प्राप्त करण्यास सक्षम असेल आणि पाण्याखालील शोधकार्यासाठी तसेच पाळत ठेवण्यासाठी अत्याधुनिक व स्वदेशी निर्मिती असलेल्या ‘सोनार प्रणालीने’ (SONAR) सज्ज असेल. हे जहाज म्हणजे, ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांतर्गत तांत्रिक स्वावलंबनाचे एक उत्तम प्रतिक आहे, जे लक्षणीय स्वदेशी सामग्रीसह उच्च-तंत्र युद्धनौका बांधण्याच्या क्षेत्रांत देशाचे नाव उंचावते. देशाच्या वाढत्या नौदल कौशल्याचे प्रतिनिधीत्व करते.
CSL नुसार, या जहाज निर्मिती मालिकेतील 8 पैकी 5 जहाजे, याआधीच लाँच केली गेली असून, सध्या विविध चाचणी टप्प्यांमध्ये आहेत. ज्यामध्ये यंत्रसामग्री आणि सिस्टम इंस्टॉलेशन चाचणीचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व परिक्षणानंतर साधारण मार्च 2025 पर्यंत पहिले जहाज वितरीत केले जाईल असा अंदाज आहे.
हा संपूर्ण प्रकल्प, भारताच्या विस्तारित जहाजबांधणीची वाढती क्षमता आणि भविष्यातील सागरी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, नौदलाच्या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाची बांधिलकी अधोरेखित करतो.
टीम भारतशक्ती